Tuesday, 18 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 18.04.2017 - 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 April 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा.

*****

धर्मावर आधारित आरक्षण हे घटनाबाह्य असल्यानं, राष्ट्राच्या हिताचं नाही, असं केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते भोपाळ इथं एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. धार्मिक आधारावर आरक्षण देण्यास भाजपचाही विरोध असल्याचं, नायडू म्हणाले. मात्र आर्थिक तसंच शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षण देण्यात आपल्या पक्षाचा विरोध नसल्याचं, नायडू यांनी स्पष्ट केलं.

****

केंद्र सरकारनं पत्रकार कायद्याची व्याप्ती वाढवून त्यात इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांनाही समाविष्ट करण्याठी उपाययोजना सुरु केल्या असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी सांगितलं. कोची इथं वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. गरज पडली तर या कायद्यात संशोधन करुन आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, असं ते म्हणाले.  

****

देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या विधीज्ञ फरहा फैज यांनी दाखल केलेल्या या याचिकेत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तसंच खाप पंचायती सुनावत असलेले निर्णय देशाच्या घटनेची खिल्ली उडवणारी असतात, त्यामुळे धार्मिक कट्टरता संपवून सर्व धर्मियांना एकच समान कायदा लागू करावा, असं म्हटलं आहे.

****

नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारला आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश द्यावेत, असं या याचिकेत म्हटलं आहे.

****

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या खासदार, आमदारांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं आहे. या संदर्भात याचिकेच्या सुनावणी दरम्यान, केंद्र सरकारनं आजच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात पुढची सुनावणी १२ जुलै रोजी होणार आहे.

****

नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी पाच दिवसाच्या भारत दौऱ्यावर आल्या असून, त्यांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं. विद्यादेवी भंडारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

****

चित्रपटांच्या प्री सेन्सॉरशिपसाठी दिशानिर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर न्यायालयानं सूचना आणि प्रसारण मंत्रालय आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाला नोटीस जारी करुन उत्तर देण्यास सांगितलं आहे. दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या विषारी दारु प्रकरणाचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभाग - सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीनं करण्याची मागणी केली होती, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा तपास सीआयडीकडे वर्ग केला आहे. पांगरमल इथं निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या कार्यक्रमात विषारी दारु सेवनाने नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

****

पुण्यात बेजबाबदारपणे गाडी चालवून दोन पादचाऱ्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. काल बाणेर परिसरात या महिलेनं रस्ता दुभाजकावर उभ्या असलेल्या पाच पादचाऱ्यांना धडक मारली होती, यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला.

****

वनरोपणाच्या विविध योजना राबवून राज्याचं सध्याचं २१ टक्क्यांचं वनक्षेत्र हे राखीव वनधोरणाप्रमाणे ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न वनविभागामार्फत करण्यात येत आहे. या योजनेत वनीकरण, वैरण संपत्तीचा विकास, किरकोळ जंगल उत्पन्नाचा विकास यासारख्या काही उपक्रमांचं समावेश आहे.

****

राज्य शासनाचा ‘सहकार भुषण’ पुरस्कार यंदा धन्वंतरी पतसंस्थेला जाहीर झाला आहे. धन्वंतरी पतसंस्था ही वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यवसायीकांनी मिळून सर्वांसाठी स्थापन करून चालवलेली राज्यातली एकमेव संस्था असून, आपल्या सभासदांना उत्तम आणि जलद सेवा देण्याकरता प्रसिध्द आहे. येत्या २६ एप्रिलला राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

//******//

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...