Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 18 April 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
किंगफीशर कंपनीचा मालक विजय मल्ल्या
याला लंडन इथं स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी आज अटक केली. मल्ल्या यास वेस्टमिन्सटर न्यायालयात
हजर करण्यात आलं, न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला. भारतातल्या विविध बँकांचं सुमारे
९ हजार कोटी रुपये कर्ज थकवल्याचा मल्ल्या याच्यावर आरोप आहे. गेल्या वर्षी दोन मार्च
रोजी भारतातून पळून गेलेल्या मल्ल्याविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं
गेल्या जानेवारी महिन्यात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं.
****
यावर्षी देशभरात मोसमी पावसाचं प्रमाण
सामान्य राहणार असून, एकूण वार्षिक सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान
खात्यानं वर्तवला आहे. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी
ही माहिती दिली. नैऋत्य मोसमी पावसाच्या केरळमध्ये प्रवेशाबाबत मे महिन्याच्या चौथ्या
आठवड्यात, तर पावसाच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जून महिन्यात सादर होणार असल्याचं
यावेळी सांगण्यात आलं.
****
राष्ट्रगीताच्या सन्मानात कोणतीही
तडजोड होऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयानं, संसद, विधीमंडळ,
शासकीय कार्यालयं तसंच शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रगीत तसंच राष्ट्रीय गीत वाजवण्यासंदर्भात
केंद्र सरकारला नोटीस बजावली, त्यात ही बाब नमूद केली आहे. चित्रपटगृहात राष्ट्रगीत
वाजवलं जात असताना, दिव्यांगांना यापूर्वीच उभं राहण्यापासून सूट दिली असल्याचं, न्यायालयानं
म्हटलं आहे.
****
वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर
नाईक याच्या एका सहकाऱ्याविरोधात सक्तवसुली संचालनालयानं गुन्हा दाखल केला आहे. आमिर
गजदार असं या व्यक्तीचं नाव असून त्याच्याविरुद्ध
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झाकीर नाईक आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात
अवैध कारवाया आणि चिथावणीखोर भाषणं करून विविध धार्मिक सुमदायांमध्ये तेढ निर्माण करणं
आणि वैमनस्य वाढवण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
****
जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाचं काम २०१८ पासून सुरू होणार
आहे. आज मुंबईत फ्रान्सच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन,
ही माहिती दिली. दहा हजार मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेच्या
या प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२५ पर्यंत सुरू होईल, या विजेचे दर परवडणारे असतील, असंही
यावेळी सांगण्यात आलं.
या प्रकल्पात स्थानिक उद्योगांना सहभागी करून घेतलं जाणार
असून, प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती करावी, स्थानिकांशी सुसंवाद साधावा, अशी
सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मेक इन महाराष्ट्रच्या धर्तीवर हा प्रकल्प राबवला
जाणार असून, प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा यंत्रणा बसवली जाणार आहे.
****
राज्याच्या ग्रामीण भागात परसातल्या कुक्कुट
पालनाला प्रोत्साहन देणं तसंच आदिवासी
भागातल्या अंगणवाड्यांत बालपोषण आहारात
अंडी पुरवठा करण्यासाठी आगामी दोन वर्षांसाठी स्वयम्
प्रकल्प राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
नांदेडसह राज्यातल्या १६ जिल्ह्यात हा प्रकल्प राबवण्यात
येणार आहे.
खासगी-अशासकीय संस्था अथवा व्यक्ति यांच्याकडून धार्मिक
आणि धर्मादाय प्रयोजनांसाठी निधी अथवा देणगी संकलित करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक
विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मध्ये आवश्यक सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागांतर्गत तंत्रनिकेतन महाविद्यालयांसाठी
राबवल्या जाणाऱ्या दोन शिष्यवृत्ती योजनांच्या लाभांची रक्कम आता थेट विद्यार्थ्यांच्या
आधार कार्ड संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात
आला.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीची निवड आज
अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. बांधकाम आणि अर्थ सभापतीपदी
समाधान जाधव, कृषी आणि पशु संवर्धन सभापतीपदी दत्तू रेड्डी, शिक्षण आणि आरोग्य समिती
सभापतीपदी माधव मिसाळे, महिला आणि बालकल्याण सभापतीपदी मधुमती कुंटुरकर तर समाज कल्याण
समिती सभापतीपदी शिला निखाते यांची निवड करण्यात आली.
****
परभणी, लातूर आणि चंद्रपूर इथं महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. लातूर इथं पालिकेच्या ७० जागांसाठी ४०७ उमेदवार तर
परभणीत ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात आहेत. वाढत्या उन्हामुळे निवडणूक विभागानं
मतदानाची वेळ एका तासानं वाढवून दिली असून, मतदारांना सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत
मतदान करता येणार आहे.
****
राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना मारहाण
प्रकरणी भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांना २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात
आली आहे, गायकवाड यांना काल औरंगाबाद इथं मारहाण झाली होती.
****
No comments:
Post a Comment