Monday, 20 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 20.01.2020 TIME - 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 January 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२० जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** परीक्षा पर चर्चा कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार
** मराठवाड्यात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तत्काळ कारवाईची विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची सूचना
** मराठी बडबडगीतांची लय जीवनाशी निगडित - ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांचं प्रतिपादन
आणि
** तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताचा मालिकाविजय
****
परीक्षा पर चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. देशभरातले सुमारे अडीच हजारावर विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नांदेड इथली विद्यार्थिनी ऐश्वर्या मुंडकर हिचा यामध्ये समावेश आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक असून, हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण असेल, या शब्दात ऐश्वर्याने आकाशवाणी प्रतिनिधीशी बोलताना आपली भावना व्यक्त केली. ती म्हणाली....

परिक्षा पे चर्चा हा अतिशय चांगला व व्यापक कार्यक्रम आहे. परिक्षा फक्त गुण मिळविण्याची घोडदौड आहे. हा समज दुर सारून त्याबद्दल सकारात्क वातावरण निर्माण करण्याचा हा यशस्वी प्रयत्न आहे. माझी आजी भागिरथीबाई मुंडकर तिला याबाबतीच कळता तिच्या आनंदाला परावर नव्हता त्यामुळे सुध्दा माझा आनंद द्विगुणी झाला हा माझा साठी हा सणस्मरणीय अनुभव असेल.

पंतप्रधानांनी या विषयात लक्ष घातल्यामुळे, या विषयाला योग्य न्याय मिळत असल्याची प्रतिक्रिया, ऐश्वर्याचे वडील गोविंद मुंडकर यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले...

परिक्षा ही दडपणाची, नैराश्यची आणि ताण – तणावाची न राहता आणि ज्ञानवर्धक तसेच सकारात्क वाढण्याची कशी ठरू शकते हे यानिमित सर्वत्र प्रचार आणि प्रसार होत आहे आणि वैचारिक बदल घडून दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुढाकार घेतला असल्या कारणाने या अत्यंत महत्त्व पूर्ण विषयाला योग्य मिळतो  आहे.

आज सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे.
****
आरोग्यविषयी प्रतिबंधात्मक आणि प्रबोधनात्मक सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातली सर्व उपकेंद्रं, प्राथमिक आरोग्य केंद्रं तसंच नागरी आरोग्य केंद्रांचं आरोग्यवर्धिनी केंद्रांत रूपांतर केलं जात आहे. अशाप्रकारची साडे सहा हजार आरोग्यवर्धिनी केंद्रं तयार केली जात असून, मार्च अखेर ही सर्व केंद्रं कार्यान्वीत होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात उस्मानाबादसह चार आकांक्षित जिल्हे तसंच लातूर, नांदेड, हिंगोली आणि अहमदनगर सह १९ जिल्हयात तर दुसऱ्या टप्प्यात जालना, बीड, परभणी सह उर्वरित जिल्ह्यात ही केंद्रं सुरू होणार असल्याचं, टोपे यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात कारवाईची सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. औरंगाबाद इथं गतिमंद मुलीच्या विनयभंगाचा प्रकार समोर आला आहे, या प्रकरणी पोलिसांनी एका महिन्याच्या आत आरोपपत्र दाखल करुन, सक्षम महिला वकील देण्यासाठी पावलं उचलावीत, असं गोऱ्हे यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना  लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
नांदेड जिल्ह्यात शंकरनगर इथल्या माध्यमिक शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात, संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवावा, मनोधैर्य योजनेतंर्गत पीडीत मुलीला मदत मिळवून देण्याच्या दृष्टीनं कार्यवाही करावी, अशी सूचना नीलम गोऱ्हे यांनी नांदेडचे पोलीस महानिरिक्षक मनोज लोहिया यांना पत्राद्वारे केली आहे.
****
प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचं काल निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या कोकण कड्यावरून शनिवारी रॅपलिंग करत असताना सावंत बेपत्ता झाले होते, बचाव पथकाला काल त्यांचा मृतदेह सापडला. सावंत हे प्रमुख असलेल्या या मोहिमेत ३० गिर्यारोहक सहभागी झाले होते. रॅपलिंगसाठी दोर लावताना हा अपघात झाल्याचा अंदाज आहे.
****
हिंगोली इथले ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. जी. आर. गांजापूरकर याचं काल जालना इथं प्रदीर्घ आजारानं निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. अनेक सेवाभावी संस्था, संघटनांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला होता.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल सर्वत्र राबवण्यात आली. जालना इथं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, लातूर इथं संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, नांदेड इथं आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या हस्ते, उस्मानाबाद इथं आमदार कैलास पाटील तसंच जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते, परभणी इथं महापौर अनिता सोनकांबळे, हिंगोली आमदार तानाजी मुटकुळे, तर औरंगाबाद इथं महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते पोलिओ डोस पाजून या लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यात ३ लाख १५ हजार ९१२ बालकांना पोलिओ डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली. ही मोहिम आगामी सहा दिवस राबवण्यात येणार आहे.
****
मराठी बडबडगीतांची लय आपल्या जीवनाशी निगडित असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी केलं आहे. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या औरंगाबाद शाखेनं काल घेतलेल्या बालसाहित्यिक मेळाव्याचं उद्घाटन रसाळ यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. बडबड गीतांचं महत्त्व सांगताना रसाळ म्हणाले....

आपडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडू तेल  पाडू , इंथे इंथे नाच रे मोरा सारखी वेगवेगळी बालगीत हे संस्कृतींनी निर्माण केलेली आहेत ही लोक गीत आहेत आपण एका विशिष्ट वातावरणामध्ये त्यांना वेगळ्या संस्कृती जगायला भाग पाडत आहोत आणि हे जर थांबवायचं असेल तर माझा दृष्टीने बाल साहित्य ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.

ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे, बाबा भांड यावेळी उपस्थित होते. जीवन विकास ग्रंथालयात सुरू करण्यात आलेल्या बालसाहित्य दालनाचं उद्घाटन बोराडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या मेळाव्यात निमंत्रितांचं कवीसंमेलन, कथाकथन, बालमेळावा, बालसाहित्य प्रदर्शनासह मराठवाड्यातल्या बालसाहित्यिकांचा कौतुक सोहळाही झाला.
****
अखिल भारतीय बालकुमार साहित्य परिषदेच्या औरंगाबाद जिल्हा शाखेच्या उद्घाटनानिमित्त काल औरंगाबाद इथं बालरसिकांसाठी काव्यमैफल घेण्यात आली. परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रशांत गौतम यांच्या अध्यक्ष तेखाली झालेल्या या मैफिलीत मान्यवर कवींनी सादर केलेल्या कवितांना बालरसिकांची दिलखुलास दाद मिळाली.
****
परभणी इथं काल पाचवी विवेक जागर परिषद झाली. ’समकालीन भारतीय समाज आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावरच्या या परिषदेत ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, यांचं 'लोकशाही समाजव्यवस्था : जात, धर्म, वास्तव आणि माध्यमं' या विषयावर व्याख्यान झालं. प्रसिद्ध लेखक आसाराम लोमटे मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले, राजन क्षीरसागर यांचीही या परिषदेत विविध विषयांवर व्याख्यानं झाली.
****
परिवर्तनवादी चळवळ जगवायची असेल तर फुले-आंबेडकरी विचारांचा अंकूर जपून ठेवणं आवश्यक आहे, असं मत डॉक्टर संजय मून यांनी व्यक्त केलं. ते काल औरंगाबाद इथं रमाई धम्मदृष्टी स्मारक समितीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. आंबेडकर चळवळीच्या साहित्यातल्या योगदानबद्दल दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदा एकनाथ खिल्लारे आणि धनराज गोंडाणे यांना काल मून यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
****
ऑस्ट्रेलियासोबतच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत काल भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव करत, मालिका दोन एकनं जिंकली. बंगरुळू इथं झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत २८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं हे लक्ष्य अठ्ठेचाळीसाव्या षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. सामन्यात ११९ धावा फटकावणारा भारताचा रोहीत शर्मा सामनावीर तर कर्णधार विराट कोहली मालिकावीर किताबाचा मानकरी ठरला.
****
गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं आतापर्यंत ५२ सुवर्णपदकं जिंकत पदकतालिकेत वर्चस्व कायम राखलं आहे. सतरा वर्षांखालील खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने सुवर्ण पदक मिळवलं, भारोत्तोलनात किरण मराठे आणि अभिषेक निप्पणे यांनी दोन सुवर्ण पदक जिंकली.
****
परभणी शहरात काल प्रदूषण मुक्त शहरासाठी सायक्लॉथॉन स्पर्धा घेण्यात आली. ८०० सायकलस्वारांनी या स्पर्धेत सहभागी होत निरोगी आयुष्य आणि प्रदूषण मुक्त शहराचा संदेश दिला. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकास सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं जनतेच्या हिताची कामं करावीत, असं आवाहन पालकमंत्री गडाख यांनी यावेळी केलं.
****



No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...