Tuesday, 10 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.04.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 April 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १०   एप्रिल २०१ सकाळी .५० मि.

*****



v हमी भावानं तुरीच्या खरेदीसाठी मे पर्यंत मुदतवाढ देण्याची राज्य सरकारची केंद्र सरकारकडे मागणी

v शांतता आणि सामाजिक सलोख्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीनं देशभरात सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी लाक्षणिक उपोषण

v अहमदनगर पोलिस ठाण्यात तोडफोड केल्याप्रकरणी, आमदार शिवाजी कर्डिले यांना एक दिवसाची पोलिस कोठडी

आणि

v गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दहा सुवर्णासह, १८ पदकं जिंकत भारताची तिसऱ्या क्रमांकावर झेप



****



 हमी भावानं तुरीच्या खरेदीसाठी मे पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्र शासनाकडे  पत्राद्वारे केली आहे. शेतकऱ्यांची तूर खरेदीची मुदत सध्या १८ एप्रिल  पर्यंत आहे. नोंदणी केलेल्या २ लाख ५४ हजार २६५ शेतकऱ्यांची सुमारे २६ लाख क्विंटल तूर खरेदी करणं अद्याप बाकी असल्यानं मुदतवाढ आवश्यक असल्याचं खोत यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

****

 लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ – नाफेडनं संयुक्तरित्या सुरू केलेल्या हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांच्या हस्ते काल करण्यात आला.  या केंद्रावर ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल या हमीभावानं हरभऱ्याची खरेदी केली जाणार आहे. आतापर्यंत दोन हजार शेतकऱ्यांनी हमी भावानं हरभरा विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांनी हमी भावानं हरभरा विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असं आवाहन बाजार समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे.

 जालना इथं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या हरभरा खरेदी केंद्राचं उद्घाटन काल करण्यात आलं तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर इथं कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तालुका खरेदी विक्री संघाच्या संयुक्त विद्यमानं उभारण्यात आलेल्या हरभरा खरेदी केंद्राचा काल शुभारंभ झाला.

****



 यंदाच्या हंगामात हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात पहिल्याच दिवशी हळद विक्रीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पहिल्या दिवशी जवळपास १० हजार पोत्यांची आवक झाली होती. हळदीला साडेपाच ते साडेसहा हजार भाव मिळाला. एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच हळदीची सोमवारी खरेदी सुरु झाली. मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्यानं बाजारपेठेत मोठी रेलचेल दिसून आली.

*****



 देशात शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी काल काँग्रेस पक्षाच्या वतीनं देशभरात सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.

 काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आलेलं हे उपवास आंदोलन प्रतिकात्मक असून, शेतकरी तसंच सर्वसामान्यांचे प्रश्न न सोडवल्यास, काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिला आहे. ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेनेच्या भूमिकेवर टीका करत, चव्हाण यांनी, सत्तेत राहून आंदोलन करणाऱ्या शिवसेनेत सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत नसून, आगामी निवडणुकीत शिवसेनेचं अस्तित्व भाजपवर अवलंबून असल्याचं म्हटलं आहे.

 औरंगाबाद इथं शहागंज भागातल्या गांधीपुतळ्याजवळ जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, यांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.

 लातूर इथं कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विधीज्ञ व्यंकट बेद्रे, शहराध्यक्ष मोईज शेख यांच्या उपस्थितीत, हिंगोली इथं खासदार राजीव सातव, आमदार डॉ.संतोष टारफे, यांच्या नेतृत्वात, तर नांदेड इथं आमदार अमिता चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई जवळगावकर यांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण करून, दलितांवरच्या अत्याचाराचा विरोध करण्यात आला. बीड, उस्मानाबाद, आणि जालना इथंही काँग्रेस कार्यकत्यांनी लाक्षणिक उपोषण केलं.

 राज्यात सोलापूर इथं माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, नाशिक इथं विधान सभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धुळे इथं आमदार कुणाल पाटील तर पालघर इथं जिल्हाध्यक्ष केदार काळे यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 दरम्यान, काँग्रेस पक्षाचं हे आंदोलन म्हणजे उपवास नसून उपहास असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे.

****



 अहमदनगर इथं पोलिस ठाण्यात तोडफोड केल्याप्रकरणी, अटकेत असलेले आमदार शिवाजी कर्डिले यांना न्यायालयानं, एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. केडगाव  दुहेरीत हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना अटक झाल्यानंतर काल पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केल्याचा आरोपावरून कर्डिले यांना अटक करण्यात आली. या हत्या प्रकरणात जगताप यांना १२ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 दरम्यान, केडगाव  दुहेरी हत्याकांड प्रकरणी तपास करण्यासाठी पाच पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

 अहमदनगर इथं झालेल्या शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांना अटक करण्यामागे शिवसेनेचं षडयंत्र असून, त्या आमदारांना विनाकारण गोवण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया  राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलतांना  दिली.

*****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****



 औरंगाबाद इथं काल मंथन विचारापीठाच्या वतीनं ‘समांतर जल वाहिनी पुन्हा औरंगाबादकरांच्या मानगुटीवर बसणार का..? या विषयावर प्राध्यापक विजय दिवाण यांचं व्याख्यान झालं. औरंगाबाद महानगरपालिका समांतर जलवाहिनीच्या माध्यमातून शहराच्या पाणी पुरवठ्याचं खाजगीकरण करत असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. ते म्हणाले…

पाणी पुरवठ्याच्या खाजगीकरणाचा आणि ही जी कंपनी होती तिला पुन्हा तिसऱ्या जलवाहिनीचं काम देण्याचा जो प्रस्ताव आहे. तो जनहित विरोधी आहे. लोकविरोधी आहे आणि अशा प्रकारचा लोकविरोधी प्रस्ताव महानगरपालिकेतल्या राजकारण्यांना लोक करू देणार नाहीत.



 शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तिसऱ्या जलवाहिनीची आवश्यकता नसून केवळ राजकीय हेतूनं ही जलवाहिनी टाकण्यात येत असल्याची परखड टीकाही त्यांनी यावेळी केली. औरंगाबाद शहर पाणीपुरवठा खाजगीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं याबाबत आंदोलन उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****



 औरंगाबाद शहरातल्या सिडको- हडको भागात गेल्या सहा दिवसांपासून पाणी न आल्यानं, या भागातल्या नगरसेवकांनी काल सिडको एन ५  भागातल्या जलकुंभावर चढून आंदोलन केलं. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत शहरात येणाऱ्या पाण्याचं नियोजन करून लेखापरीक्षण  करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.

****



 ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतानं कॅनडाला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. या स्पर्धेत दहा सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण १८ पदकं मिळवून भारतानं पदक तालिकेत तिसरा क्रमांक मिळवला. ऑस्ट्रेलिया पहिल्या तर इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. काल भारतीय संघानं बॅडमिंटन मिश्र सांघिक प्रकारात मलेशियाचा तीन- एक असा पराभव करून सुवर्ण पदक पटकावलं, तर टेबल टेनिस स्पर्धेतही नायजेरीयाचा तीन – शून्य असा पराभव करुन सुवर्ण पदक पटकावलं.

 नेमबाजी स्पर्धेत जीतू रायनं १० मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. याच स्पर्धेत ओमप्रकाश मीथरवालनं कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीतच महिलांच्या १० मीटर पिस्टल प्रकारात मेहुली घोषनं रौप्य, तर अपूर्वी चंदेलानं कांस्य पदक पटकावलं.

 भारोत्तोलनात पुरुषांच्या १०५ किलो वजनी गटात प्रदिप सिंगनं रौप्य पदक जिंकलं.

****



 परभणी जिल्ह्यात काल पालम-लोहा मार्गावर पिकअप गाडीनं दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले. या घटनेत दोघे जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारासाठी नेत असतांना मृत्यू झाला,  शी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

****



 राज्यात कालही काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. उस्मानाबाद शहर आणि परिसरात दुपारनंतर हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद तसंच जालना शहरातही ढगाळ वातावरण असून, भोकरदन परिसरात तुरळक पाऊस झाला. बीड जिल्ह्यातल्या किल्ले धारूर, आष्टी, पाटोदा इथं काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

 बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात बोरगाव वसू इथं वीज पडून एकाचा मृत्यू झाला. सिंदखेडराजा तालुक्यातही अवकाळी पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...