आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०७ जुलै २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
बँक आणि इतर आर्थिक व्यवहार
करणाऱ्या संस्थामध्ये ५० हजार रूपयांपेक्षा अधिक मूल्याच्या व्यवहारासाठी आता आधार
पत्राचाही वापर करता येईल, असं केंद्रीय महसूल सचिव अजयभूषण पांडे यांनी सांगितलं.
यापूर्वी या व्यवहारासाठी कायम खाते क्रमांक पत्र - पॅन बंधनकारक होते. सध्या देशात
२२ कोटी पॅन धारक आहेत, तर दुसरीकडे आधारपत्र धारकांची संख्या ही १२० कोटी एवढी आहे.
ही बाब लक्षात घेता पॅन पत्राशिवाय लोकांना आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध
व्हावी, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
२०३० पर्यंत भारतीय रेल्वेला
सर्वोत्तम रेल्वे बनवण्याच्या उद्देशानं सरकारनं ५० लाख कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवलं
असल्याचं रेल्वे मंत्री पियुष गोयल म्हटलं आहे. पणजी इथं भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता
अभियानप्रसंगी आयोजित समारंभात ते पत्रकारांशी बोलत होते. गोव्यातल्या महत्त्वाच्या
पर्यटनस्थळांच्या दृष्टीनं रेल्वे जोडणी वाढविण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येईल, असंही
यावेळी गोयल यांनी जाहीर केलं.
****
रत्नागिरी जिल्ह्याच्या
तिवरे धरणाच्या भिंतीला पडलेल्या भेगांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपासणी
पथक स्थापन केलं आहे. जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली हे पथक दोन
महिन्यांत आपला अहवाल सादर करील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दोन जुलैला झालेल्या
धरणफुटीच्या घटनेत १८ जण ठार, तर पाच बेपत्ता झाले होते.
****
पंढरपूर आषाढी वारीसाठी
दक्षिण - पश्चिम रेल्वेतर्फे हुबळी-पंढरपूर-हुबळी अशी जलद पॅसेंजेर रेल्वे सोडण्यात
येणार आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यातल्या भाविकांची सोय होईल, असं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज
सकाळपासून ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी रिमझिम पाऊसही सुरू आहे. शहरात सकाळी साडे
आठपर्यंत पाच मिलिमिटर पावसाची नोंद झाल्याचं चिकलठाणा वेधशाळेनं सांगितलं. तसंच तापमानातही
घट झाली असून, शहरात कमाल २८ दशांश ५, तर किमान २० दशांश ८ इतकं तापमान नोंदवलं गेलं
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment