Wednesday, 22 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.05.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 May 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२  मे २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø  लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण; निकालाची उत्सुकता

Ø  राष्ट्रीय लोकशाही आघाडी हा भारतीय जनतेच्या अपेक्षांचं प्रतिनिधित्व करणारा समूह - पंतप्रधान नरेंद मोदी

Ø  अध्यादेशावर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं मुंबईतलं आंदोलन मागे

आणि

Ø  बीड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार

****



 देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होत असून, राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. राज्यातील ४८ लोकसभेच्या जागांसाठी फेरी पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार असून निवडणूक निरीक्षकांच्या देखरेखीखाली मतमोजणी होणार आहे. यासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पावत्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. या अनुषंगानेही मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी हे जनतेला निकालाची फेरीनिहाय माहिती देणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. मंत्रालयामध्ये माध्यम प्रतिनिधींना निवडणूक निकालाची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून हा नियंत्रण कक्ष देखील २४ तास कार्यरत राहणार आहे.



 सर्वप्रथम टपाली मतदान आणि त्यानंतर मतदान यंत्रांतल्या मतमोजणीला प्रारंभ होईल. दुपारनंतर निकाल हाती येण्यास सुरुवात होईल.



 आकाशवाणीचा वृत्त विभाग, सकाळी साडेदहा वाजेपासून निकाल प्रक्रियेचं प्रसारण करणार आहे. ‘निवाडा जनतेचा’ या नावाच्या या कार्यक्रमात, राजकीय तज्ञ निकालांचं सर्व समावेशक आणि सखोल विश्लेषण करतील. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाची अधिकृत यू ट्यूब वाहिनी, फेसबूक पेज, ट्विटर आणि आरएनयु औरंगाबाद डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम चा वरही या निकालांचं लाईव्ह प्रसारण केलं जाईल.

****



 राष्ट्रीय लोकशाही आघाडी -एन डी ए हा भारतीय जनतेच्या अपेक्षांचं प्रतिनिधित्व करणारा समूह असल्याचं पंतप्रधान नरेंद मोदी यांनी म्हटलं आहे.  काल रात्री नवी दिल्ली इथं झालेल्या आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आघाडीचा उद्देश केवळ मतं मिळवून सत्तेत येणं एवढाच नसून, नवभारताचं निर्माण करण्याचा असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आता मजबूत भारताचा भक्कम स्तंभ झाल्याचं पंतप्रधान म्हणाले. या बैठकीत निकालाच्या परिणामांनुसार रणनिती तयार करण्याबाबतही चर्चा झाली. भाजपाच्यावतीनं सर्व मित्रपक्षांसाठी काल विशेष भोजन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला तसंच भोजन समारंभाला आघाडी मधील सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते.



 दरम्यान, मतदान पडताळणी पोहोच पावतीच्या माध्यमातून केली जाणारी मतमोजणी ही सुरूवातीलाच करण्यात यावी, ती मतमोजणीच्या सर्वात शेवटच्या फेरीनंतर करू नये, अशी मागणी २२ विरोधी पक्षांच्या एका शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाकडे केली आहे. जर कोठेही तफावत आढळली तर त्या विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदान केंद्रांवरच्या मतदान पडताळणी पावत्यांच्या माध्यमातून मतमोजणी करण्यात यावी, अशी मागणीही या नेत्यांनी केली आहे. निवडणूक आयोगाला भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, तेलगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

****



 मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर शाखेस आरक्षित वर्गातून प्रवेश देण्यासंदर्भातल्या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर मुंबईत या विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन काल मागे घेण्यात आलं. गेल्या पंधरा दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी या अध्यादेशावर स्वाक्षरी केल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अध्यादेशाला राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारनं प्रवेश प्रक्रिया पूर्ववत केल्याची सूचना जारी केली आहे.



 दरम्यान, या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल करण्यात आलं आहे.

****



 वीज महानिर्मिती कंपनीनं एकाच दिवसात उच्चांकी दहा हजार मेगावॅट वीज निर्मिती केल्याबद्दल, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मिती कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. महानिर्मिती कंपनीनं, औष्णिक, जल, पवन आणि सौर अशा सगळ्या प्रकारच्या ऊर्जा प्रकल्पांच्या सहाय्यानं वीजनिर्मिती करून, परवा हा उच्चांक गाठला. राज्यात वीजेची दररोजची गरज, बावीस हजार तीनशे मेगावॅट एवढी असून, यातला सर्वात मोठा वाटा महानिर्मितीकडून पुरवला जात आहे. उर्वरित वीज, खाजगी वीज निर्मिती कंपन्या आणि केंद्र सरकारच्या प्रकल्पातून घेतली जात असल्याची माहिती शासनानं दिली.

