Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र
कृषी आयोग स्थापन करावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. सरकारं बदलली तरी, प्रशासकीय यंत्रणा तीच असल्यामुळे,
अंमलबजावणीतले कच्चे दुवे कायम राहतात, असे कच्चे दुवे दुरुस्त करण्याचा अधिकार या
कृषी आयोगाला असावा, ठाकरे यांनी म्हटलं आहे. पीक विमा दाव्यांची देयकं अदा न केल्याच्या
निषेधार्थ येत्या बुधवारी, मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर निषेध मोर्चा काढणार असल्याचं,
ठाकरे यांनी सांगितलं. त्यानंतरही विमा कंपन्या पीक विम्याच्या दाव्यांचा निपटारा करणार
नसेल, तर शिवसेना आपल्या भाषेत त्यांना समज देईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. सरकारच्या
कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी प्रसिद्ध करावी,
अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर इथं पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीची
पायाभरणी केली. विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन सुरु
करण्याच्या मागणीला राज्य शासन निश्चित परवानगी देईल आणि त्यासाठीचा निधीही उपलब्ध
करुन देण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अनुसूचित जाती - जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा
- अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा सिद्धतेचं प्रमाण कमी असल्याचं, सामाजिक न्याय राज्यमंत्री
अविनाश महातेकर यांनी म्हटलं आहे. आज औरंगाबाद इथं त्यांनी या कायद्यासंदर्भात मराठवाडा
विभागाची आढावा बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक न्याय
विभागांतंर्गत दरवर्षी राज्यातल्या ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
दिली जाते, या संख्येत वाढ करून, आता दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी
शिष्यवृत्ती देणार असल्याची माहिती महातेकर यांनी दिली.
****
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील गेल्या चोवीस तासांपासून
सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीलाही बसला. कसारा घाटात
एका बोगद्याबाहेर आज सकाळी मातीचा मोठा ढिगारा रेल्वे रुळावर पडल्याने मुंबई ते इगतपुरी
मार्गावरची वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या गाड्या एक
ते दीड तास उशीराने धावत आहे.
दरम्यान, मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वैतरणा जलविद्युत
प्रकल्पाच्या मुख्य दरवाजाजवळ आज सकाळी दरड कोसळली. यामुळे डोंगरावरून येणारा पाण्याचा
प्रवाह प्रकल्पात शिरल्यामुळे प्रवेशद्वारावरच्या दोन पोलीस चौक्या उध्वस्त झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या अपघातानंतर वीजनिर्मिती थांबवण्यात आली असून, सुदैवानं
या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
****
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका प्रांताधिकारी विक्रम
बादल यांच्यावर आज सकाळी वाळू माफियांनी हल्ला करुन मारहाण केली. या घटनेनंतर शिरपूर
आणि शिंदखेडा तालुक्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी निषेध करीत कामबंद आंदोलन
पुकारलं असून, पोलिस आरोपीचा शोध घेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अकोला इथं डिझेलची अवैधरित्या साठवणूक आणि विक्री केल्या
प्रकरणी पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज चार आरोपींना अटक केली. या प्रकरणी टँकर
सह २५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात आज दुपारी बहुतांश भागात जोरदार पाऊस
झाला. खरीपाच्या पिकांसाठी हा पाऊस पोषक असल्यानं, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत
आहे.
नांदेड शहरासह जिल्ह्यातही आज दुपारी जोरदार पाऊस झाल्याचं,
आमच्या वार्ताहरालं कळवलं आहे. औरंगाबाद शहर परिसरात आज सकाळपासून पावसाच्या तुरळक
सरी कोसळत आहेत.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला मारहाण
केल्याप्रकरणी आमदार विजय भांबळे यांच्यावर कारवाई करावी, तसंच संबंधित कर्मचाऱ्याविरोधात
दाखल केलेला ॲट्रोसिटीचा गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी संभाजी सेनेच्यावतीने आज परभणी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.
****
आषाढी एकादशी उद्या साजरी होत आहे. पंढरपूर इथं, उद्या
पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होईल. एकादशीच्या पार्श्वभूमीवर
राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधून निघालेल्या पायी दिंड्या आणि पालखी सोहळे पंढरपुरात
दाखल होत आहेत.
****
No comments:
Post a Comment