Monday, 9 April 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 09.04.2018 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 9 April 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ९ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशात शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. लातूर इथं कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विधीज्ञ व्यंकट बेद्रे, शहराध्यक्ष मोईज शेख यांच्या उपस्थितीत, तर हिंगोली शहर आणि हिंगोली जिल्हा काँग्रेसच्या वतीनं खासदार राजीव सातव, आमदार डॉ.संतोष टारफे, यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात आलं. नांदेड इथं आमदार अमिता चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई जवळगावकर यांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण करून, दलितांवरच्या अत्याचाराचा विरोध करण्यात आला.

औरंगाबाद इथं शहागंज भागातल्या गांधीपुतळ्याजवळ जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, यांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.

नाशिक इथं विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, यांच्या नेतृत्वात तर धुळे इथं आमदार कुणाल पाटील, यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.
दरम्यान, काँग्रेस पक्षाचं हे आंदोलन म्हणजे उपवास नसून उपहास असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. पक्षाचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना, काँग्रेस पक्षानं, उपवासाची कुचेष्टा केल्याचं म्हटलं आहे.

****

छत्तीसगढमध्ये बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या या स्फोटात दोन जवान शहीद, तर पाच जवान जखमी झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. बिजापूर जिल्हा मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर महादेव घाट परिसरात हा स्फोट झाला.

****

मुंबईत कमला मिल अग्निकांड प्रकरणाचा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआय मार्फत तपास करावा, अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं, राज्य सरकारला उत्तर देण्यास सांगितलं आहे. या याचिकेवर पुढची सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार असून, त्यापूर्वी सरकारनं उत्तर सादर करणं अपेक्षित आहे. गेल्या वर्षी २९ डिसेंबरच्या रात्री झालेल्या या अग्निकांडात चौदा जण मारले गेले होते, तर अनेक जण जखमी झाले होते, जखमींपैकी एका कुटुंबानं ही याचिका दाखल करत, या घटनेचा पोलिस तपास पारदर्शक झाला नसल्याचं म्हटलं असून, नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

****

अहमदनगर इथं पोलिस ठाण्यात तोडफोड केल्याप्रकरणी, अटकेत असलेले आमदार शिवाजी कर्डिले यांना आज न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं, त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना अटक झाल्यानंतर काल पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केल्याचा कर्डिले यांच्यावर आरोप आहे. या हत्या प्रकरणात जगताप यांना १२ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी तपास करण्यासाठी पाच पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. मनपा पोटनिवडणुकीच्या वादातून दोन दिवसांपूर्वी केडगाव इथं, शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती.

****

नाशिक महापालिकेच्या महासभेत आज मोठा गदारोळ झाला, इतिवृत्तात बदल करण्यात आल्याचा आरोप करत महिला आणि बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी गोंधळ घातला, महापौरांनी महिला आणि बाल कल्याण समितीच्या नवीन सदस्यांची नावं जाहीर करण्यास सुरुवात केल्यानं, शिवसेनेच्या नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचाही प्रयत्न केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यात आजही काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्याचं वृत्त आहे. उस्मानाबाद शहर आणि परिसरात दुपारनंतर हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद तसंच जालना शहरातही ढगाळ वातावरण असून, भोकरदन परिसरात तुरळक पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात बोरगाव वसू इथं वीज पडून एकाचा मृत्यू झाला. सिंदखेडराजा तालुक्यातही अवकाळी पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतानं आणखी दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. बॅडमिंटन मिश्र सांघिक प्रकारात मलेशियाचा तीन एक असा पराभव करून भारतीय संघानं सुवर्ण पदक पटकावलं, टेबल टेनिस स्पर्धेतही भारतीय संघानं नायजेरीयाचा तीन - शून्य असा पराभव करुन सुवर्ण पदक पटकावलं. तत्पूर्वी नेमबाजी स्पर्धेत जीतू रायनं सुवर्ण पदक, मेहुली घोषनं रौप्य, तर ओमप्रकाश मीथरवाल आणि अपूर्वी चंदेलानं कांस्य पदक पटकावलं. भारोत्तोलनात पुरुषांच्या १०५ किलो वजनी गटात प्रदिप सिंगनं रौप्य पदक जिकंलं. या स्पर्धेत भारतानं दहा सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण १८ पदकं मिळवून पदक तालिकेत कॅनडाला मागे टाकत तिसरा क्रमांक मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या तर इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे.     

//*********//


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...