Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 10
July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० जुलै
२०१९ दुपारी १.०० वा.
****
कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष
जाणीवपूर्वक आपला राजीनामा स्वीकारत नसल्याची तक्रार करत, कर्नाटकातल्या दहा बंडखोर
आमदारांनी आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या
पीठानं या याचिकेची नोंद घेत, यावर उद्या सुनावणी घेणं शक्य आहे का, हे पाहण्याचं आश्वासन
दिलं.
दरम्यान, या आमदारांची
भेट घेण्यासाठी आज मुंबईत आलेले काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी.के.शिवकुमार,
यांना मुंबई पोलिसांनी या आमदारांची भेट घेण्यापासून रोखलं. पोलिसांनी शिवकुमार यांना
ह्या हॉटेलमध्ये प्रवेश करू दिला नाही.
दुसरीकडे भारतीय जनता
पक्षानं आज कर्नाटक विधानसभा परिसरात धरणे आंदोलन केलं. सरकारनं बहुमत गमावल्यामुळे
मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आमदारांनी केली.
भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ आज कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांची तसंच कर्नाटकच्या
राज्यपालांची भेटही घेणार आहे.
****
कर्नाटक सरकारसंदर्भातल्या
घडामोडींबाबत काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ केल्यामुळे राज्यसभेचं काम दुपारी
दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. लोकसभेतही शून्य प्रहरात काँग्रेस सदस्यांनी या
मुद्यावरून, जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला.
****
रेल्वे आणि रेल्वे स्थानकं स्वच्छ ठेवणं ही प्रवाशांचीही
जबाबदारी असल्याचं, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत
प्रश्नोत्तराच्या तासात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या
उत्तरात बोलत होते. विमानतळांच्या खासगीकरणातून विकासाच्या धर्तीवर रेल्वेस्थानकांचा
खासगीकरणातून विकास करण्याबाबत मुंडे यांनी प्रश्न विचारला होता. परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा
रेल्वेच्या धार्मिक सर्किटमध्ये समावेश करावा, अशी मागणी
खासदार मुंडे यांनी केली.
****
शेत मालासाठी रास्त भाव
मिळावेत, यासाठी सरकारनं सुरू केलेल्या ई-नाम मंचावर गेल्या तीस जूनपर्यंत एक कोटी
चौसष्ट लाखहून जास्त शेतकऱ्यांनी तसंच सुमारे सव्वा लाख व्यापाऱ्यांनी नोंदणी केली
आहे. या मंचावरून याकाळात एकूण एक्काहत्तर हजार एकोणसत्तर कोटी रुपयांचे व्यवहार झाले
आहेत.
****
अमरावती जिल्ह्यातल्या
धारणी तालुक्यातल्या, मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या टिंगरे ग्रामपंचायतीतल्या दहीहंडा
या गावातले साठ जण दूषित पाण्यामुळे आजारी झाले आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी
गावात आरोग्य छावणी उभारण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
१९४८ साली आलेल्या ‘वंदे
मातरम्’या मराठी चित्रपटाची दुर्मिळ ध्वनिचित्रफीत आज भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा
भाग बनली आहे. प्रसिद्ध लेखक आणि नाटककार पु.ल.देशपांडे यांनी या चित्रपटात पत्नी सुनिता
देशपांडे यांच्या बरोबर आघाडीची भूमिका केली होती. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि
गाणी ग.दि.माडगूळकर यांची तर संगीत सुधीर फडके यांचं आहे. सुमारे ३५ मिनिटांची ही ध्ननिचित्रफीत,
सुनिता देशपांडे यांचे भाचे दिनेश ठाकूर आणि चित्रपट अभ्यासक सतिश जकातदार यांनी राष्ट्रीय
चित्रपट संग्रहालयाकडे सोपवली. पु.ल. आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षी ही
चित्रफीत मिळणं, हा सुखद योगायोग असल्याचं संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांनी
म्हटलं आहे.
****
अहमदनगर इथं, सैन्याच्या
सरावाच्या ठिकाणाहून भंगार गोळा करणाऱ्या दोन जणांचा बॉम्बस्फोट होऊन मृत्यू झाल्याचं
वृत्त आहे. अक्षय गायकवाड आणि संदीप थिरोडे असं या दोघांचं नाव आहे. भंगारात विकण्यासाठी
या बॉम्बमधून धातू वेगळा करण्याच्या प्रयत्नादरम्यान बाँब फुटल्यानं, या दोघांचा जागीच
मृत्यू झाला.
****
जम्मूकाश्मीरमधली फुटिरतावादी
असिया अंद्राबी हिचं श्रीनगरमधलं एक घर राष्ट्रीय तपास संस्थेनं आज जप्त केलं. दहशतवाद
विरोधी कायद्याखाली ही कारवाई करण्यात आली आहे. असिया आंद्राबी सध्या तिहार कारागृहात
न्यायालयीन कोठडीत आहे.
****
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात काल पावसामुळे थांबवावा लागलेला सामना आज दुपारी तीन वाजता
पुढे सुरु होईल. न्यूझीलंड कालच्या पाच बाद दोनशे एकरा धावांवरुन पुढं डाव सुरू करेल.
न्यूझीलंडचे रॉस टेलर सदुसष्ट, तर टॉम लॅथम तीन धावांवर खेळत आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment