आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२० जानेवारी २०१८ सकाळी
११.००
****
जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय
सीमेवर पाकिस्तानी सैन्यानं उखळी तोफांच्या जोरदार केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे
दोन जवान शहीद झाले तर दोन नागरिक मारले गेले. पाकिस्तानी सैन्यानं काल रात्री जम्मूतल्या
अर्निया आणि आर.एस.पुरा क्षेत्रासह राजौरी आणि पुँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषा, जम्मू, सांबा
तसंच कठुआमध्ये सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. भारतीय सैन्यानंही
या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर दिलं. पाकिस्तान सैन्यानं आज सकाळीही रामगढ क्षेत्रात
जोरदार गोळीबार केल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, पाकिस्ताननं
झाडलेल्या प्रत्येक गोळीला भारत दहा गोळ्यांनी प्रत्यूत्तर देईल, असा
इशारा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिला आहे. ते काल यवतमाळ इथं वार्ताहरांशी
बोलत होते.
****
विमान
उड्डाणादरम्यान प्रवाशांना विमानात सॅटेलाईट आणि क्षेत्रीय नेटवर्कच्या माध्यमातून
मोबाईल आणि इंटरनेट सेवा सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची शिफारस भारतीय दूरसंचार नियामक
प्राधिकरणानं केली आहे. इन-फ्लाईट कनेक्टीव्हीटीच्या माध्यमातून विमानात मोबाईल आणि
इंटरनेट सेवा प्रदान करायला हव्यात, असं प्राधिकरणानं म्हटलं आहे.
****
संयुक्त अरब अमिरातीमधल्या शारजाह इथं अंधांच्या
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान सध्या सुरु
आहे. बांग्लादेशचा पराभव करून भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली.
****
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होईपर्यंत हल्लाबोल
आंदोलन सुरूच राहील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांनी दिला
आहे. लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं झालेल्या पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनात मार्गदर्शन
करतांना ते बोलत होते. सत्ताधारी सरकार फसव्या कर्जमाफीची घोषणा करुन शेतकऱ्याची दिशाभूल
करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुका कृषी उत्पन्न
बाजार समितीचे सभापती हरिश्चंद्र शिंदे यांच्यासह त्यांच्या चालकाला ५० हजार रुपयांची
लाच घेतांना काल अटक करण्यात आली. बाजार समितीच्या आवारात हॉटेल चालवण्यासाठी पर्यायी
जागा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी शिंदे यांनी तक्रारदाराकडे ही लाच मागितली होती.
****
***
No comments:
Post a Comment