Friday, 19 January 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad - 19.01.2018 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 January 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जानेवारी २०१ दुपारी १.०० वा.

****

देशाची सभ्यता टिकवून ठेवण्याचं काम वेदांनी केलं, असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी केलं आहे. आज औरंगाबाद इथं, चौथ्या अखिल भारतीय वैदिक संमेलनाचं उद्घाटन डॉ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. वेद हे एखाद्या धर्मापुरते मर्यादित नसून, संपूर्ण मानवजातीसाठी आहेत, भारताला आपला गौरव पुन्हा प्राप्त करण्यासाठी, वेदांचा मार्ग स्वीकारावा लागेल, असं ते म्हणाले. करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्यासह खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडले, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बी.ए.चोपडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या या तीन दिवसीय संमेलनात मान्यवरांची व्याख्यानं, तसंच विविध विषयांवर परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या चित्रपटाला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळानं दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर काही राज्यांनी बंदी घातली होती, मात्र न्यायालयानं ती बंदी हटवून संपूर्ण देशात चित्रपट प्रसारित होणार असल्याचं म्हटलं आहे. राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम न्यायालयाचं नसून, ते राज्य सरकारांचं असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

****

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी आज दिव्यांगांना वापरण्याजोग्या शंभर संकेतस्थळांचं अनावरण केलं. अशा प्रकारचे ९०० संकेतस्थळं टप्प्याटप्प्यानं सुरु करणार असल्याचं ते म्हणाले. दिव्यांगांची क्षमता भरपूर आहे, त्यामुळे त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी द्यावी, असं सांगून गहलोत यांनी, देशातल्या दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी आणखी खूप काम करायचं असल्याचं नमूद केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ जानेवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा चाळीसावा भाग आहे. नागरिकांनी या कार्यक्रमासाठी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ॲपवर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्र प्रणालीनं सुसज्ज ‘रुद्र’ हे हेलिकॉप्टर नवी दिल्लीतल्या राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचालनात प्रथमच सहभागी होणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या या संचालनात हवाई दलाची २१ लढाऊ, १२ हेलिकॉप्टर्स आणि पाच मालवाहू विमानांसह ३८ विमानं सहभागी होणार आहेत.

****

गोव्यात वास्को - पणजी महामार्गावर अमोनिया वायूनं भरलेला टँकर पलटल्याचं वृत्त आहे. काल रात्री गोव्यातल्या चिकालीम गावाजवळ हा अपघात झाला, त्यानंतर गावातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दोन महिलांना, श्वसनाच्या त्रासाच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   

****

कमला मिल जळीत प्रकरणी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशी अहवाल सुपूर्द केला आहे. २८ डिसेंबरला लोअर परळ इथल्या कमला मिल संकुलात लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले होते. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिले होते. आग लागलेल्या पब मध्ये अवैधरित्या पुरवल्या जाणाऱ्या हुक्क्यातल्या पेटत्या कोळशामुळे ही आग लागल्याचं अहवालात म्हटलं आहे. मिलचा मालक, दोन्ही पबचे मालक, आणि संबंधित वास्तू रचनाकार तसंच इंटेरियर डिझायनर यांच्याविरुध्द फौजदारी कारवाई करावी, तसंच अग्निशमन दलाच्या १० अधिकाऱ्यांविरुध्द विभागीय चौकशी करण्याची शिफारस या अहवालात केली आहे.

****

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं अंदाजे चार हजार कोटी खर्चाच्या कृषी संजीवनी प्रकल्पाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या अंतर्गत १५ जिल्ह्यांमधल्या पाच हजार एकशे बेचाळीस गावांमधून मृद संधारण, जल संधारण, वृक्ष लागवड या कामांकरता लाभ होईल.

****

रद्द केलेल्या जुन्या नोटा बदलण्याच्या कथित गुन्ह्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं काल ३२ ठिकाणी छापे घातले, त्यात महाराष्ट्रातल्या एका सहकारी बँकेचं कार्यालय आणि १७ शाखांचा समावेश आहे. पुणे, बारामती आणि लोणावळ्यातल्या काही निवासी ठिकाणांवरही छापे घातले. यावेळी काही महत्त्वाची कागदपत्रं सापडली असून त्यांची छाननी सुरु आहे.

****

No comments: