Saturday, 20 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.01.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 January 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जानेवारी २०१ दुपारी १.०० वा.

****

 अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई इथल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातल्या सहाही आरोपींना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातल्या एका आरोपीची न्यायालयानं गेल्या सोमवारी निर्दोष मुक्तता केली होती. जाती धर्माचा खोटा अहंकार बाळगणाऱ्या समाजकंटकांना धडकी भरवणारा हा निर्णय न्यायालयानं दिला असल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. क्रूर कृत्यासाठी दोषींना कठोर शिक्षा दिली गेली नाही, तर समाजात कुठलंच भय राहणार नाही, असं न्यायाधीश आर आर वैष्णव यांनी निकाल सुनावताना म्हटलं असल्याचं निकम यांनी सांगितलं. आंतरजातीय प्रेमप्रकरणातून जानेवारी २०१३ मध्ये सोनईजवगणेशवाडी शिवारात विठ्ठलवाडी इथं तीन तरुणांची हत्या करण्यात आली होती.

****

 आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी भारताच्या प्रगतीला मान्यता दिली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. देशामध्ये कधीही नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात थेट परकीय गुंतवणूक झाली असल्याचं ते म्हणाले. सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केवळ नोटबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या आधारे केलं जाऊ नये, कारण देशाच्या विकासासाठी सरकारनं इतर अनेक पावलं उचलली आहेत, असं त्यांनी नमूद केलं.

****

 पारपत्र सेवा अगदी दुर्गम भागात राहणाऱ्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. त्या पुदुच्चेरीमधल्या कराईकल इथं एका टपाल कार्यालयात पारपत्र सेवा केंद्राचं उद्घाटन करताना बोलत होत्या.

****

 स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये पुढच्या आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांच्यात कुठल्याही प्रकारच्या द्वीपक्षीय चर्चेसाठी बैठक होणार नसल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. २३ जानेवारी रोजी आयोजित जागतिक आर्थिक मंचाच्या विस्तृत सत्रात पंतप्रधान मोदी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

****

 सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी.एच.लोया मृत्यूप्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी करण्याबाबतच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते तेहसीन पुनावाला आणि राज्यातले पत्रकार बंधुराज लोणे यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर योग्य पीठात सुनावणी होईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

 बँकींग पर्यवेक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या कामात भारतीय रिझर्व्ह बँकेनं लक्षणीय सुधारणा केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तसंच जागतिक बँकेनं प्रशंसा केली आहे. २०१७ या वर्षाचा भारतातल्या आर्थिक क्षेत्राचा तपशीलवार आढावा घेणारे दोन अहवाल या संस्थांनी संयुक्तपणे प्रसिध्द केले. गेल्या काही वर्षात देशाच्या सर्वोच्च बँकेच्या कामाकाजात अधिक सुधारणा झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

****

 गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी  निवड झाली आहे. राष्ट्रपती भवनानं ट्विटर संदेशाद्वारे ही घोषणा केली. गुजरातचे राज्यपाल ओ.पी.कोहली यांच्याकडे सध्या मध्यप्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.

****

 बीड इथं आठव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाची आज सकाळी ग्रंथ दिंडीनं सुरूवात झाली. संमेलनाध्यक्ष दिपा क्षीरसागर यांच्यासह माजी संमेलनाध्यक्ष वृषाली किन्हाळकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह शाळकरी विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते. बीड शहरातल्या माळीवेस इथून सुरुवात झोलल्या या दिंडीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, केशरबाई क्षीरसागर यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी केल्या होत्या.

****

 मराठवाड्यातले ज्येष्ठ गायक पंडित नाथ नेरलकर यांना आयटीसी संगीत रिसर्च ॲकॅडमी या संस्थेतर्फे दिला जाणारा वार्षिक पुरस्कार जाहीर झाला आहे. शास्त्रीय संगीतातल्या योगदानाबद्दल नेरलकर यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचं संस्थेनं सांगितलं आहे. उद्या मुंबईत होणाऱ्या विशेष कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

 जालना - औरंगाबाद मार्गावर जालना एसटी वर्कशॉपसमोर आज पहाटे भरधाव कार दुभाजकला धडकून उलटली, या अपघातात मुंबईच्या वसई भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातले चारजण गंभीर जखमी झाले. मुंबईहून गोंदियाकड़े जात असताना हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न इथं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या लिएंडर पेस आणि पुरव राजा या जोडीनं उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात या जोडीनं जॅमी मुरे आणि ब्रुनो सोर्स या ब्रिटीश - ब्राझिलियन जोडीचा सात - सहा, पाच - सात, सात - सहा असा पराभव केला.

*****

***

No comments: