Saturday, 7 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.04.2018 13.00


 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 7 April 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक एप्रिल  २०१ दुपारी १.०० वा.

****



उत्तम आरोग्य हाच मानवाच्या प्रगतीचा पाया असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी, सार्वभौमिक आरोग्य कवच, सर्वांसाठी प्रत्येक ठिकाणी’ या जागतिक आरोग्य संघटनेच्या संकल्पनेचं स्वागत केलं आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी उत्तम आरोग्याचं उद्दीष्ट ठेऊनच आयुष्मान भारत या सर्वात मोठ्या आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात केल्याचं त्यांनी नमूद केलं.

****



 केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं पंजाब नॅशनल बँक - पीएनबी घोटाळ्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेचे माजी उपगव्हर्नर हारुन राशीद खान यांची चौकशी केली. हिरे व्यापारी निरव मोदी आणि मेहूल चोकसी यांनी केलेल्या या घोटाळ्या प्रकरणी प्रथमच आरबीआयच्या एखाद्या माजी उच्च-पदस्थ अधिकाऱ्याची चौकशी करण्यात येत आहे. मोदी यांच्या कंपनीला पीएनबीनं बनावट हमीपत्र देण्यासबंधी तसंच याबाबतच्या नियमांबाबत खान यांची चौकशी करण्यात आली.

****



 केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जागतिक बॅंक यांनी एकत्रितरित्या मराठवाडा आणि विदर्भातल्या अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ४२० दशलक्ष डॉलरच्या प्रकल्पावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हवामान आधारित शेती करणं आणि शेती हा आर्थिकदृष्ट्या परवडणार उद्योग रहावा यासाठी या प्रकल्पाअंतर्गत काम करण्यात येणार आहे.

****



 अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था - एम्स मधल्या प्रवेश परीक्षेचा दर्जा सौम्य करता येऊ शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच याबाबतची ऑनलाईन वैद्यकीय पदवीपूर्व प्रवेश परीक्षा रद्द करण्याची मागणीही न्यायालयानं फेटाळून लावली. विद्यार्थ्यांची संख्या बघता दोन सत्रात घेण्यात येणाऱ्या या ऑनलाईन प्रवेश परीक्षेस काही विद्यार्थ्यांनी आव्हान दिलं होतं. ऑफलाईन परीक्षा घेण्यामधल्या अडचणी, या परीक्षेत होऊ शकणारे संभाव्य गैरप्रकार आणि ऑनलाईन परीक्षापद्धतीचे फायदे बघता या याचिकेमध्ये गुणवत्ता नसल्याचं न्यायालयानं सांगितलं.

****



 देशातल्या नवोदीत उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी १९ राज्यांनी स्टार्ट अप धोरणाची अंमलबजावणी केली असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. जानेवारी २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक प्रोत्साहनपर उपाययोजना जाहीर केल्या होत्या, त्यावेळी देशात फक्त चार राज्यांनी स्टार्टअप विषयक धोरण तयार केलं होतं. मात्र आता अशा राज्यांची संख्या १९ वर पोहोचली असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

 देशातल्या ८०० गावांमध्ये दरवर्षी चार लाख रोजगार निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार आराखडा तयार करणार असल्याची माहिती केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या बैठकीपूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीनंतर देशातल्या चार हजार खादी ग्रामोद्योग केंद्राची माहिती उपलब्ध करुन देणाऱ्या मोबाईलं अॅपचं सिंह यांनी उद्घाटन केलं. देशात सध्या आठ हजारांहून अधिक खादी ग्रामोद्योग केंद्र आहेत.

****

 भारतीय रेल्वे आणि भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ - आय आर सी टी सी यांच्याकडून सर्व रेल्वे गाड्यांमध्ये किंवा स्थानकांमध्ये मिळणाऱ्या अन्न आणि पेयांवर यापुढे पाच टक्के वस्तू आणि सेवा कर - जीएसटी आकारण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय रेल्वे महामंडळाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आला.

****



 ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या तिसऱ्या दिवशी आज भारताच्या खात्यात तिसरं सुवर्ण पदक जमा झालं. पुरुषांच्या भारोत्तोलन स्पर्धेत ७७ किलो वजनी गटात सतीश शिवलिंगमनं सुवर्ण पदक पटकावलं. शिवलिंगमनं यापूर्वी २०१४ मध्ये देखील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं.

 हॉकी मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान आज झालेला सामना दोन - दोन असा बरोबरीत सुटला.  

 बॅडमिंटनच्या मिश्र सांघिक प्रकारात भारतीय संघानं मॉरिशसचा तीन - शून्य असा पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला. उपान्त्य फेरीत उद्या भारताचा सामना सिंगापूर सोबत होणार आहे. पुरुष दुहेरीत सात्वित रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं, तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवला.  

****



 इंडियन प्रिमिअर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अकराव्या हंगामाची सुरुवात आजपासून होत असून, त्यामधे जुन्या आठ संघाचं पुनरागमन झालं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा गतविजेता मुंबई इंडियन संघ आणि महेंद्रसिंग धोनीचा दोनवेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज मुंबईत वानखेडे मैदानावर सलामीची लढत होणार आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...