Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 07 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जुलै
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø कर्नाटकात काँग्रेस
-आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आघाडीतल्या १३ आमदारांचे राजीनामे; कुमारस्वामी सरकार
संकटात
Ø भारतीय जनता पक्षाच्या देशव्यापी सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ; आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना युती राज्यात २२० जागा जिंकेल प्रदेशाध्यक्ष दानवे
यांना विश्वास
Ø पीक कर्जांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँकांविरूद्ध कारवाई करण्याची काँग्रेस पक्षाची मागणी
आणि
Ø विश्वचषक
क्रिकेट स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर ७ गडी राखून दणदणीत विजय; न्यूझीलंडसोबत
उपांत्यफेरीचा सामना
****
कर्नाटकातल्या काँग्रेस -आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या
सत्ताधारी आघाडीतल्या १३ आमदारांनी काल विधानसभा सभापतींच्या कार्यालयात राजीनामे सादर केले. राजीनामा दिल्यानंतर या सर्वांनी राज्यपाल वजूभाई वाला यांचीही
भेट घेतली. राजीनाम्यामुळं तेरा महिन्यांपूर्वी
सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह
उपस्थित झालं आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी
हे परदेशात असून आज ते भारतात परतण्याची शक्यता आहे. २२४ सदस्य असलेल्या या विधानसभेत
सत्ताधारी आघाडीला ११८ सदस्याचं पाठबळ आहे. विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदार
आहेत. दरम्यान या राजीनाम्याशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष
बी.एस येडियुरप्पा यांनी म्हटल आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या
वाराणसीमधून भाजपच्या देशव्यापी सदस्य नोंदणी मोहिमेचा काल शुभारंभ केला. यावेळी त्यांनी दीनदयाल उपाध्याय व्यापार सुविधा केंद्रामध्ये आयोजित
समारंभात पाच हजार सदस्यांना संबोधित केलं. त्यांनी सर्व सदस्यांना या नव्या मोहिमेच्या
सफलतेसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यात प्रदेशाध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे
यांच्या हस्ते पुण्यात पक्षाच्या सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलतांना
दानवे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय
जनता पक्ष आणि शिवसेना युती राज्यात २२० जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वत: ‘दिसतोय फरक शिवशाही परत’ हे ब्रीदवाक्य घेऊन राज्याचा
दौरा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
पीक कर्जांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँकांविरूद्ध सरकारनं कारवाई
करावी, अशी मागणी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी
बोलत होते. शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीनं पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावं, असंही ते म्हणाले. खरीप हंगामाच्या
पेरणीसाठी शेतकरी तयारी करत आहेत. बी- बियाणं खतांच्या खरेदीसाठी
पैशांची गरज असल्यानं ते बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. पण बँकांकडून आवश्यता नसताना
आठ ते दहा बँकांकडून नाहरकत प्रणापत्र आणायला सांगितलं जात असल्याची चव्हाण यांनी टीका
केली.
****
राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणणुकीच्या पार्श्वभूमीवर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत पक्षाच्या विविध विभागाच्या
पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पक्षाचे राज्य प्रमुख जयंत पाटील आणि जेष्ठ नेते छगन भुजबळ
यांच्यासह इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, माहिती तंत्रज्ञान तसंच कायदे विषयक यासांरख्या
विविध १५ विभागांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. निवडणूकीत पक्ष १४४ जागा जिंकेल
असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
आगामी विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीला सोबत
घेऊन लढावी अशी काँग्रेस पक्षाची इच्छा आहे. त्यानुसार जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी
ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित केलं जाईल, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते
विजय वडेट्टीवार यांनी काल गडचिरोली इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. ॲडव्होकेट
आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन
पाटील यांच्यावर पक्षानं टाकली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. वंचित बहुजन आघाडी
सोबत आली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्षाचे विविध गट आणि शेतकरी कामगार
पक्षाशी आघाडी करुन भाजप-सेना युतीशी टक्कर दिली जाईल, असंही वडेट्टीवारांनी यावेळी
बोलतांना स्पष्ट केलं.
****
नांदेड जिल्ह्यात गोदावरी शुध्दीकरण कामासाठी २०
कोटी रूपयांचा निधी पालकमंत्री रामदास कदम यांनी काल मंजूर केला आहे. नांदेड जिल्हा
नियोजन मंडळाच्या बैठकीत आज कदम यांनी आपल्या अधिकारातून हा निधी मंजूर करत असल्याचं
सांगितलं. या बैठकीत मार्च २०१९ पर्यंतचा योजनानिहाय खर्चाचा अहवाल सादर करण्यात आला.
त्यानुसार सर्वसाधारण योजनेसाठी मंजूर असलेल्या २४ कोटी ७९ लाख रुपयांपैकी शंभर टक्के
निधी खर्च झाल्याचं सांगण्यात आलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या
सोयगाव इथल्या सरस्वती भुवन प्रशालेतल्या सामुहिक काँपी प्रकरणी दहावीच्या ३२१ विद्यार्थांविरूद्ध वर्षभरासाठी
परिक्षा बंदीची कारवाई तर दोन शिक्षकांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने जारी केले आहेत. फेब्रुवारी-मार्चमध्ये
घेण्यात आलेल्या परिक्षेत या केंद्रावर बीजगणित या विषयात सामुहिक काँपी केल्याचा
प्रकार उघडकीस आला होता.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या
परिसरात काल जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतंर्गत
वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्यानं विद्यापीठातल्या
दहा हेक्टर परिसरामध्ये जैवविविधता उद्यान निर्मितीच्या कामाचंही उद्घाटन यावेळी झालं.
बीड जिल्ह्यातल्या वृक्ष प्रेमी स्वयंसेवी संस्थाही
वृक्ष लागवड योजनेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. त्यांना वृक्ष लागवडीसाठी
तीन लाख रोप मोफत उपलब्ध करून देण्यात येतील असं जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय
यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात डेंग्यू तसंच चिकुनगुन्या आजाराचा
प्रार्दुभाव रोखण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका
यांच्या मदतीनं विविध भागात कंटेनर सर्वेक्षण
करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे लातूर महानगरपालिका घरोघरी जाऊन अॅबेट टाकत असून डेंग्यू
आणि चिकुनगुन्याचा प्रार्दुभाव रोखण्याबाबतची माहिती पत्रक नागरिकांना वाटप करत आहे.
****
नगर पालिका कर्मचाऱ्यास
घरी बोलावून मारहाण केल्या प्रकरणी जिंतूरचे आमदार विजय भांबळे यांच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा
नोंदवण्यात आला आहे. एका शाळेच्या घरपट्टी आणि नळपट्टी वसुलीच्या
कारणावरुन आमदार भांबळे यांनी मारहाण केल्याची तक्रार संबंधित कर्मचाऱ्यांनी
दिली आहे. ही घटना ५ जुलै रोजी घडल्याचं तक्रारीत
म्हटल आहे.
****
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत
काल भारतान श्रीलंकेवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी
करतांना श्रीलंकेनं अँजलो मॅथ्यूजच्या शतकाच्या जोरावर भारतासमोर जिंकण्यासाठी २६५
धावांचं आव्हान ठेवलं. भारतानं हे आव्हानं तीन गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केलं. सलामीवीर
रोहीत शर्मा आणि के. एल. राहूल या दोघांनीही या सामन्यात शतक झळकावली. या विजयासह भारतीय
संघाने या स्पर्धेत १५ गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. भारताचा यानंतरचा उपांत्यफेरीचा सामना न्यूझीलंडच्या संघाबरोबर
होणार आहे.
दुसऱ्या अन्य एका सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा
१० धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करत ६ बाद ३२५ धावा केल्या,
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ ३१५ धावावर सर्वबाद झाला.
****
‘आपलं उस्मानाबाद -हरित उस्मानाबाद’ अंतर्गत उस्मानाबाद
इथं काल सकाळी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय ते वडगावपर्यंत पायी दिंडी काढून ‘झाड लावा- झाड
जगवा’ हा संदेश देण्यात आला, तसंच वडगाव परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. जिल्हाधिकारी
दिपा मुधोळ मुंडे यांच्यासह स्वयंसेवी संस्था, तसंच शासकीय कर्मचारी अधिकारी यांनी
या मोहिमेत सहभाग घेतला.
****
राज्याचे जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे
धरण फुटण्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा हिंगोली इथं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीनं
काल निषेध करण्यात आला. शहर पोलीस ठाण्यात खेकडे सोडून आंदोलन करण्यात आले.
****
उस्मानाबाद पोलिसांनी उमरगा इथून तुळजापूरकडे टेंपोतून नेला जाणारा गुटखा आणि सुगंधी त्ंबाखू असा एकूण
२६ लाख ३५ हजार रूपयांचा साठा काल जप्त केला. या संदर्भात नळदुर्ग पोलिस ठाण्यात टेंपो
चालकासह दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
लातूर इथं काल भारतीय जनता पक्षाच्यानं सदस्य नोंदणीचा
शुभारंभ झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव
पाटील निलंगेकर यांनी या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सदस्य नोंदणीमुळे २०२४ च्या
विजयाची पायाभरणी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला
****
हिंगोली जिल्ह्यात काल रिमझिम पावसानं हजेरी लावली
जिल्ह्यातल्या कनेरगाव नाका, गोरेगाव, कडोळी, हट्टा, आखाडा बाळापूर, वसमत, आडगांव रंजे
परिसरात हा पाऊस झाला. या पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र जिल्ह्यात
मोठ्या पावसाची अजुनही प्रतिक्षा असून बहुतांश ठिकाणी पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना- अंबड मार्गावर हारतखेडा फाट्यावर काल सकाळी आयशर ट्रक आणि बोलेरा जीपची धडक
होऊन झालेल्या अपघातात एका सात वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण
जखमी झाले. नेहा गणेश जाधव असं मृत मुलीचं नाव असून, तिचे वडील आणि आई या अपघातात जखमी झाले आहेत.
****
बीड जिल्ह्यात जून अखेर पावसाला सुरुवात झाल्यानं
उशिरा पेरणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण खरीपाचे सरासरी क्षेत्र असलेल्या
सात लाख २२ हजार हेक्टरपैकी तीन लाख हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात
सर्वाधिक एक लाख पन्नास हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात
आली आहे. तर उर्वरित क्षेत्रावर सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, उडीद पेरणी करण्यात आली
आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६६६ मिलिमीटर असून आतापर्यंत सरासरीच्या फक्त
११ टक्के एवढाच पाऊस पडला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment