Sunday, 7 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****

 नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. उपनद्या आणि नाल्यांचे पाणी वाहून आल्याने रामकुंड परिसरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. पावसामुळे सोमेश्वर धबधबादेखील वाहू लागल्याने आज रविवारी सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.

दरम्यान, धोकादायक बनलेल्या गावठाणातील काही भागांतल्या रहिवाशांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. काही पर्यटकांची वाहनंही या पुरात अडकली असून, महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागाचे पथक मदतकार्य करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

 नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या या पावसामुळे धरणात पाण्याचा साठा वाढत आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंत गंगापूर क्षेत्रात 96 मिलिमिटर पाऊस झाला असून धरणातला साठा २ टक्क्यांनी वाढून आता १५ पूर्णांक २२ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.

 दरम्यान, मुंबई आणि परिसरातला मुसळधार पाऊस कमी झाला असला, तरी रिपरिप सुरूच आहे. यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणी साठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ आज पहाटे दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कसलेही नुकसान झालेले नाही.

 पालघर जिल्ह्यातल्या कासा, डहाणू, तळासरी, विक्रमगड भागातही काल रात्रीपासून चांगला पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातल्या सूर्या, वैतरणा, पिंजाळ नद्यांमध्येही पाणी वाढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जजोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.
****

 हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा गजर करत देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या देहूच्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं. पुणे जिल्ह्यातल्या शेवटच्या मुक्कामी सराटी गावाजवळ नीरा नदीच्या पात्रात आज सकाळी तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. त्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखीचं स्वागत केलं. आज पालखीचा मुक्काम अकलूज शहरात आहे.

 तसंच आळंदीहून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी आज सकाळी नातेपुते येथून माळशिरस मुक्कामी जाणार आहे. तत्पूर्वी दुपारी पुरंदावडे गावात गोल रिंगण होणार आहे.
****

 दिव्यांगांना सर्वत्र सुविधा पुरवण्यासाठी, तसंच समान संधी देण्याची हमी आमचं मंत्रालय देईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. गुवाहाटीला भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. आपल्या मंत्रालयाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचे पुनरावलोकन त्यांनी केले. आसाममध्ये चार लाखांहून अधिक दिव्यांग असून, एक लाख एकोणचाळीस हजार जणांना दर महिन्याला एक हजार रुपये पेन्शन देण्यात येत आहे. दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि अर्ध सरकारी सेवांमध्ये आरक्षणही वाढविल्याचं त्यांनी यावेळी बोलतांना सांगितलं.
****

 केंद्र सरकारनं सर्व शहरी स्थानिक संस्थांना आपल्या भागात जल पुनर्भरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि किमान एक जलसाठा पुनरुज्जीवित करण्यासाठी, प्रत्येक शहरात विशेष कक्ष स्थापन करण्यासाठी सांगितलं जात आहे, असं शहरी जल संरक्षणासाठी मार्गदर्शक तत्त्वे, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं जाहीर केलं आहे. जल शक्ती अभियानाच्या पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून या दिशानिर्देशांची सुरूवात या महिन्यापासून सुरू झाली असून, यावर्षी १५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.
****

 आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पहिला उपांत्य फेरीतला सामना खेळला जाणार आहे. तर गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान दुसरा सामना खेळला जाणार आहे. तर या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. ऑस्ट्रेलियानं पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे. तर भारतानं १९८३ आणि २०११ मध्ये विश्वचषक जिंकला आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड अद्याप विश्वचषक जिंकू शकले नाहीत, असं याबातच्या वृत्तात म्हटलं आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...