Monday, 9 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 09.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 9 April 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक एप्रिल  २०१ दुपारी १.०० वा.

****



  ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज पाचव्या दिवशी भारतानं एक सुवर्ण, दौन रौप्य आणि दोन कांस्य पदकं पटकावली. नेमबाजी स्पर्धेत जीतू रायनं १० मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. याच स्पर्धेत ओमप्रकाश मीथरवालनं कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीतच महिलांच्या १० मीटर पिस्टल प्रकारात मेहुली घोषनं रौप्य, तर अपूर्वी चंदेलानं कांस्य पदक पटकावलं.

 भारोत्तोलनात पुरुषांच्या १०५ किलो वजनी गटात प्रदिप सिंगनं रौप्य पदक जिकंलं. टेबल टेनिस मध्ये पुरुषांच्या संघानं उपान्त्य फेरीत सिंगापूरचा तीन - दोन असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.

 बॅडमिंटनमध्ये मिश्र सांघिक प्रकारात अंतिम फेरीत भारताचा सामना मलेशियाविरुद्ध होणार आहे. मुष्टीयुद्ध, जलतरण तसंच मैदानी स्पर्धेतही आज भारतीय खेळाडू उतरणार आहेत. उंच उडीच्या स्पर्धेत तेजस्वीन शंकर अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे.

 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आठ सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण १७ पदकं मिळवून पदक तालिकेत कॅनडाला मागे टाकत तिसरा क्रमांक मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या तर इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे.

****



 देशात जातीय सलोखा आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे आज लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातले काँग्रेस पदाधिकारीही आपापल्या भागात उपोषण करत आहेत.

 पालघर इथं जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केदार काळे यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 परभणी इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात तर सोलापूर इथं माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरु आहे. देशात शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रत्येकानं सर्वधर्मसमभावाची भूमिका घ्यावी, यासाठी राजकीय पक्षांनी महत्त्वाची भूमिका घेतली पाहिजे असं मत शिंदे यांनी व्यक्त केलं.

****



 अहमदनगर इथल्या केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी तपास करण्यासाठी पाच पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली. मनपा पोटनिवडणुकीच्या वादातून दोन दिवसांपूर्वी केडगाव इथं, शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती, या प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना तर पोलिस ठाण्यात तोडफोड केल्याप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे.

****



 जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावतांना कोणत्याही प्रकारची हयगय न करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत. काल नागपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. रूग्णांवर उपचार केल्यानंतर निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीनं लावली नाही, तर संसर्गजन्य रोगांचा पादुर्भाव होवू शकतो, याकडे लक्ष वेधत त्यांनी, या कचऱ्याची योग्य रीतीनं विल्हेवाट लावण्याच्या गरजेवर भर दिला.

****

 संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णता मिळवणं देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्याचं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. चेन्नई इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांशी त्या बोलत होत्या. संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णता साध्य करण्यासाठी देशातले कल्पक तरुण देशी बनावटीच्या उत्पादनांची निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी नमूद केलं. उत्पादन क्षेत्राला बळकटी देणं गरजेचं आहे, असं सांगत आपलं सरकार त्यासाठी आवश्यक ती पावलं उचलत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

****



 महिलांना रचनात्मक कामात सहभागी व्हायला प्रोत्साहन द्यायला हवं असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भारतीय उद्योग महासंघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महिलांचा आदर आणि सन्मान करणं, ही भारताची संस्कृती असल्याचं सांगत, देशाचा विकास आणि आर्थिक समृद्धी यासाठी महिला सक्षमीकरण ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****



 सोलापूर महापालिकेच्या परिवहन विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना नऊ महिन्यांपासून वेतन मिळालं नसल्यामुळे त्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. महापालिकेनं शहरात सार्वजनिक बस सेवा उपक्रम सुरु केला होता, मात्र नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम तोट्यात आहे. सध्या केवळ ३५ बस या उपक्रमाअंतर्गत धावत असून, दररोज तीन लाख रुपयांचा तोटा होत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. परिणामी या कर्मचाऱ्यांचं वेतन नऊ महिन्यांपासून मिळालेलं नाही. अनेकदा पाठपुरावा करुनही वेतन न मिळाल्यानं अखेर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...