Wednesday, 19 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 19.04.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 April 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ एप्रिल २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      देशात यंदा पावसाचं प्रमाण सामान्य राहणार; वार्षिक सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज

·      राष्ट्रगीताच्या सन्मानात कोणतीही तडजोड नाही - सर्वोच्च न्यायालय

·      अहमदनगर-बीड-परळी, आणि वर्धा-नांदेड, या नव्या रेल्वे मार्गांसाठीचं भूसंपादन पूर्ण करुन जमीन रेल्वेकडे हस्तांतरित करण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश

आणि

·      परभणी आणि लातूर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान

****

यावर्षी देशभरात मोसमी पावसाचं प्रमाण सामान्य राहणार असून, जून ते सप्टेंबर या काळात एकूण वार्षिक सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होईल, असा प्राथमिक अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. गेल्या वर्षी या काळात ९७ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. काल दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. नैऋत्य मोसमी पावसाच्या केरळमध्ये प्रवेशाबाबत मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात, तर पावसाच्या दुसऱ्या टप्प्याबाबतचा अंदाज जून महिन्यात सादर केला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

****

राष्ट्रगीताच्या सन्मानात कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयानं, राष्ट्रगीतासंदर्भात एक धोरण आखण्याची मागणी करणाऱ्या याचिकेसंदर्भात केंद्र सरकारला चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे. या याचिकेत कामकाजाच्या दिवशी संसद, विधीमंडळ, शासकीय कार्यालयं तसंच शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रगीत तसंच राष्ट्रीय गीत वंदे मातरम् वाजवलं जावं, अशी मागणी केली आहे. चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवलं जात असताना, दिव्यांगांना यापूर्वीच उभं राहण्यापासून सूट दिली असल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे.

****

लैंगिक अत्याचारातून जन्माला येणाऱ्या बालकांसाठी सरकारची एखादी योजना अस्तित्वात आहे का, असं मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारलं आहे. यासंदर्भातल्या एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं, मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडितेला दिली जाणारी आर्थिक मदत तीन लाख रुपयांवरून दहा लाख रुपयांपर्यंत वाढवता येईल का, तसंच ती पूर्वलक्षी प्रभावानं लागू करता येईल का, असं विचारलं आहे. यासंदर्भात महिला बाल कल्याण विभागाच्या सचिवांनी उद्या २० तारखेला न्यायालयात हजर राहून, माहिती देण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

****

राज्यातल्या अहमदनगर-बीड-परळी, आणि वर्धा-नांदेड, या नव्या रेल्वे मार्गांसाठीचं भूसंपादन येत्या जुलैअखेर पर्यंत पूर्ण करुन ही जमीन रेल्वेकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत काल यासंदर्भात बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात १ लाख ३६ हजार कोटी रुपयांची रेल्वे प्रकल्पांची कामे मंजूर किंवा सुरू असल्याचं सांगत, या कामांना गती देण्याचे निर्देश प्रभू यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.

****

राज्याच्या ग्रामीण भागात परसातल्या कुक्कुट पालनाला प्रोत्साहन देणं तसंच आदिवासी भागातल्या अंगणवाड्यांत बालपोषण आहारात अंडी पुरवठा करण्यासाठी आगामी दोन वर्षांसाठी स्वयम् प्रकल्प राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. नांदेडसह राज्यातल्या १६ जिल्ह्यात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

****

मराठवाड्यात संकरित २७-४० या वाणाच्या तुरीच्या झाडांना शेंगा न आल्यानं, बाधीत शेतकऱ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी या मुद्याकडे लक्ष वेधलं. राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत गेल्या वर्षी हे वाण शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं होतं. मात्र रोपट्यांची वाढ होऊनही शेंगा न आल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या पिकांचे पंचनामे होऊनही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मदत मिळालेली नाही.

****

राज्यात पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबवलं जाणार असून, या अभियानाची, पथदर्शी, आरोग्य पूर्व तपासणी मोहिम येत्या एक मे पासून राज्यातल्या सहा जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. यामध्ये बीडसह नाशिक, पालघर, अकोला, चंद्रपूर आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातल्या गरीब, गरजू रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देऊन स्वस्थ महाराष्ट्र घडवण्यासाठी ही योजना राबवली जाणार असल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.

****

शेतकरी कर्जमाफीसाठी काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा काल नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात समारोप झाला, यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

परभणी, लातूर आणि चंद्रपूर इथं महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. वाढत्या उन्हामुळे निवडणूक विभागानं मतदानाची वेळ एका तासानं वाढवून दिली असून, मतदारांना सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. सकाळी साडे सात वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल.

लातूर इथं पालिकेच्या ७० जागांसाठी ४०७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शहरात एकूण ३७१ पैकी ८९ मतदान केंद्र संवेदनशील असून, त्याठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तसंच सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. पोलिस दलाच्या मोठ्या बंदोबस्तासह फिरती पोलिस पथकंही मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेऊन असतील.

परभणी इथं ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात असून २८१ मतदान केंद्रांवर दोन लाख बारा हजारावर मतदार मतदानाचा अधिकार बजावतील. मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

या मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून, उन्हाचा तडाखा लक्षात घेता, प्रथमोपचारासह रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्याचं, राज्याचे निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी काल मुंबईत सांगितलं.

मतमोजणी परवा २१ तारखेला होणार आहे.

****

नांदेड जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींचं खातेवाटप काल करण्यात आलं. बांधकाम आणि अर्थ समिती सभापतीपदाचा कार्यभार समाधान जाधव यांच्याकडे, कृषी आणि पशूसंवर्धन समिती - दत्तू रेड्डी, शिक्षण आणि आरोग्य समिती - माधव मिसाळे, महिला आणि बालकल्याण समिती - मधुमती कुंटुरकर तर समाज कल्याण समिती सभापतीपदाचा कार्यभार शिला निखाते यांच्याकडे सोपवण्यात आला.

****

राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना मारहाण प्रकरणी भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांना २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, गायकवाड यांना परवा, सोमवारी औरंगाबाद इथं सुभेदारी विश्रामगृह परिसरात मारहाण झाली होती.

****

भगवान गडाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असं ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या काल शिरूर कासार तालुक्यात वारणी इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी ३७ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केल्याबद्दल मुंडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

****

परळी तालुक्यातल्या नागरिकांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी वाण धरणातून एक दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नागरिकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केलेल्या मागणीची दखल घेऊन नदीपात्रात पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनानं दिले. नागापूर, पांगरी, लिंबोटा, सफदराबाद आदी गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे. वाण धरणात सध्या क्षमतेच्या ४१ टक्के म्हणजे आठ पूर्णांक ४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.

****

सेंद्रीय खत निर्मितीबाबत कृषी विभागानं शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केलं आहे. १८ दिवसांत तयार होणाऱ्या या सेंद्रीय खताचं, जनसाथी दुष्काळ निवारण मंच अंतर्गत कलापंढरी संस्थेनं, काल जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रात्यक्षिक सादर केलं, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. कृषी विभागाच्या सहकार्यानं गावोगावी अशी प्रात्यक्षिक घ्यावीत, असं पोले यांनी सांगितलं.

****

रासायनिक खत विक्रीसाठी राज्यात थेट लाभ हस्तांतरण योजना राबवली जाणार आहे. त्यानुसार येत्या एक जूनपासून पीओएस प्रणालीद्वारे खतविक्री होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करताना, आधार क्रमांक देणं आवश्यक असेल. प्रत्येक शेतकऱ्याला खताची गोणी मिळाल्यानंतरच खत कंपनीला अनुदान मिळणार आहे.

//*******//








No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...