Friday, 19 January 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 19.01.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 January 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

मराठी मनाने नेहमी साहित्य आणि संस्कृती जपली असं प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथं आज आयोजित ६६व्या विदर्भ साहित्य संमेलनाचं उद्घाटन, आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या तीन दिवसीय संमेलनात अनेक परिसंवाद, कविसंमेलन, नाटक आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

महावितरण कंपनीनं शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडू नयेत, तसंच राज्य सरकारनं रब्बी पिकासाठी ‘कृषी संजिवनी योजना’ लागू करुन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्तानं आज लातुरात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तसंच बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचं अनुदानही मिळालेलं नाही, येत्या ३१ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पवार यांनी दिला आहे. 

****

अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते बापूसाहेब देशमुख यांचं आज निधन झालं. नगर जिल्ह्यातल्या कर्जत पंचायत समितीचं सभापतीपद त्यांनी सलग १८ वर्षे भूषवलं होतं. जगदंबा साखर कारखाना उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात आज सकाळी झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले. कडलास रस्त्यावर एका दुचाकीला टेम्पोनं धडक दिल्यानं हा अपघात झाला, यावेळी दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

****

कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते मंगलोर या ७४१ किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्यात आली आहे. कोकण रेल्वेचे व्यस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी ही माहिती दिली. ते मडगाव इथं वार्ताहरांशी बोलत होते. विद्युतीकरणाचं हे काम येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येणार असून, त्यामुळे कोकण रेल्वेची शंभर कोटी रुपयांची बचत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

देशात निर्यात उद्योग वाढीस लागणं आवश्यक असल्याचं मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज व्यक्त केलं आहे. मुंबई इथं आय ए एम सी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या वतीनं आयोजित परिषदेत ते आज बोलत होते. जागतिक बाजारपेठेत देशातून होणारी निर्यात केवळ एक पूर्णांक सात टक्के असून, ती वाढवण्यासाठी गांभीर्यानं विचार व्हायला पाहिजे, असं ते म्हणाले.

****

धुळे इथल्या भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातला शिपाई राजेंद्र बैसाणे याला आज धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात संपादित झालेल्या शेतजमिनीचा मोबदला देण्यासाठी बैसाणे यानं संबंधित शेतकऱ्याकडून ही लाच मागितली होती.

****

बडोदा इथं वायू सेना दलाच्या नियमित कवायती दरम्यान, एका जवानाचा अचानक मृत्यू झाला. काल सायंकाळी ही दुर्घटना घडली. मयूर पाटील असं या जवानाचं नाव असून, ते नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर इथले रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नाशिक इथं पुजा साहित्य विक्रीची आठ दुकानं पेटवून दिल्याचं आज सकाळी निदर्शनास आलं. शहरातल्या प्रसिद्ध नारोशंकर मंदिराच्या मागे आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पंचवटी पोलिस अधिक चौकशी करत असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यासारख्या योजना वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी दिले आहेत. ते आज बीड इथं या योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होते. मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

****

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतानं उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या सामन्यात भारतीय संघानं झिम्बॉब्वेचा दहा गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत झिम्बॉब्वेचा संघ १५४ धावात सर्वबाद झाला, भारतीय संघानं हे लक्ष्य बावीसाव्या षटकात एकही गडी न गमावता पूर्ण केलं.  

****

औरंगाबाद इथं येत्या रविवारी मराठवाड्यातल्या सेवाभावी समूह तसंच संस्थाचा मेळावा होणार आहे. शहरात कलाग्राम इथं आयोजित या मेळाव्यात कृषी, पाणी, ग्रामविकास, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रात काम करणाऱ्या शंभराहून अधिक संस्थांचे कक्ष असतील. रविवारी सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यात विविध विषयांवर परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

****

No comments: