Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 21 May 2019
Time
18.00 to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ मे २०१९ सायंकाळी
६.००
****
उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी
स्ट्राँगरुम जवळ संशयास्पद इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं आढळून आल्याचे दावे निवडणूक आयोगानं
फेटाळले आहेत. विशेषतः गाझीपूर, चांदौली, दोमारीयागंज आणि झाशी लोकसभा मतदार संघांच्या
बाबतीत संशयास्पद ईव्हिएम आढळल्याचे दावे तथ्यहीन असल्याचं निवडणूक आयोगानं एका निवेदनात
म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर सीलबंद करून
त्याचं चित्रणही केलं होतं, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं आहे. मतदान यंत्र
ठेवण्यात आलेल्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवले असून, सुरक्षेसाठी केंद्रीय दलाची
नियुक्त केली आहे तसंच सर्वच ठिकाणी प्रत्येक उमेदवाराच्या एका प्रतिनिधीला सतत लक्ष
ठेवण्याची परवानगी देण्यात आल्याचंही आयोगानं नमुद केलं आहे.
****
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंदर्भात तक्रार करण्यासाठी
वीसहून जास्त विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली.
यावेळी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल आणि मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, चंद्रबाबू नायडू यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
निवडणूक आयोगानं या पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं असून, यासंदर्भात त्यांच्या सोबत उद्या
बैठक घेऊन मतदान यंत्रांबाबतच्या या तक्रारींसदर्भात भूमिका स्पष्ट करणार असल्याचं
म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईतल्या विविध केंद्रांवर
ठेवलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबरोबर छेडछाड होण्याची शक्यता असल्याची आपल्याला
शंका येते, असं पत्र मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार
मिलिंद देवरा यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलं आहे.
****
दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा
दिली. यावेळी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली.
परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातही
आज दहशतवाद विरोध दिनानिमित्त शपथ देण्यात आली.
****
मराठवाड्यात आज सलग दुसऱ्या दिवशी सर्वत्र
कडक ऊन जाणवलं. बहुतेक ठिकाणी पारा चाळीस अंशांच्या वर पोहचला. नांदेडमध्ये आज चव्वेचाळीस
अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाली. या उष्णतेनं जनजीवन विस्कळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील
कोळगाव नजिक राष्ट्रीय महामागार्गावर तीन वाहनांच्या अपघातात एक महिला मृत्युमुखी पडली
तर तिचा पती आणि मुलगी जखमी झाले आहेत. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास झालेल्या या
अपघातातील मोटारीनं पेट घेतल्यानं महिलेचा होरपळून मृत्यू झाला. गंभीर जखमी मुलीला
उपचारांसाठी औरंगाबादला हलवण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातल्या मुक्रमाबाद इथला महा-ई सेवा केंद्र
चालक खुशाल सोपानराव जाधव याच्यासह अन्य एकाला दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना नांदेडच्या
लाचलुचपत विभागानं काल अटक केली. तक्रारदाराच्या वडिलांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र देण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
****
परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातल्या
कोल्हा इथं दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. जलवाहिनीला
अनेक ठिकाणी गळती लागल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे. ग्रामस्थांनी
यावर उपाय योजन्याची मागणी तहसिलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याचं आमच्या परभणी
इथल्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यातल्या
वज्रेश्वरी देवस्थानावर दरोडा घालणा-या पाच जणांच्या टोळीला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या
स्थनिक गुन्हे शाखेनं आज अटक केली आहे. या महिन्याच्या दहा तारखेला या टोळीनं वज्रेश्वरी
मंदिरावर दरोडा घालून दानपेट्यांमधली सुमारे सात लाख रुपयांची रक्कम लुटली होती, अशी
माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी
दुष्काळी परिस्थितीच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर
गाढव मोर्चा काढला.
*****
***
No comments:
Post a Comment