Tuesday, 3 April 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 03.04.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 3 April 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा - अॅट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयानं गेल्या २० मार्च रोजी दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. या निर्णयाबाबत केंद्र सरकारनं दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं, जे लोक या निर्णयाला विरोध करत आहेत, त्यांनी न्यायालयाचा निर्णय नीट वाचला नसल्याचं सांगत, या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
न्यायालय ॲट्रॉसिटी कायद्याविरोधात नाही, न्यायालयाच्या या निर्णयानं ॲट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल केला नसून, फक्त निर्दोष नागरिकांना अटक होण्यापासून संरक्षण दिलं असल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे. यासंदर्भात पुढची सुनावणी दहा दिवसानंतर होणार आहे.

****

इराकमधल्या मोसूल शहरात इसिस या दहशतवादी संघटनेनं मारलेल्या ३९ भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. काल यांपैकी ३८ जणांचे अवशेष भारतात आणून, संबंधितांकडे सोपवण्यात आले आहेत.

****

जम्मू-काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात कृष्णाघाटी इथं नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आज झालेल्या गोळीबारात परभणी इथले जवान शुभम मुस्तापूरे यांना वीरमरण आलं. आज सकाळी पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत, मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा सुरु केला. दोन तास झालेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्यानंही चोख प्रत्युत्तर दिलं.

****

खोट्या वृत्तांकनाला आळा घालण्यासाठी केलेल्या तरतूदी मागे घेण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयानं, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला केली आहे. खोटी माहिती छापल्यास किंवा प्रसारित केल्यात संबंधित पत्रकाराचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्यासंबंधी तरतूदी माहिती प्रसारण मंत्रालयानं जारी केल्या होत्या. त्याला पत्रकारांनी विरोध केला असून, अनेक सुधारणाही सूचवल्या जात आहेत. या सूचनांचं स्वागत असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

****

नागपूर इथल्या दीक्षाभूमीच्या विकास कामासाठी शंभर कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी ही माहिती दिली. कामठी इथं ड्रॅगन पॅलेस टेंपल तसंच ठाण्यात सांस्कृतिक केंद्र उभारणं, परळमध्ये संत रोहिदास भवन उभारणं आदी विविध कामांसाठीही निधी मंजूर केला असून, यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची सुकाणू संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

****

कुस्ती या क्रीडा प्रकाराला उर्जितावस्था आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पैलवानांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई इथं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. पैलवानांना वाढीव पेन्शन मिळावी, एसटीचा प्रवास मोफत मिळावा, शासकीय विश्रामगृहात सोय व्हावी, वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांमध्ये मारामारी झाल्याचं वृत्त आहे. यात भाजपच्या एका नगरसेवकासह एका नगरसेविकेचे पती गंभीर जखमी झाले आहेत. पालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत एका विषयावरुन सुरू झालेल्या वादाचं हाणामारीत पर्यावसन झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस येत्या सहा एप्रिलला साजरा होत आहे. या निमित्तानं मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात महाभाजप महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****

लातूर शहरात अनधिकृतरित्या नळजोडणी अधिकृत करुन घेण्याचं आवाहन महापालिकेनं नागरिकांना केलं आहे. एका वर्षाची पाणीपट्टी आणि नळजोडणीचं नियमित शुल्क भरुन नळजोडणी अधिकृत करण्याची योजना मनपा राबवणार आहे.

****

राज्यात आज सर्वात जास्त ४१ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. परभणी ४१ पूर्णांक चार, नांदेड ४० पूर्णांक पाच, तर औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या तीन दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

ऑस्ट्रेलियातल्या गोल्डकोस्ट इथं होत असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन खेळामध्ये सर्विस करण्यासंबंधीचे नवीन नियम लागू केले जाणार नाहीत, असं आयोजकांनी स्पष्ट केलं आहे. नवीन नियमांनुसार सर्विस करताना शटल जमिनीपासून एक मीटर १५ सेंटीमीटर अंतरावर असणं आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या अखिल इंग्लंड विजेतेपदाच्या स्पर्धेत हा नियम लागू झाला होता.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...