Tuesday, 10 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 April 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० एप्रिल  २०१ दुपारी १.०० वा.

****



ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत आज भारतानं अकरावं सुवर्ण पदक जिंकलं. नेमबाजीत २५ मीटर एयर पिस्टल प्रकारात हीना सिद्धूनं सुवर्ण पदक पटकावलं.

 हॉकीमध्ये भारतानं मलेशियाचा दोन - एक असा पराभव करुन उपान्त्य फेरीत प्रवेश केला. भारतीय महिला हॉकी संघाचा सामना आज दक्षिण आफ्रीकेशी होणार आहे. मोहम्मद अनास यानं ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरी गाठली आहे. १९५८ साली मिल्खासिंग नंतर अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला तो भारताचा पहिलाच धावपटू आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत ११ सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण २० पदकं पटकावली आहेत.

****



 बिहारमधल्या पूर्व चंपारण जिल्ह्यातल्या मोतीहारी इथं राष्ट्रपीता महात्मा गांधीजींच्या चंपारण सत्याग्रहाच्या शतक महोत्सवी सोहळा - सत्याग्रह ते स्वच्छाग्रह हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. यावेळी त्यांनी २० हजार स्वच्छताग्रहींना स्वच्छतेची शपथ दिली. २०१९ पर्यंत देश उघड्यावर शौचापासून मुक्त करणं हे या स्वच्छता अभियानाचं उद्दिष्ट आहे.

****



 राज्यात आज तीन वेगवेगळ्या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले.

 मुंबई - अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी इथं लक्झरी बस आणि कंटेनर मध्ये झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. आज पहाटे हा अपघात झाला. जखमींवर कासा इथल्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 तर दुसरा अपघात अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात चिंचोरे गावाजवळ झाला. आज सकाळी पोलिस व्हॅन आणि कंटेनरची धडक होऊन झालेल्या या अपघातात ११ पोलिस जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमी पोलिसांना नेवासे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 सातारा जिल्ह्यात खंडाळा इथं मजूर घेवून निघालेल्या टेम्पोला आज सकाळी साडे पाचच्या सुमारास अपघात झाला. यात १७ जण ठार, तर १५ जण जखमी झाले.

****



 रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागासोबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं राज्यातल्या विविध प्रकल्पांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांची भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी रायगड किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन करत असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. किल्ल्याच्या संवर्धनाला गती देण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे काही अधिकारी प्रतिनियुक्तीवर राज्य शासनात द्यावेत, या राज्याच्या विनंतीस मान्यता देण्यात आली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

 परदेशात तैनात असलेले भारतीय लष्कराचे प्रतिनिधी, लष्करी सामुग्री बनवणारा देश अशी भारताची प्रतिमा निर्माण करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या नवी दिल्ली इथं बोलत होत्या. जगातल्या ४४ देशांतून काम करत असलेले भारतीय सैनिक त्या-त्या देशांच्या बरोबर संरक्षणाबाबत संबंध दृढ होण्यासाठी प्रयत्न करु शकतील, असं त्या म्हणाल्या.

****

 मेक इन इंडियाया उपक्रमाअंतर्गत केंद्र सरकारनं लष्करासाठी एक लाख ८६ हजार बुलेट प्रूफ जॅकेट खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. ही बुलेट प्रूफ जॅकेट्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसंच अतिरिक्त संरक्षण पातळीयुक्त आहेत. संरक्षण मंत्रालयानं यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली.

****



 मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं फरार हिरे व्यापार नीरव मोदी संदर्भात ब्रिटनला पत्र पाठवलं आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं १२ हजार कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी नीरव मोदीच्या बँक खात्यावर जप्ती आणण्यासंबंधी याचिका न्यायालयात सादर केली आहे. ब्रिटनच्या बार्कलेज बँकेत नीरव मोदीचं खातं असून, बँकेकडून ते खातं बंद करुन मोठी रक्कम नीरव मोदीला देण्यात येणार आहे, अशी माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे.

****



 राज्य शासनाच्या योजना वंचितांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यानं ‘विकास सैनिक’ म्हणून काम करण्याचं आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं मराठवाडा विभागात गेल्या आर्थिक वर्षातल्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भेटी देण्याचं अभियान यशस्वीपणे राबवण्यात आलं असून, या माध्यमातून अशा कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देत त्यांना आवश्यक ती मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस आपल्या गावाकडे जाऊन शासकीय योजनांच्या कामात सहभागी व्हावे किंवा योजनांबाबत जनजागृती करावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

*****

***

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 25 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 25 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...