Monday, 20 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.01.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****

 निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला एक दोषी पवन गुप्ता, याची याचिका र्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. गुन्हा घडला तेंव्हा किशोरवयीन होण्याचा दावा या दोषीनं एका याचिकेतून केला होता. दिल्ली उच्च न्यायालयानं त्याचा हा दावा फेटाळला होता, या निर्णयाविरोधात त्यानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणातील चारही दोषींना येत्या एक फेब्रुवारी रोजी फाशी देण्यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. 
****

 भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची आज सर्वानुमते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. भाजपचे निवडणूक प्रभारी राधामोहन सिंह यांनी त्यांना ही निवड झाल्याचं प्रमाणपत्र दिलं. हिमाचल प्रदेशचे रहिवासी असलेले नड्डा यांची गेल्या वर्षी जुलै महिन्यात पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका संदेशाद्वारे त्यांचं अभिनंदन केलं आहे. 
****

 राज्यात आता महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे, त्यामुळे नागरिकत्व कायदा लागू केला जाणार नाही, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मागील आठवडाभरापासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे. या आंदोलन स्थळाला मंत्री अशोक चव्हाण यांनी भेट दिली, यावेळी ते बोलत होते.
****

 राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या हिंगोली शाखेतर्फे आज विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या राज्यभरातल्या जवळपास साठ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न, निवृत्ती वेतन, सुधारीत किमान वेतन आणि भविष्य निर्वाह निधी रक्कम, कामगार भविष्यनिर्वाह निधी संघटन (ई.पी.एफ.) जमा करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलं आहे.
****

 मराठवाडा साहित्य परिषदेचं एक्केचाळीसावं मराठवाडा साहित्य संमेलन नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथं येत्या मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षांची लवकरच निवड केली जाईल आणि कार्यक्रम पत्रिका तयार केली जाईल, अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.
****

 लातूर इथं जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत दोनशे बत्तीस कोटी रुपये निधी मंजूर  झाला असून त्यापैकी सुमारे साडे ८५ कोटी रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजना २०१९-२० अंतर्गत विकास निधीचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ही माहिती दिली.
****

 स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद इथं आज जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयात आज तोडफोड केली. खरीप पीक विम्यातून वगळण्यात आल्यानं कार्यकर्त्यांनी ही मोडतोड केली, मात्र अद्याप या प्रकरणी कारवाई झाली नसल्याचं, केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 साईबाबांचं जन्मस्थळ असलेल्या पाथरीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला शंभर कोटी रुपये निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी, भाजपचे परभणी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं.
****

 राष्ट्रीय लसीकरण दिनाच्या औचित्यानं औरंगाबाद इथं आज मिशन इंद्रधनुष्य विषयावर गीत आणि नाट्य कलापथकांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाचा फिल्ड आऊटरिच ब्यूरो आणि आरोग्य विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत लसीकरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी लोककलांचं महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं.
****

 पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत औरंगाबाद शहरात पहिल्याच दिवशी एक लाख चोपन्न हजार तिनशे त्र्याहत्तर बालकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. तसंच औरंगाबाद जिल्ह्यात तीन लाख पंधरा हजार नऊशे बारा बालकांना पोलिओ लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली. ही मोहिम आगामी सहा दिवस राबविण्यात येणार आहे.
****

 नगरसोल ते नांदेड ही रेल्वे उद्या परभणी ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तसंच काचीगुडा ते नरखेड इंटर सिटी एक्स्प्रेस, काचीगुडा ते मनमाड प्रवासी गाडी, अकोला ते काचीगुडा इंटर सिटी एक्स्प्रेस आणि मनमाड ते काचीगुडा प्रवासी गाडी या गाड्या उशिरानं धावणार आहेत. लिंबगाव ते चुडावादरम्यान रेल्वेमार्गाच्या कामासाठी तीन तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं, हा बदल करण्यात आला आहे.

 दरम्यान, नांदेड-तिरूपती-नांदेड या विशेष रेल्वेला उद्यापासून एक एप्रिलपर्यंत दोन शयनयान श्रेणी आणि एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत डबा जोडण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे.
****

 नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं काल 2013 - 2014 चे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरीत करण्यात आले. या पुरस्कारासाठी तालूक्यातून दरवर्षी एक या प्रमाणे सोळा तालुक्यांतील पाच वर्षांतल्या सर्व म्हणजे ऐंशी ग्राम सेवकांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...