Saturday, 20 January 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 20.01.2018 - 17.25

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 January 2018
Time 17.25 to 17.30 
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
जम्मू आणि काश्मीरमध्ये आज सीमेवर पाकिस्तानकडून झालेल्या बॉम्बहल्ल्यामध्ये सैन्याचा एक जवान शहीद झाला, तर एका बालकासह दोन नागरिक ठार झाले असून दोन जवान आणि सुमारे बारा नागरिक जखमी झाले आहेत. जम्मू जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर अजूनही मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले सुरू असून सीमा दलाचे जवान त्यास चोख प्रत्युत्तर देत आहेत. 
****
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी राज्यांना दिव्यांग व्यक्तींसाठी नोकरी आणि शिक्षणातल्या आरक्षित जागांमध्ये वाढ करण्याची विनंती केली आहे. दिव्यांग व्यक्तींची वाढत असलेली लोकसंख्या बघता त्यांनी ही विनंती केली आहे. ते आज हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. सध्या देशात सहा कोटीपेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असून फक्त मध्यप्रदेश आणि छत्तीसगड ही राज्यच दिव्यांगांसाठी नोकरीत सहा टक्के आरक्षणाचं धोरण राबवत आहे.
****
नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी सरकार काहीही प्रयत्न करत नसल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनात नांदेड इथं आज ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकारने जी कर्जमाफीची घोषणा केली त्यात नियमित कर्ज भरणाऱ्यांना २५ हजारांचा बोनस अद्याप मिळाला नसून कर्जमाफीची रक्कमही अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याचं ते म्हणाले. यावेळी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक आणि आमदार सतीश चव्हाण उपस्थित होते.
****
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आज रोजगार हमी योजना, मृद आणि जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांबाबतची आढावा बैठक पार पडली. जलयुक्त शिवार अभियानात निवड केलेल्या गावांमध्ये होणाऱ्या कामांचे सविस्तर आराखडे तयार करून विहीत प्रक्रियेनुसार कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 
****
साहित्य संमेलनातून नक्कीच मराठी भाषेचं संवर्धन होऊ शकतं, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. त्या बीड इथं आठव्या ‘मराठवाडा लेखिका साहित्य संमेलना’चं उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. सरकारच्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातली मुलं शिक्षणापासून वंचित राहतील, त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची विनंती त्यांनी योवळी केली. संमेलनाध्यक्ष दीपा क्षीरसागर, मावळत्या संमेलनाध्यक्ष वृषाली किन्हाळकर, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यावेळी उपस्थित होत्या. या संमेलनातून महिला सबलीकरण, महिला साहित्य निर्मिती यावर भर देण्यात आला असून, नवोदित तरुण लेखिकांसाठी विविध परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद इथं उद्या रविवारी मराठवाड्यातल्या सेवाभावी समूह तसंच संस्थाचा मेळावा होणार आहे. शहरात कलाग्राम इथं आयोजित या मेळाव्यात कृषी, पाणी, ग्रामविकास, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रात काम करणाऱ्या शंभराहून अधिक संस्थांचे कक्ष असतील. उद्या सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यात विविध विषयांवर परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं आहे.  
****
मराठवाड्याच्या विकासासंदर्भात विविध मागण्यांसाठी येत्या २३ तारखेला मराठवाडा विकास सेनेच्या वतीनं औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर विकास मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठवाडा विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पाटील यांनी दिली. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. मराठवाड्याच्या न्यायहक्कासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनी मिळून ‘मराठवाडा विकास सेना’ हा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ जानेवारीला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा चाळीसावा भाग आहे. नागरिकांनी या कार्यक्रमासाठी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ॲपवर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर झाले. यात गायनासाठीचा पुरस्कार पंडित सत्यशील देशपांडे, लोकसेवेचा पुरस्कार डॉ.रविन्द्र आणि स्मिता कोल्हे, नाट्य आणि चित्रपटाचा पुरस्कार अमोल पालेकर तर शिक्षण क्षेत्रातला पुरस्कार डॉ.स्नेहलता देशमुख यांना जाहीर झाला आहे. येत्या १० मार्चला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
न्यूझीलंडमधल्या तौरंगा इथं सुरु असलेल्या चार निमंत्रित देशांच्या हॉकी स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारतानं यजमान न्यूझीलंड संघाचा तीन - एक असा पराभव केला. या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि बेल्जिअम या संघांदरम्यान होणार आहे.
****

No comments: