Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 08 April 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०८ एप्रिल २०१८
सकाळी ६.५०
मि.
*****
v मराठवाड्याच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह
जोरदार पाऊस; शेतातल्या उभ्या पिकांचं मोठं नुकसान
v काळवीट
शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जामीन मंजूर
v अहमदनगर महानगरपालिका पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या
दोन पदाधिकाऱ्यांची हत्या; आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर
v आयपीएल ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेला सुरूवात; पहिल्याच
सामन्यात चेन्नई ई सुपर
किंग्जचा मुंबई इंडियन्सवर विजय
आणि
v गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखी दोन सुवर्ण पदकं
*****
राज्याच्या अनेक भागात काल वादळी
वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यातही काल दुसऱ्या दिवशी सोसाट्याच्या
वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यात टेंभुर्णी शिवारात झालेल्या जोरदार पावसामुळे
शेतातल्या उभ्या पिकांसह आंब्याचं नुकसान झालं. हिंगोली जिल्ह्यात कालच्या पावसानं
शेतातल्या उभ्या पिकांचं नुकसान झालं असून विविध ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर घरांचही
नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
औरंगाबाद शहर परिसरात सायंकाळच्या सुमारास सोसाट्याचा
वारा आणि धुळीचे लोट उठल्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. काही भागात पावसाच्या
हलक्या सरी कोसळल्या. लातूर जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. उस्मानाबाद
जिल्ह्यातही वादळी पाऊस झाला. दरम्यान, काल
परभणी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं.
सांगली जिल्ह्यात इस्लामपूरला गारपीट झाली, नाशिकसह
सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला.
या पावसामुळे राज्यात तापमानात काही अंशी घट झाली. काल
सर्वात जास्त ४१ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान वर्धा इथं नोंदवलं गेलं. नांदेड इथं
४०, तर उस्मानाबाद आणि औरंगाबाद इथं सरासरी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात पुढचे दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मानांकनामध्ये
राज्यातल्या अधिकाधिक विद्यापीठ आणि
महाविद्यालयांचा समावेश व्हावा तसंच विद्यापीठाचं मानांकन अग्रक्रमी असण्यासाठी
कुलगुरुंनी मोहिमेच्या स्वरूपात काम करावं, असे निर्देश कुलपती तथा राज्यपाल
सी. विद्यासागर राव यांनी दिले आहेत. काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या उपस्थितीत राज्यातल्या अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक झाली, त्यावेळी
राज्यपाल बोलत होते. परीक्षांचे निकाल वेळेवर लावण्यासह, इतरही
विविध मुद्यांसंदर्भात राज्यपालांनी सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना, कुलगुरुंनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख सादरीकरणातून
मांडावा, असं सांगितलं.
*****
काळवीट
शिकार प्रकरणी जोधपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं अभिनेता सलमान खानला ५० हजार
रुपयांचं हमीपत्र आणि एवढ्याच मूल्याच्या दोन जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
गुरुवारी याप्रकरणी सलमानला दोषी ठरवत पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली
होती. त्यानंतर लगेचच सलमानच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज केला होता. काल दुपारी जामीन
मंजूर झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास सलमानची सुटका झाली.
****
औरंगाबाद शहरातली कचराकोंडी हे
सरकारचं अपयश असून नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असतांनाही यातून मार्ग निघू शकला
नाही अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. काल औरंगाबाद
इथं ते पत्रकारांशी बोलत होते. मेक इन इंडियामध्ये उद्योग वाढवायचे की बंद पाडायचे
असं सांगून सरकारनं सरसकट घेतलेल्या प्लॅस्टिक
बंदीच्या निर्णयावर त्यांनी ताशेरे ओढले. नुकत्याच
मुंबई इथं झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त झालेल्या मेळाव्यावरही
चव्हाण यांनी टीका केली.
****
अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव पोटनिवडणुकीच्या
वादातून शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची काल हत्या करण्यात आली. संजय कोतकर आणि वसंत
ठुबे अशी या दोघांची नावं असून, शाहूनगर भागात या दोघांचे मृतदेह आढळले. या दोघांवर
गोळीबार करून कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेतला एक आरोपी संदीप गुंजाळ हा नंतर
पारनेर पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाला, त्याच्याकडून पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात
आलंलं पिस्तूल आणि गुप्ती जप्त करण्यात आल्याचं पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी
सांगितलं.
दरम्यान, केडगावच्या प्रभाग क्रमांक ३२ च्या पोटनिवडणुकीत
काँग्रेसचे उमदेवार विशाल कोतकर साडेचारशे मतांनी विजयी झाले आहेत.
औरंगाबाद
जिल्ह्यात गंगापूर
तालुक्यातल्या तुर्काबाद गणाच्या पोटनिवडणुकीत काल शिवसेनेच्या सोनाली पवार या दोन हजार ९४ मतं मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाच्या जमुनाबाई
पवार यांना एक हजार ९४२ मतं मिळाली. वैजापूर तालुक्यातल्या संवदगाव पंचायत गणात राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे मयुर राजपूत एक हजार ४६५ मतांनी विजयी झाले. नांदेड जिल्ह्यातल्या
बिलोली तालुक्यातल्या सगरोळी पंचायत गणात काँग्रेसच्या सुरेखा खिरप्पवार यांचा ८८ मतांनी
तर लोहा तालुक्यातल्या मारतळा गणात भारतीय जनता पक्षाच्या मजळसाबाई उबाळे यांचा ६८३
मतांनी विजय झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अनाळा जिल्हा परीषद गटात शिवसेनेचे धनंजय
सावंत हे विजयी झाले आहेत.
दरम्यान, राज्यातल्या सहा महापालिकांच्या
पोटनिवडणुकीचे निकालही काल जाहीर झाले. मुंबईत शिवसेनेनं तर, उल्हासनगर आणि पुण्यात
राष्ट्रवादीनं बाजी मारली असून, नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि सोलापुरात
काँगेसचे उमेदवार निवडून आले आहेत.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
राज्यभर आजपासून १४ एप्रिलपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर
सामजिक सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून त्यानिमित्त राज्यातल्या सर्व प्रशासकीय विभागाच्या कार्यालयाकडून
विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या सप्ताहाचं आज राज्यभरात एकाचवेळी उद्धाटन होणार आहे.
****
जागतिक
आरोग्य दिन काल सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त औरंगाबाद महानगरपालिकेच्या
वतीनं १५ एप्रिलपर्यंत शहरात स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. याबाबत अधिक
माहिती आमच्या प्रतिनिधीकडून
‘स्वच्छता से सिध्दी’ हे या पंधरावड्याचं घोषवाक्य आहे. महानगरपालिकेची
सर्व आरोग्य केंद्रं आणि रूग्णालयांमार्फत त्यांच्या विभागात, विशेषत: झोपडपट्टी भागातल्या
नागरिकांमध्ये जनजागृती, पथनाट्य, गटसभा, संदेश फेरी, आदी माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचं
महत्त्व पटवून दिलं जाणार आहे. तसंच ओला कचरा-सुका कचरा वर्गीकरण, परिसर स्वच्छता,
निरोगी जीवनशैली या विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर
यांनी या अनुषंगानं काल महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांना स्वच्छता से सिध्दी या विषयावर मार्गदर्शन केलं.
****
लातूर इथं या दिनानिमित्त जनजागृतिविषयक विविध उपक्रम
घेण्यात आले. यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयातल्या डोम इथं भित्तीचित्र, रांगोळी
आणि पथनाटय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
इंडियन
प्रीमिअर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अकराव्या
हंगामाला कालपासून प्रारंभ झाला. त्यामधे जुन्या आठ संघाचं पुनरागमन झालं आहे. गतविजेता
मुंबई इंडियन्स संघ आणि दोनवेळचा विजेता
चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात काल मुंबईत झालेल्या चुरशीच्या सलामीच्या सामन्यात
चेन्नई सुपर किंग्ज संघ विजयी झाला.
****
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट इथं सुरु असलेल्या २१व्या
राष्ट्रकुल स्पर्धेत काल तिसऱ्या दिवशी भारतानं दोन सुवर्ण पदकं पटकावली. भारोत्तोलन
प्रकारात वेंकट राहुल रगाला यानं ८५ किलो वजनी गटात आणि सतीश कुमार शिवलिंगमनं ७७ किलो
वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलं.
भारत-पाकिस्तान यांच्यातला हॉकीचा सामना काल दोन-दोन
असा बरोबरीत सुटला. तर, बॅडमिंटन तसंच टेबल टॅनिसचे महिला आणि पुरुष संघ उपांत्य फेरीत
दाखल झाले.
भारताच्या खात्यात आता चार सुवर्णपदकांसह एक रौप्य आणि एक कांस्य पदक आलेलं असून सर्व पदकं भारोत्तोलनासाठी मिळाली आहेत.
****
औरंगाबाद इथं महाराष्ट्र
राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीनं काल आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
धरणे आंदोलन करण्यात आलं. एक नोव्हेंबरपासून जुनी पेंशन योजना लागू करावी, यासह अन्य
मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं.
जालना जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीनं काल घंटानाद आंदोलन करण्यात आलं. आपल्या
प्रमुख मागण्यांचं निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी राजेश जोशी
यांना दिलं.
बीड इथंही या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी काल
दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. शासनानं या मागण्यांचा विचार
केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलक शिक्षकांनी दिला.
****
मुस्लिम धर्मातल्या
तिहेरी तलाकला बंदी घालणाऱ्या विधेयकाविरुद्ध बीड इथं काल मुस्लिम व्यक्तिगत कायदे
मंडळाच्या वतीनं मुस्लिम महिलांचा मेळावा घेण्यात आला. सरकारनं व्यक्तिगत कायदे मंडळाच्या
कामात दखल देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी
एकत्र येण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
*****
***
No comments:
Post a Comment