****



 पी एस एल व्ही सी ४६ या उपग्रहाचं आज पहाटे साडे पाच वाजता यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून इस्त्रोतर्फे हे प्रक्षेपण करण्यात आलं.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****



 बीड जिल्ह्यात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार झाले. गेवराई तालुक्यात कोळगाव नजिक तीन वाहनांच्या अपघातात एकाच कुटुंबातल्या दोन जणींचा होरपळून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. काल दुपारी बारा वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात, मोटारीनं पेट घेतला. मृतांमध्ये एक महिला आणि तिच्या मुलीचा समावेश असून, सदर महिलेचा पती सुमारे ६३ टक्के होरपळल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 दुसरा अपघात काल दुपारी बीड - परळी मार्गावर झाला. वडवणी तालुक्यातल्या कुप्पी फाटा इथं मोटार सायकलला पाठीमागून आलेल्या टमटमने जोराची धडक दिली. यात पती पत्नीसह एक चिमुकली ठार झाली.

****



 अंबड तालुक्यातल्या वलखेडा शिवारात दगडाच्या खदानित जुन्या स्फोटकांचा अचानक स्फोट झाल्याने दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. काल दुपारी ही घटना घडली. स्फोट झाला त्यावेळी ही दोन मुलं तिथं खेळत होती.  स्फोटानंतर जवळपास १० फूट दूर ती फेकली गेली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

****



 नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातल्या मुक्रमाबाद इथला महा-ई सेवा केंद्र चालक खुशाल सोपानराव जाधव याच्यासह अन्य एकाला दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना नांदेडच्या लाचलुचपत विभागानं काल अटक केली. तक्रारदाराच्या वडिलांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****



 लोककला केंद्र चालकाला वर्तमानपत्रात बातमी छापून बदनामी करण्याची धमकी देत दोन लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या भ्रष्टाचारबंदी नावाच्या साप्ताहिकाच्या पत्रकारासह त्याच्या साथीदाराला काल औरंगाबाद पोलिसांनी अटक केली. शरद भीमराव दाभाडे असं या पत्रकाराचं तर विजय रामभाऊ जाधव असं त्याच्या साथीदाराचं नाव आहे. औरंगाबाद जवळील कुंभेफळ इथं लोककला केंद्र चालवणाऱ्या बाबासाहेब गोजे यांनी याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली होती. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी कार आणि रोख ३० हजार जप्त केले आहेत.

****



 परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातल्या कोल्हा इथं दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे. ग्रामस्थांनी यावर उपाय योजन्याची मागणी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याचं आमच्या परभणी इथल्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 पंढरपूरच्या विठ्ठल -रुक्मिणी मंदिराला वर्षभरात  जवळपास ५० हजार रुपयांची परदेशी देणगी मिळाली आहे. इथल्या देणगी पेट्यांमध्ये १४ देशांचे परकी चलन आढळून आलं असल्याची माहिती पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे लेखाधिकारी सुरेश कदम यांनी दिली. गेल्या वर्षभरात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, सिंगापूर, युरोप, कोरिया, मलेशिया, बहारीन, ओमान, कतार, नेपाळ, थायलंडसह सौदी अरेबियातील लोकांनी विठू माऊलीचे दर्शन घेतलं आहे.

****


 नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनकर दहिफळे यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांच्याकडे सुपूर्द केला. दिड वर्ष अध्यक्षपद भूषविल्यानंतर दहिफळे यांनी हा राजीनामा दिला आहे.

****



 दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या अठ्ठावीसाव्या पुण्यतिथी निमित्त काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली. राजभवनातही सामुहिकरित्या दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.

****



 लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरात व्यापाऱ्यांनी खरेदीदारांकडून येणे असलेले पैसे मिळावेत या मागणीसाठी बाजार समिती कार्यालयासमोर उपोषण चालू केलं आहे. त्यांना पाठिंबा म्हणून काल सर्व आडत व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत कडेकोट बंद पाळला. खरेदीदाराकडे असलेले पैसे जोपर्यंत मिळत नाहीत. तोपर्यंत उपोषण चालूच राहील अशी भूमिका आडत व्यापाऱ्यांनी घेतली आहे. त्यांच्या या उपोषणाचा काल दुसरा दिवस होता.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...