Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 8 April 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ८ एप्रिल २०१८ दुपारी १.०० वा.
****
ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट
इथं सुरु असलेल्या २१ व्या
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये आज
भारतानं दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकं पटकावली. महिला
भारोत्तोल्लन स्पर्धेत पूनम यादवनं ६९ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं, तर पुरुषांच्या गटात विकास ठाकूरनं ९४ किलो
वजनी गटात कांस्य पदक पटकांवलं.
नेमबाजी
स्पर्धेत १०
मीटर पीस्टल प्रकारात मनू भाकरनं सुवर्ण
पदक तर हिना सिध्दूनं रौप्य पदक पटकावलं, पुरुषांच्या गटात रवी कुमारनं १० मीटर पीस्टल प्रकारातच
कांस्य पदक जिंकलं.
महिला हॉकीच्या अ गटात भारतानं इंग्लंडचा दोन - एक
असा पराभव केला. पुरुष हॉकीच्या ब गटात आज भारत आणि वेल्स संघादरम्यान सामना होणार
आहे.
बॅडमिंटनच्या मिश्र सांघिक प्रकारात भारतानं सिंगापूरचा
तीन- एक असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. टेबल टेनिस मध्येही महिला संघानं
इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली असून, सुवर्ण पदकासाठी भारतीय संघाचा सामना
सिंगापूर विरुद्ध होणार आहे.
या स्पर्धेत भारत सहा सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन
कांस्य पदकासह पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या, इंग्लंड दुसऱ्या, तर कॅनडा तिसऱ्या स्थानावर आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी पदकं जिंकणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
****
पंतप्रधान मुद्रा योजनेला आज तीन वर्ष पूर्ण झाली,
देशातल्या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशानं ही योजना सुरु केली असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या योजनेमुळे देशात उद्योग क्षेत्रात भरभराट
झाली असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या योजनेमुळे तरुण उद्योजकांना नवीन ऊर्जा
मिळाली असल्याचं ते म्हणाले.
****
अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव पोटनिवडणुकीच्या
वादातून शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. जगताप
यांना सोडून देण्याची मागणी करत पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड करणारे भाजप आमदार
शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० जणां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, काही जणांना
अटकही करण्यात आली आहे. शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची काल अहमदनगर
इथं हत्या करण्यात आली, या घटनेच्या निषेधार्थ आज शिवसेनेनं नगर बंदची हाक दिली असून,
शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वात आज सकाळी दिल्ली दरवाजापासून मोर्चा
काढण्यात आला. महापौर सुरेखा कदम यांच्यासह
शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अवयवदानाचं
महत्व शालेय स्तरावरुन विदयार्थ्यांना कळावं यासाठी यावर्षी दहावीच्या
अभ्यासक्रमात अवयवदानाचा पाठ अंर्तभूत करण्यात आला आहे. यंदाच्या
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून दहावीचा
अभ्यासक्रम बदलला असून, त्यात शब्द संपत्तीचा विकास नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्वअध्ययन, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण, निर्णयक्षमता, जबाबदार नागरिकत्वाचं भान, उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावर
भर देण्यात आला आहे. हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा लेफ्टनंटपदापर्यंतचा
प्रवास कथन करणारा, एक पाठही बालभारतीनं दहावीच्या मराठीच्या पुस्तकात समाविष्ट केला आहे.
****
राज्यभरात
१८६ खरेदी केंद्रावर सहा एप्रिल पर्यंत एक लाख
क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सहकार आणि पणन मंत्री सुभाष
देशमुख यांनी दिली आहे. आतापर्यत सात
हजार ३२४ शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी करण्यात आला. हरभऱ्याची
प्रथमच ऑनलाईन नोंदणीमार्फत खरेदी होत असून, यासाठी ६६
हजार २२३ शेतकऱ्यांनी
नोंदणी केली आहे.
****
महसूल विभाग अधिक पादिर्शी आणि गतिमान होण्यासाठी
राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्तांनी प्रयत्न करावे, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
यांनी म्हटलं आहे. पुणे इथं राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्तांसाठी आयोजित केलेल्या
कार्यशाळेत ते बोलत होते. सातबारा संगणकीकरणाचं काम गतीनं पूर्ण करावं, येत्या ३० एप्रिल
पर्यंत राज्यातल्या ३०० तालुक्यांचं काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी नियोजन करुन त्याप्रमाणे
कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
प्लास्टिक बंदीच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं पर्यावरणतज्ज्ञांनी
स्वागत केलं आहे. मात्र काही उद्योजकांनी या निर्णयावर आक्षेप घेत लाखो लोकांचा रोजगार
बुडेल, असं म्हटलं आहे. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातल्यास धान्य, बेकरी आणि वस्त्रोद्योगात
उत्पादन, वेष्टन आणि पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होतील, असं महाराष्ट्र चेंबर्स ऑफ
कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी म्हटलं आहे. गेल्या २३ मार्चला
राज्य सरकारनं प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीचा अध्यादेश जारी केला होता.
*****
***
No comments:
Post a Comment