आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०६ जुलै २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
नाशिक शहरासह जिल्ह्यात
अनेक ठिकाणी काल पासून पाऊस सुरु आहे. पावसामुळे शहरात पंचवटी भागात एका जुन्या इमारतीचा
जिना कोसळून दोन जण जखमी झाले, याघटनेनंतर नाशिक महापालिकेनं सुरक्षिततेसाठी सात कुटुंबांना
स्थलांतरित केलं. ग्रामीण भागात काही तालुक्यात पावसाचा जोर वाढल्यानं खरीपाच्या लांबलेल्या
पेरण्या सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात साडे सहा लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून त्यापैकी
अवघ्या सहा टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या
मालेगाव शहरात काल रात्री विद्युत तार तुटून खांबात प्रवाह उतरल्यामुळे विजेचा धक्का
लागून एक जण ठार झाला
****
रत्नागिरी जिल्ह्यात
तिवरे इथं तीन दिवसांपूर्वी धरण फुटल्यामुळे बेपत्ता झालेल्या २३ जणांपैकी आतापर्यंत
१९ जणांचे मृतदेह हाती लागले असून आणखी चौघांचा तपास सुरू आहे. धरणापासून सुमारे ४०
किलोमीटर अंतरावर वाशिष्ठी नदीत काल दोन मृतदेह सापडले.
दरम्यान, धरण फुटल्यानं
बंद पडलेला तिवरे गावातल्या बेंडवाडी आणि फणसवाडीचा विद्युत पुरवठा काल सुरू करण्यात
आला. धरण फुटल्यानं वीजेचे २६ खांब आणि इतर साहित्य वाहून गेल्यानं महावितरणचं साडेसात
लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यवतमाळ इथं अन्न आणि
औषध प्रशासन कार्यालय आणि गोदाम उभारण्यासाठी आठ कोटी पंधरा लाख ४४ हजार रुपयांचा निधी
मंजूर झाला आहे. या वर्षांसाठी दोन कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा
शेवटचा साखळी सामना श्रीलंकेसोबत
होणार आहे तर या स्पर्धेतला दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार
आहे. भारत यापूर्वीच उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.
दरम्यान,
काल झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं बांग्लादेशाला ९४ धावांनी पराभूत केलं. मात्र या विजयानंतरही पाकिस्तान
संघ उपांत्य फेरीतसाठी पात्र होऊ शकला नाही.
*****
***
No comments:
Post a Comment