Wednesday, 10 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.07.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
सार्वजनिक हितासाठीच्या खर्चात कोणतीही तडजोड न करता, आर्थिक विकासाचा मार्ग दृढ करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देत होत्या. येत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूटीचं प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन पूर्णांक तीन दशांश टक्के ठेवण्याचं उद्दीष्ट असून, पायाभूत सुविधा क्षेत्रातली गुंतवणूक पुढच्या पाच वर्षांत शंभर लाख कोटी रुपयांवर नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं, त्यांनी सांगितलं. गावं, गरीब आणि शेतकरी आपल्या केंद्रस्थानी असल्याचं नमूद करत, या अर्थसंकल्पामुळे कृषी आणि सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक वाढेल, असं त्या म्हणाल्या. सर्वसामान्यांसाठी असलेल्या सर्व योजनांसाठीच्या आर्थिक तरतुदीत भरीव वाढ केली असून, अर्थसंकल्पातले सर्व आकडे प्रमाणित असल्यानं, त्याबद्दल तर्क लावू नये, असं सीतारामन यांनी नमूद केलं.
****
प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा विस्तार करण्याला केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या संदर्भातली छोटी प्राधिकरणं समाप्त करण्याचा निर्णयही आज सरकारनं घेतला. आता अशा नऊऐवजी एकच प्राधिकरण अस्तित्वात असेल. तृतीयपंथी व्यक्तींच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासंदर्भातल्या विधेयकालाही आज मंजुरी देण्यात आली. बाललैंगिक शोषण प्रतिबंधक पोस्को अधिनियम २०१२ मध्ये सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली.
****
शिर्डी विमानतळाचा विस्तार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. नवीन टर्मिनल इमारत बांधण्याचं काम पूर्ण होईपर्यंत जुन्या टर्मिनलचा विस्तार तातडीनं करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
****
पेट्रोल - डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांना कर्जमाफी - वीजबिल माफी, तसंच बेरोजगारीच्या मुद्यावरून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज औरंगाबाद इथं सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली. निवडणुका या मतपत्रिकेवरच व्हायला हव्यात अशी मागणी करत, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
****
गेल्या वर्षी खरीप हंगामासाठी शासनानं मंजूर केलेल्या दुष्काळी अनुदानाचा दुसरा टप्पा परभणी जिल्ह्यातल्या चौदा गावांना अजूनही मिळाला नसल्यानं हे अनुदान त्वरीत देण्यात यावं, अशी मागणी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन पक्षाच्या वतीनं पाथरी तहसीलदारांना आज सादर करण्यात आलं.
****
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी, बोर्डी या भागांत आज पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. आज सकाळी ९ वाजून ३ मिनीटांनी जाणवलेल्या या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर दोन पूर्णांक सहा, इतकी नोंदली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात दहा किलोमीटर खोल होता.
****
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातल्या पात्र ग्रामपंचायतींनी सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन योजनेचे प्रस्ताव येत्या पंधरा तारखेपर्यंत द्यावेत, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी केलं आहे.
****
भारतीय धावपटू दुती चंद हिनं इटलीमधे नापोली इथं झालेल्या जागतिक आंतरविद्यापीठ शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं आहे. हे पदक पटकावणारी ती पहिलीच भारतीय धावपटू ठरली आहे. चारशे मीटर ज्युनियर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमा दासनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकणारी दुती ही दुसरी महिला धावपटू ठरली आहे.
****
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी, भारताच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. रोहित शर्मा, विराट कोहली आणि के एल राहुल हे आघाडीचे फलंदाज पहिल्या काही चार षटकांतच प्रत्येकी एक एक धाव करून बाद झाले. ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्यानं संयमी फलंदाजी करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी न्यूझीलंडनं कालच्या २११ धावसंख्येवरून पुढे खेळताना, पन्नास षटकांत दोनशे एकोणचाळीस धावा केल्या. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या सहा बाद ब्याण्णव धावा झाल्या होत्या.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...