Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 January 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जानेवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø राज्यातल्या पाणीवापर संस्थांच्या पाण्याच्या ठोक दरात
१७ टक्के वाढ
Ø रब्बी पिकासाठी कृषी संजीवनी
योजना लागू करण्याची अजित पवार यांची
मागणी
Ø नवव्या शार्ङंग्देव महोत्सवाला कालपासून
औरंगाबाद इथं प्रारंभ
Ø आठव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचं
आज बीड इथं उद्घाटन
आणि
Ø १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची उपान्त्य
फेरीत धडक तर अंधांच्या विश्वचषक क्रिकेट
स्पर्धेत आज भारत पाकिस्तान संघात अंतिम लढत
****
राज्यातल्या पाणीवापर संस्थांच्या पाण्याच्या
ठोक दरात १७ टक्के वाढ करण्याचे आदेश जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिले आहेत. जलसंपत्ती
प्राधिकरणाचे प्रमुख माजी सनदी अधिकारी के पी बक्षी यांनी ही माहिती दिली. नव्या दरानुसार
शेतीच्या तीन हंगामासाठी यावेळी प्रथमच प्रती घनमीटर पध्दतीने दर आकारणी केली असून
हे दर खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी अनुक्रमे साडे चार पैसे, नऊ पैसे आणि साडे
तेरा पैसे, असे असतील. ग्रामीण स्वराज्य संस्थांच्या पाणी योजनांसाठी हे दर आता प्रती
हजार लीटर १५ पैसे, नगर पालिकासाठी १८ पैसे, महापालिकासाठी २५ पैसे तर टाऊनशीपसाठी
एक रुपया २४ पैसे असे असतील. स्थानिक स्वराज्य संस्था किरकोळ दर ठरवताना त्यांच्या
वितरण प्रणालीनुसार दरात वाढ करू शकतात, असं बक्षी यांनी सांगितलं.
पाणीवापर संस्थेला पाण्याचं लेखा परीक्षण
बंधनकारक करण्यात आलं असून, परीक्षण न करणाऱ्या संस्थांना दंड ठोठावला जाणार आहे. प्रदुषणाच्या
नियामक मंडळाच्या देखरेखीत ज्या संस्था दुषित पाण्यावर प्रक्रिया करणार नाहीत, त्यांना
दीडपट दंड ठोठावला जाणार आहे.
****
महावितरण
कंपनीनं शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडू
नयेत, तसंच रब्बी पिकासाठी कृषी संजीवनी
योजना लागू करुन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे
नेते अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या
हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्तानं काल
लातुरात आयोजित वार्ताहर परिषदेत
ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. दरम्यान, औसा इथं झालेल्या झालेल्या जाहीर सभेत बोलताना पवार
यांनी, सत्ताधारी सरकार फसव्या कर्जमाफीची घोषणा करुन
शेतकऱ्याची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होईपर्यंत
हे आंदोलन सुरूच राहील असा इशाराही त्यांनी दिला.
****
अधिकृत
रास्त भाव दुकानातून महानंद दुग्ध शाळेचं दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार सध्या मुंबई आणि ठाणे इथल्या अधिकृत रास्त भाव दुकानातून
महानंदच्या पदार्थांची
खरेदी करता येणार आहे.
****
देशात निर्यात उद्योग वाढीस लागणं आवश्यक असल्याचं मत
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं आहे. काल मुंबई इथं आय ए एम सी चेंबर
ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या वतीनं आयोजित परिषदेत ते बोलत होते. जागतिक
बाजारपेठेत देशातून होणारी निर्यात केवळ एक पूर्णांक सात टक्के असून, ती वाढवण्यासाठी गांभीर्यानं विचार व्हायला पाहिजे, असं
ते म्हणाले.
****
मराठी
मनाने नेहमी साहित्य आणि संस्कृती जपली, असं
प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी
इथं आयोजित ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचं
उद्घाटन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी
ते बोलत होते. या तीन दिवसीय संमेलनात अनेक परिसंवाद, कविसंमेलन, नाटक
आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील
कार्यक्रमाचा ४० वा भाग येत्या २८ जानेवारीला सकाळी ११.०० वाजता सर्व वाहिन्यांवरुन
प्रसारित होणार.
****
विविध क्षेत्रात विक्रम करणाऱ्या देशभरातल्या ११२ कर्तृत्ववान महिलांना, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या
हस्ते आज "फर्स्ट लेडी" पुरस्कारानं
गौरवण्यात येणार आहे. यामध्ये देशातल्या
पहिल्या महिला ऑटो रिक्षा चालक परभणीच्या शिला डावरे यांच्यासह राज्यातल्या १५ महिलांचा समावेश आहे. भारतीय
चित्रपटांच्या पहिल्या अभिनेत्री दुर्गाबाई कामत तसंच देशातल्या पहिल्या महिला
तबला वादक डॉ. अबन मिस्त्री यांना हा सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
नवव्या शार्ङंग्देव महोत्सवाला कालपासून
औरंगाबाद इथं प्रारंभ झाला. महात्मा गांधी मिशनच्या महागामी संस्थेत आयोजित या महोत्सवात
सकाळच्या सत्रात व्याख्यान आणि सायंकाळी कलासादरीकरण केलं जातं. केरळच्या मंदिरांमधलं
पारंपरिक ताल वादन तसंच कोलकाता इथलं मार्ग नाट्यम काल सादर करण्यात आलं.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या ८ व्या मराठवाडा लेखिका
साहित्य संमेलनाला आजपासून बीडमध्ये सुरूवात होत आहे. आज सकाळी साडे आठ वाजता, माळीवेस
इथून ग्रंथदिंडी निघणार असून, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात खासदार सुप्रिया सुळे यांच्या
हस्ते संमेलनाचं उद्घाटन तर मावळत्या अध्यक्षा वृषाली किन्हाळकर यांच्याहस्ते ग्रंथ
प्रदर्शनाचं उद्घाटन होईल. दीपा क्षीरसागर यांच्या अध्यक्षतखाली होणाऱ्या या दोन दिवसीय
संमेलनात विविध विषयांवरील परिसंवाद, कवीसंमेलनं, पुस्तक प्रकाशनं आदी कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
देशाची सभ्यता टिकवून ठेवण्याचं
काम वेदांनी केलं, असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल
सिंह यांनी केलं आहे. काल औरंगाबाद इथं, चौथ्या अखिल भारतीय वैदिक संमेलनाचं उद्घाटन
डॉ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. वेद हे एखाद्या धर्मापुरते मर्यादित
नसून, संपूर्ण मानवजातीसाठी आहेत, भारताला आपला गौरव पुन्हा प्राप्त करण्यासाठी, वेदांचा
मार्ग स्वीकारावा लागेल, असं ते म्हणाले. करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती
यांच्यासह खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडले, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाचे कुलगुरू बी ए चोपडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या या तीन दिवसीय
संमेलनात मान्यवरांची व्याख्यानं, तसंच विविध विषयांवर परिसंवादांचं आयोजन करण्यात
आलं आहे.
****
न्यूझीलंडमध्ये
सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतानं उपान्त्य फेरीत धडक मारली
आहे. काल सकाळी झालेल्या सामन्यात भारतीय संघानं झिम्बॉब्वेचा दहा गडी राखून पराभव
केला. प्रथम फलंदाजी करत झिम्बॉब्वेचा संघ १५४ धावात सर्वबाद झाला, भारतीय संघानं हे
लक्ष्य बावीसाव्या षटकात एकही गडी न गमावता पूर्ण केलं. उपांत्य फेरीत येत्या २६ तारखेला
भारताचा सामना बांगलादेश संघासोबत होणार आहे.
दरम्यान, अंधांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांग्लादेशचा
पराभव करून अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघाची पाकिस्तानशी लढत होणार आहे. संयुक्त
अरब अमिरातीमधल्या शारजाह इथं आज हा सामना होणार आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या
भोकरदन तालुक्यातल्या रामेश्वर साखर कारखान्याची एक कोटी ३७ लाख रुपयांची फसवणूक केल्या
प्रकरणी नाशिक इथल्या दोघांना काल पोलिसांनी अटक केली. संशयितांनी कारखान्याकडून आगाऊ
रक्कम घेऊन कच्ची साखर पुरवठा करण्याचा करार पूर्ण न केल्यानं, कारखान्याच्या संचालकांनी
दाखल केलेल्या तक्रारीवरून तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या
एका जवानाचा बडोदा इथं वायू सेना दलाच्या नियमित कवायती दरम्यान कोसळून मृत्यू झाला.
मयूर पाटील असं या जवानाचं नाव असून, त्यांच्या पार्थिव देहावर काल नवापूर या त्यांच्या
मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
डहाणू
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांना ९५ हजार रूपयांची लाच घेतांना लाच लुचपत विभागानं काल रंगेहाथ पकडलं. ठेकेदारानी काम पूर्ण केल्यानंतर नगरपरिषदेत जमा अनामत रक्कम परत मिळण्यासाठी अर्ज केला
होता. ही रक्कम देण्यासाठी डकले यांनी ही लाच मागितली होती.
****
धुळे इथल्या भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातला
शिपाई राजेंद्र बैसाणे याला काल धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं १५ हजार रुपयांची
लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात संपादित
झालेल्या शेतजमिनीचा मोबदला देण्यासाठी बैसाणे यानं संबंधित शेतकऱ्याकडून ही लाच मागितली
होती.
*****
***
No comments:
Post a Comment