आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१० जुलै २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
कर्नाटक सरकारमधल्या राजीनामे देणाऱ्या आमदारांची
भेट घेण्यासाठी वरिष्ठ काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे जलसंसाधन मंत्री डी.के.शिवकुमार
आज सकाळी मुंबईत दाखल झाले. राजीनामे देणारे हे
आमदार मुंबईतल्या हॉटेलमध्ये वास्तव्याला असून, त्यांनी काल मुंबई पोलिस आयुक्तांना
पत्र लिहून आपल्या जिवाला धोका असल्याची शक्यता व्यक्त करत, शिवकुमार यांना हॉटेलमध्ये
प्रवेश करू देऊ नये, अशी विनंती केली होती. शिवकुमार यांनी मात्र, या आमदारांची भेट
घेण्याचा निश्चय मुंबईत आल्यावर बोलून दाखवला आहे.
दरम्यान, कर्नाटक सरकारनं बहुमत गमावलं असल्यानं
यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी आज राज्यपालांकडे करायचा निर्णय भारतीय
जनता पक्षानं घेतला आहे.
****
नाशिक जिल्ह्यात बहुतांश
तालुक्यांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणचा पाणी प्रश्न
सुटत आहे. जिल्ह्यातल्या टँकर्सची संख्या चारशेवरून दोनशे अट्ठ्याण्णव वर आली असून,
दिंडोरी आणि इगतपुरी हे तालुके टँकरमुक्त झाले आहेत. जिल्ह्यात खरिपाच्या सव्वीस टक्के
पेरण्या झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यातल्या
राधानगरी तालुक्यातल्या घोटवडे इथे डंपर आणि जीपची धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण
ठार तर अन्य बारा जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज सकाळी हा अपघात झाला. राधानगरीकडून
कोल्हापूर एमआयडीसीकडे येणाऱ्या या जीपमध्ये कारखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी होते.
जखमींना कोल्हापूर इथल्या रुग्णालयात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन
तालुक्यातलं जुई धरण पूर्ण भरून वाहिलं आहे. यामुळे परिसरातल्या पंचवीस गावांचा पाणीप्रश्न
सुटला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अमरावती जिल्ह्यात सुमारे बासष्ट टक्के पेरणी पूर्ण
झाली आहे.पाऊस उशिरा झाल्यानं मूग आणि उडिदाचं क्षेत्र कमी होऊन सोयाबीनच्या क्षेत्रात
वाढ झाली असल्याचं आणि जिल्ह्यातल्या तेरा तालुक्यांमध्ये कमी पावसामुळे पेरण्या खोळंबल्या
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या जिल्ह्यातल्या तीनशे चव्वेचाळीस गावांमध्ये
अजूनही टँकर्सनं पाणीपुरवठा सुरू आहे.
*****
***
No comments:
Post a Comment