Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 09 April 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०९ एप्रिल २०१८
सकाळी ६.५०
मि.
*****
v शिवसेना पदाधिकारी हत्येनंतर अहमदनगर शहरात कडकडकीत बंद; पोलिस
निरीक्षक अभय परमार निलंबित, सहायक पोलिस अधीक्षकाच्या चौकशीचे आदेश;
v तीन आमदारांसह तीस जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल; आमदार संग्राम
जगताप यांना अटक
v देशात शांतता आणि सलोखा कायम राखण्यासाठी
काँग्रेस पक्षातर्फे आज राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी एक दिवसाचं
लाक्षणिक उपोषण
v लिंगायत धर्माला मान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या
मागणीसाठी औरंगाबादमध्ये महामोर्चा
आणि
v राष्ट्रकुल
क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी भारताला
तीन सुवर्ण, एक
रौप्य आणि दोन कांस्य पदकं
*****
अहमदनगर महापालिकेच्या केडगाव पोटनिवडणूक
वादातून शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या परवा झालेल्या हत्येनंतर
काल शहरात कडकडकीत बंद पाळण्यात आला. शहरातून निषेध मोर्चाही काढण्यात आला. जिल्ह्यातही
या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांना
निलंबित करण्यात आलं असून सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालकांमार्फत
चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना
केली.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे आमदार संग्राम जगताप, त्यांचे वडील आमदार अरूण जगताप आणि भारतीय जनता पक्षाचे
आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह तीस जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी
आमदार संग्राम जगताप यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना
येत्या १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हत्येनंतर पोलिसांनी चौकशीसाठी आमदार
जगताप यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात नेल्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर
हल्ला करून नासधूस केल्याप्रकरणी २२ जणांना अटक केली आहे, त्यांना उद्यापर्यंत पोलिस
कोठडी सुनावण्यात आली आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हत्येच्या घटनेनंतर
शिवसेनेचे वरीष्ठ नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम, परीवहन मंत्री दिवाकर रावते, गृहराज्यमंत्री
दीपक केसरकर यांनी काल अहमदनगरला भेट दिली.
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अहमदनगर शहरात
भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रितपणे दहशत निर्माण
केली असल्याचा आरोप वार्ताहरांशी बोलतांना केला.
दरम्यान, हत्या झालेल्या शिवसेनेच्या दोन्ही कार्यकर्त्यांचं
शवविच्छेदन औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आलं. त्यानंतर उशिरा
रात्री अहमदनगर इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
देशात शांतता आणि सलोखा कायम राखण्यासाठी काँग्रेस
पक्षातर्फे आज राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण
केलं जाणार आहे. या उपोषणात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचं
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितली.
****
लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता आणि राष्ट्रीय
स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी काल औरंगाबाद इथं अखिल भारतीय
लिंगायत समन्वय समिती तर्फे महामोर्चा काढण्यात
आला. मराठवाड्यासह राज्यातल्या विविध भागांमधून आणि आंध्र प्रदेश तेलंगणा, कर्नाटक
राज्यातूनही या समाजातले महिला- पुरुष मोठ्या
संख्येचं मोर्चात सहभागी झाले होते. शहरातल्या क्रांती चौक इथून हा मोर्चा काढण्यात
आला. मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचल्यावर उपायुक्त वर्षा ठाकूर यांना निवेदन
देण्यात आलं.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
बोगस कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांना पदस्थापना
दिल्याबद्दल आणि याबाबतची कागदपत्रं गहाळ करून पुरावे नष्ट करून केल्याप्रकरणी औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या महिला उपशिक्षणाधिकारी अश्विनी
लाठकर आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजीव कळम यांच्या विरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांच्या आदेशावरून हा गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना जगण्याची उभारी
देण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनानं ‘उभारी अभियान’ उपक्रम सुरु केला आहे. याअंतर्गत या कुटुंबाच्या अडचणी
जाणून घेऊन त्यांना योग्य ती मदत केली जात आहे. जिल्ह्यात ३८१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची प्रत्यक्ष
भेट घेऊन, जात प्रवर्गनिहाय सर्वेक्षण करून, कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी सुक्ष्म स्तरावरील
विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
जिल्हा प्रशासनाने आता पर्यंत कौशल्य व
रोजगार उद्योजक्ता यामध्ये ९५ लाभार्थि पैकीं ४८ जनाना लाभ मिळवून दिलेला आहे.
वस्तीगृह सुविधेमध्ये ६३ विद्यार्थानां मोफत प्रवेश मिळवून दिला जाणार आहे. २१ जणाणां
विहिर मंजूर झाली. कुंटूब अर्थसह्याय योजना मध्ये ९९ संजय गांधी निराधार योजना अंतर्गत
५१ अश्या ३२६ कुंटूबांना विविध योजणा मधून मदत करण्यात आली आहे. दिर्गकाळाच्या योजनाच्या लाभाची प्रक्रिया हि सुरू
करण्यात आली आहे. अरूण समुद्रे , आकाशवाणी बातम्यासाठी लातूर.
****
नांदेड इथं कालपासून पारपत्र सेवा केंद्र सुरु झालं.
टपाल कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या या केंद्राचं उद्घाटन खासदार अशोक चव्हाण यांच्या
हस्ते करण्यात आलं.
****
राज्यात काल तापमानात काही अंशी घट झाली. काल सर्वात
जास्त ४१ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. नांदेड आणि बीड
इथं सरासरी ३९, तर औरंगाबाद इथं ३८ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पुढचे दोन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली
आहे.
****
एकवीसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल चौथ्या दिवशी भारतानं तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकं पटकावली. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं अंतिम फेरीत सिंगापूरवर
३-१ अशी मात करत सुवर्ण पदक जिंकलं.
भारोत्तोल्लनात
महिला गटात पूनम यादवनं ६९
किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं, तर पुरुषांमध्ये विकास ठाकूरनं ९४ किलो वजनी गटात
कांस्य पदक मिळवलं.
नेमबाजीत
१० मीटर पीस्टल प्रकारात मनू भाकेरनं सुवर्ण
पदक तर हिना सिध्दूनं रौप्य पदक पटकावलं, पुरुषांच्या गटात रवी कुमारनं याच प्रकारात कांस्य
पदक जिंकलं.
आता या स्पर्धेत भारत सात सुवर्ण, दोन रौप्य आणि
तीन कांस्य पदकांसह पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्या
वॉटर कप स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. जल स्वयंपूर्णतेचा निर्धार करत ७२ गावांनी
स्पर्धेत सहभाग घेत श्रमदानाला सुरुवात केली. याद्वारे पाणलोट व्यवस्थापनाची विविध
कामं केली जाणार असल्याचं तहसीलदार जे. डी. वळवी यांनी काल सांगितलं.
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या वडेपुरी
इथंही काल या स्पर्धेचा श्रमदान करून आमदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांच्या उपस्थितीत
शुभारंभ करण्यात आला. लोहा तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींसह भोकर तालुक्यातल्या ग्रामपंचायतींचाही
या जलसंधारण कामात समावेश आहे.
****
उस्मानाबाद शहरात काल दुपारी हलक्या स्वरूपाचा पाऊस
पडला. या पावसामुळे आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांची तारंबळ उडाली, लोहारा परिसरातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे. लातूर
शहरातही काल पावसाच्या सरी कोसळल्याचं आमच्या वार्ताहरांनं कळवलं आहे.
****
लातूर इथं काल जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक पत्रकार जीवनधर
शहरकर यांच्या कार्यावर आधारित ‘ आनंदयात्री
बापू ’ या गौरंव ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. शहरकर यांनी, पत्रकारीता करतांना ना.
भि. परुळेकर आणि अनंत भालेराव यांनी दिलेल्या निर्भय पत्रकारीतेचा मंत्र आयुष्यभर जपल्याचं
सांगुन राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारामुळे समृद्ध जीवन जगल्याची भावना व्यक्त केली.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त
राज्यभर आयोजित करण्यात येत असलेल्या सामाजिक सप्ताहाला कालपासून सुरूवात झाली. येत्या १४ एप्रिलपर्यंत
हा सप्ताह सुरू राहणार असून परभणी इथं या सप्ताहाचं
उद्धाटन काल प्राध्यापाक अरूण कुमर लेमाडे यांच्या हस्ते करण्यात आलं, राज्यात इतरत्रही
या निमित्त विविध कर्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हिंगोली इथंही या सप्ताहाचं उद्धाटन
आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment