Saturday, 6 July 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 06.07.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर आणि भाजपच्या इतर मागासवर्गीय कक्षाचे सदस्य जुगलकिशोर ठाकोर गुजरातमधून राज्यसभेची निवडणूक जिंकले आहेत. जयशंकर यांनी काँग्रेसच्या गौरव पांड्या यांचा तर ठाकोर यांनी काँग्रेसच्याच चंद्रिका चुडासामा यांचा पराभव केला. १०० सदस्यसंख्या असलेल्या भाजपला १०४ मतं मिळाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. काँग्रेसचे बंडखोर अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला यांनी तसंच भारतीय ट्राईबल पार्टी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्यानं भाजपला मतदान केलं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री अमित शाह आणि स्मृती इराणी निवडून आल्यानं राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या.
****
अमेरिकेच्या उद्योग जगताने अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पहिल्या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. हा अर्थसंकल्प केवळ सर्वसमावेशकच नसून गूंतवणूक आकर्षित करणारा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे. या अर्थसंकल्पामुळे अमेरिकन कंपन्यांना गूंतवणूक करण्यासाठी मोठी संधी निर्माण झाला असल्याचं अमेरिका-भारत भागीदारी मंचाचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत संरचनात्मक बदल होण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचं ते म्हणाले. तर हा अर्थसंकल्प आशावादी आणि सुधारणावादी असल्याचं अमेरिका भारत उद्योग परिषदेच्या अध्यक्षा निशा देसाई बिस्वाल यांनी म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत कुरखेडा तालुक्यात झालेल्या भूसुरुंगस्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था-एन आय ए नं आपल्या हाती घेतला आहे. एनआयएचं पथक जिल्ह्यात दाखल झालं आहे. हे पथक भूसुरुंगस्फोटासंबंधीचे महत्वाचे दस्तवेज आणि माहिती गोळा करत असून, नुकतीच त्यांनी घटनास्थळालाही भेट दिली. या प्रकरणातला एक आरोपी व्यावसायिक कैलास प्रेमचंद रामचंदानी यालाही अटक झाली आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष आहे.
****
नांदेड जिल्ह्यात गोदावरी शुध्दीकरण कामासाठी २० कोटी रूपयांचा निधी पालकमंत्री रामदास कदम यांनी आज मंजूर केला आहे. नांदेड जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आज कदम यांनी आपल्या अधिकारातून हा निधी मंजूर करत असल्याचं सांगितलं. या बैठकीत मार्च २०१९ पर्यंतचा योजनानिहाय खर्चाचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार सर्वसाधारण योजनेसाठी मंजूर असलेल्या २४ कोटी ७९ लाख रुपयांपैकी शंभर टक्के निधी खर्च झाल्याचं सांगण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यात जून अखेर पावसाला सुरुवात झाल्यानं उशिरा पेरणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण खरीपाचे सरासरी क्षेत्र असलेल्या सात लाख २२ हजार हेक्टरपैकी तीन लाख हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख पन्नास हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली आहे. तर उर्वरित क्षेत्रावर सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, उडीद पेरणी करण्यात आली आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६६६ मिलिमीटर असून आतापर्यंत सरासरीच्या फक्त ११ टक्के एवढाच पाऊस पडला आहे. जिल्ह्यातला पाणीसाठा संपला असल्यानं जिल्ह्यातले नागरिक पाणी टंचाईचाही सामना करत आहेत.
****
आमदार नितेश राणे यांनी बांधकाम विभागातल्या अभियंत्यास चिखलानं आंघोळ घातल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी धुळे इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागातल्या अभियंत्यांनी दोन दिवसाच्या सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कालपासून बांधकाम भवनातले ४० अभियंते सामूहिक रजेवर असल्यानं या विभागाचं कामकाज ठप्प झालं आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडकर यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी चिखल फेकला. या घटनेचा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महासंघानं निषेध नोंदवला आहे.
****
केंद्र आणि राज्य सरकारच्या गृहनिर्माण योजना सक्षमपणे राबवून अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रत्येक गरिबाला घरकुल देणाचा प्रयत्न राहील असं प्रतिपादन अहमदनगर दक्षिणचे नवनियुक्त खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल सोडतीच्या शुभारंभ प्रसंगी आज ते बोलत होते. घरकुल न मिळाल्यास नाराज न होता पुन्हा अर्ज करण्याचं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केलं.
****
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा शेवटचा साखळी सामना श्रीलंकेसोबत सुरु आहे. नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेनं ४१ षटकांत पाच गडी गमावून २०६ धावा केल्या होत्या. 
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...