Wednesday, 4 April 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 04.04.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 4 April 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

कारागृहात कैद्यांना भेटायला येणाऱ्यांना ओळखीचा पुरावा म्हणून आधार पत्र मागितलं जावं, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. कैद्यांना भेटण्याची सुविधा योग्य व्यक्तींनाच मिळत असल्याची खात्री करून घेण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. कैद्यांची न्यायालयात किंवा इतर ठिकाणी ने आण करताना, आरोग्य तपासणी करताना, दीर्घ रजा देताना किंवा इतर कोणतीही सुविधा पुरवताना आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवली जावी, असे निर्देश दिले असल्याचं अहीर यांनी सांगितलं.

****

दरम्यान, राज्यसभेचं कामकाज आज संध्याकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत अकरा वेळा तहकूब करावं लागलं. उपसभापती पी जे कुरियन यांनी, भ्रष्टाचार निर्मुलन सुधारणा विधेयकावर चर्चा पुकारली. मात्र अण्णाद्रमुक, द्रमुक, काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभापतींसमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली. या विधेयकावर मतदान प्रक्रियेसाठी सदस्यांनी आपापल्या जागेवर बसण्याची उपसभापतींनी केलेली विनंतीही, गदारोळ करणाऱ्या सदस्यांनी मान्य केली नाही. त्यामुळे कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं. हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असल्याचं मत व्यक्त करत, उपसभापतींनी सदनाचं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब केलं.

****

दहावीचा नवीन अभ्यासक्रम कृतीयुक्त, उपयोजनात्मक तसंच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अनुकूल असेल, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमासंबंधी आज मुंबईत आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. येत्या शैक्षणिक वर्षापासून आठवी आणि दहावीच्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके बदलणार आहेत, या पुस्तकांचं प्रकाशनही तावडे यांच्या हस्ते करण्यात आलं. दहावीच्या नव्या पुस्तकांत प्रत्येक पाठाला क्यू आर कोड देण्यात आला आहे, क्यूआर कोडच्या सहाय्यानं ग्रामीण भागातले विद्यार्थीही इंटरनेटद्वारे जोडले जाणार असल्यानं, ही डिजिटल अभ्यासक्रमाकडे वाटचालीची सुरुवात असल्याचं तावडे म्हणाले. इंग्रजी शाळांमधल्या पंचवीस हजार मुलांनी यंदा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे, हे कौतुकास्पद असल्याचं तावडे म्हणाले.

****

आदिवासी बहुल तसंच नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्याचं शंभर टक्के विद्युतीकरण झालं असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालयापासून दीडशे किलोमीटर अंतरावर, दाट जंगलात असलेल्या तुमिरकसा या पाड्यावर या एकतीस मार्चला वीज पोहचल्यानंतर या जिल्ह्याचं नाव शंभर टक्के विद्युतीकरण झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत नोंदलं गेलं. सौभाग्य योजनेअंतर्गत या पाड्यावरच्या सगळ्या घरांना निःशुल्क वीज जोडण्या पुरवण्यात आल्या आहेत.

****

लातूर जिल्ह्यातली तूर आणि हरबऱ्यासाठीची दहाही आधारभूत खरेदी केंद्र दोन दिवसात सुरू करण्याची मागणी लातूरच्या शेतकरी संघटनेनं राज्य पणन संघाकडे केली आहे. शेतकऱ्यांनी आधारभूत खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे, अशावेळी ही खरेदी केंद्रं जागेअभावी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष असल्याचं सांगत, ही खरेदी केंद्रं दोन दिवसात सुरू करण्याची मागणी संघटनेनं केली आहे.

****

देशाच्या इतर राज्यांमध्ये कांद्याचं विक्रमी उत्पादन झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मागणीअभावी, कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून बंद असलेल्या लासलगावच्या कांदा बाजारामध्ये आज कांद्याला सरासरी सहाशे पंचवीस ते आठशे सात रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.

****

येत्या सहा आणि सात तारखेला मराठवाड्यात गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असं भारतीय हवामान खात्यानं कळवलं आहे. शेतकऱ्यांनी आपल्या कापलेल्या आणि इतर पिकांची काळजी घ्यावी, तसंच विजा चमकत असतांना झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असंही या सूचनेत म्हटलं आहे.

****

गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातला गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला असून राज्य शासन, मॅरिको इनोव्हेशन फाऊंडेशन आणि अंबाजोगाईची मानवलोक ही स्वयंसेवी संस्था यांच्यातर्फे संयुक्तपणे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात धरणातला पाच लाख घनमीटर गाळ काढण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...