Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 AUG. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** एकाहत्तराव्या
स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन
** लिंगभेद किंवा धर्मभेद न
करणारा नवभारत निर्माण करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन
** देशभरातल्या ९९० पोलिस
अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना पोलीस पदकं जाहीर; राज्यातल्या ५६ जणांचा समावेश
** शेतकरी संघटनांच्या सुकाणू
समितीच्या वतीनं काल राज्यभरात चक्काजाम आंदोलन
आणि
** श्रीलंकेविरुद्धची कसोटी
क्रिकेट मालिका भारतानं तीन शून्य नं जिंकली
****
एकाहत्तरावा स्वातंत्र्य दिन आज साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाचा
मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत
आहे.
****
औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय
ध्वजारोहण ,
पालकमंत्री
रामदास कदम यांच्या हस्ते होणार आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अर्जून
खोतकर यांच्या हस्ते,
तर
लातूर इथं,
जिल्हा
क्रीडा संकुलावर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
होणार आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्तानं
मराठवाड्यात सर्वत्र विविध सामाजिक संस्था, तसंच शैक्षणिक संस्थांच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमांसह अनेकविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
लिंगभेद किंवा धर्मभेद न करणारा नवभारत निर्माण करण्याचं आवाहन, राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. देशाच्या ७१ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला
राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ते काल बोलत होते.
२०२२ मध्ये आपला देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करेल. तोपर्यंत 'नवीन भारतासाठी'
महत्वपूर्ण उद्दिष्टं साध्य करण्याचा आपला 'राष्ट्रीय संकल्प' आहे. नव्या भारतात प्रत्येक
व्यक्तीच्या क्षमतेचा पूर्ण विकास होईल, आणि ती व्यक्ती समाज तसंच राष्ट्रासाठी योगदान
देऊ शकेल, असं राष्ट्रपती म्हणाले. नागरिक आणि सरकार यांच्यातल्या सशक्त भागीदारीच्या
बळावर 'नवीन भारताची' ही उद्दिष्टं आपण नक्कीच साध्य करू शकू, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.
नोटबंदीनंतर देशात प्रामाणिक वृत्तीला प्रोत्साहन मिळाल्याचं नमूद
करतानाच, राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात वस्तू सेवा कर प्रणालीसह, स्वच्छ भारत अभियान,
बेटी बचाओ-बेटी पढाओ, आदी योजनांचाही उल्लेख केला.
****
स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातल्या
९९० पोलिस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना, पोलीस पदकं जाहीर झाली असून,
त्यात राज्यातल्या
५६ जणांचा समावेश आहे. यापैकी १२ पोलिसांना पोलीस वीरता
पदक, तीन पोलिसांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती
पोलीस पदक आणि ४१ पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठीचं पोलीस पदक जाहीर झालं आहे. ज्या ४१
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्तम सेवेसाठी पोलीस पदकं जाहीर झाली आहेत, यामध्ये औरंगाबादचे
राज्य राखीव पोलिस दलाचे कमांडंट निसार तांबोळी, गुप्तवार्ता अधिकारी रघुनाथ फुके,
सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे, जालना इथले सहायक पोलिस उपनिरीक्षक मदन गिते, आणि
राज्य राखीव पोलिस दलाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर परदेशी यांचा समावेश आहे.
****
दुष्काळ निवारणार्थ अर्थसहाय्याचं वाटप व्यवस्थित
होण्यासाठी, शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या
सातबाराला जोडावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत
दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या बैठकीत बोलत होते. कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची
माहिती, आधार क्रमांकाशी जोडली जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण
योजनेअंतर्गत मदतीचं वितरण करता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
करुन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या नमो युवा रोजगार केंद्राचं उद्घाटनही काल मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते झालं. या रोजगार केंद्राअंतर्गत शेतकऱ्यांसाठी साप्ताहिक बाजार, फिरता बाजार
आणि मदर्स टिफीन योजना यासारखे रोजगारपूरक उपक्रमही राबवले जाणार आहेत.
दरम्यान, मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे
दिला जाणारा आचार्य अत्रे
पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांना
काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
****
शेतकरी
संघटनांच्या सुकाणू समितीनं काल राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं. शेतकरी कर्जमाफी, तसंच
शेतमालाला हमीभाव यावरून दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या आंदोलनाला, राज्यभरातून
संमिश्र प्रतिसाद मिळाला.
नाशिक
जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं, तर काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक
पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मराठवाड्यात,
औरंगाबाद नांदेड सह अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं क्रांती
चौक भागात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका
केली. जिल्ह्यात सिल्लोड, वैजापूर, खुलताबादसह अनेक ठिकाणी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी
रास्ता रोको केला. परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी बसवर दगडफेक झाल्यानं आंदोलनाला
हिंसक वळण लागलं. जिल्ह्यात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती
नियंत्रणात असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे.
लातूर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात
रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. लातूर तालुक्यासह रेणापूर फाटा आणि हरंगुळ या ठिकाणी
शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. उस्मानाबाद जिल्ह्यात पाच ठिकाणी
सुकाणू समिती कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. पालकमंत्र्यांना स्वातंत्र्यदिनाचं
ध्वजारोहण करु देणार नाही असा इशाराही या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
भारत आणि श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिका, भारतानं तीन शून्य नं जिंकली
आहे. कँडी इथला, तिसरा आणि शेवटचा सामना भारतानं, एक डाव आणि १७१ धावांनी जिंकला. शिखर
धवन आणि हार्दिक पंड्याच्या शतकी खेळीच्या बळावर पहिल्या डावात भारतानं ४८७ धावा केल्या
होत्या. या धावांचा पाठलाग करत असताना, श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात, अवघ्या १३५ धावांवर, तर फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात, १८१ धावांत सर्वबाद झाला. पहिल्या
डावात कसोटी सामन्यातलं पहिलं शतक झळकावणारा हार्दिक पंड्या सामनावीर पुरस्काराचा,
तर मालिकेत दोन शतकं झळकावणारा शिखर धवन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
या कसोटी मालिकेनंतर, भारत आणि श्रीलंका
संघात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार असून, पहिला सामना येत्या २० ऑगस्टला होणार
आहे.
****
दहीहंडीचा
उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ठिकठिकाणच्या कृष्ण मंदिरात
कृष्णजन्मोत्सव साजरा झाला. या निमित्तानं मंदिरांमधून भजन, कीर्तन, महाप्रसाद, आदी
विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
गोकुळाष्टमीच्या
पार्श्वभूमीवर काल राज्यातल्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली.
नांदेड
जिल्ह्यात तब्बल २५ दिवसांनंतर पावसानं काल हजेरी लावली असून, पिकांना
जीवदान मिळालं आहे. परभणी जिल्ह्यात सेलु, मानवत तालुक्यात काल पाऊस झाला. हिंगोली,
बीड, आणि लातूर जिल्ह्यातही काल रिमझिम पाऊस झाल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं. औरंगाबाद
शहर तसंच जिल्ह्यातही काल सायंकाळनंतर पावसानं हजेरी लावली. जालना जिल्ह्याच्या परतूर
तालुक्यातल्या सातोना परिसरात पावसाची संततधार सुरु होती. या पावसाचा कापूस आणि तुरीच्या
पिकांना लाभ होईल, अशी आशा वर्तवली जात आहे.
****
शेतकऱ्यांनी त्यांच्या समोरील
आव्हानांना सकारात्मकरित्या सामोरं जावं, असं आवाहन उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर
रावते यांनी केलं आहे.. रावते यांनी काल जिल्ह्यातल्या वाघोली, गोपाळवाडी, नागझरवाडी आदी गावातल्या पिकांची
पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. रावते यांनी या दौऱ्यात
जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचाही आढावा घेतला.
****
राज्याचे माजी मुख्यमंत्री, तथा दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त काल राज्यभरात
त्यांना आदरांजली वाहण्यात आली. लातूर जिल्ह्यातल्या बाभळगाव या त्यांच्या मूळ गावी
प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद इथंही गांधी भवनात देशमुख यांना
आदरांजली वाहण्यात आली.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या कंधार नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, शोभा
नळगे यांना बडतर्फ करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले आहेत.
नळगे यांनी नामनिर्देशित सदस्य नियुक्तीत पदाचा दुरुपयोग केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात
अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या कारवाईनंतर उपनगराध्यक्ष जफरोद्दीन
बाहोद्दिन यांनी नगराध्यक्ष पदाची सूत्रं स्वीकारली आहेत.
दरम्यान,
नांदेड महापालिकेत दहा नगरसेवकांनी काल राजीनामे दिले, यामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या
प्रत्येकी चार तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन नगरसेवकांचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment