Tuesday, 10 April 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 10.04.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 April 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

आरोग्य सेवा स्वस्त आणि सहजासहजी सामान्य माणसापर्यंत पोहोचणारी पाहिजे, असं उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आयोजित विज्ञान संमेलनात ते बोलत होते. संशोधकांनी गरीबांसाठी कमी खर्चात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याबद्दल संशोधन करावं, असं ते म्हणाले. होमीओपॅथी उपचार पद्धतीला देशात मोठ्या प्रमाणावर मागणी असून, याच्या शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी व्यापक प्रणाली विकसित करणं आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपतींनी नमूद केलं.

****

स्वच्छता अभियान प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा महत्वाचा भाग बनला, तरच हे अभियान यशस्वी होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बिहारमधल्या पूर्व चंपारण जिल्ह्यातल्या मोतीहारीमध्ये महात्मा गांधीजींच्या चंपारण्य सत्याग्रहाच्या शतक महोत्सवी सोहळ्याच्या सांगता समारंभ – ‘सत्याग्रह ते स्वच्छाग्रह’ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. देशात परिवर्तन होत असून, लोकांच्या वागण्यातून हे परिवर्तन दिसत असल्याचं ते म्हणाले. यावेळी उपस्थित २० हजार स्वच्छाग्रहींचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव करण्यात आला, यात धुळे आणि भुसावळ इथल्या स्वच्छाग्रहींचा समावेश आहे.

****

भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ - आय आर सी टी सी उपाहारगृह गैरव्यवहार प्रकरणी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची आज केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं चौकशी केली. राबडी देवी यांचे पती लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना आयआरसीटीसीच्या उपाहारगृहांच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाला सिंचन सुविधा देण्यासाठी श्रीरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निधीतून पाच कोटी एकोणऐंशी लाख रुपये उपलब्ध करुन देण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली. वैजापूर तालुक्यातल्या १६ गावातल्या शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयातून शेतीसाठी पाणी आणण्यासाठी ही संस्था स्थापन केली होती.
ग्रामपंचायतीच्या सरपंचाची जनतेमधून थेट निवडणूक घेण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियम-१९५८ मध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्याची विनंती राज्यपालांना करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

****

गेल्या चार वर्षात राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गाची लांबी चौपटीनं वाढली असून, केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचं हे यश असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. २०१४ साली राज्यात पाच हजार ७०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते, ते २०१७-१८ मध्ये २२ हजार ४३६ किलोमीटर एवढे झाले असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जलयुक्त शिवारच्या कामातून पाणी साठ्यात वाढ होत असून, शेतकऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी म्हटलं आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामांच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. या अभियानांतर्गत वर्ष २०१७-१८ ची कामं त्वरित पूर्ण करावीत, असे निर्देश डोंगरे यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात २०१७-१८ या वर्षांत दोन हजार ७०८ गावांची कामं पूर्ण झाली असून, ३८० कामं प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

नाशिक - सिन्नर मार्गावर नव्यानं झालेल्या पथकर नाक्यावर स्थानिक नागरिकांना सूट मिळावी यासाठी शिवसेनेच्या वतीनं आज सकाळी शिंदेगाव पथकर नाक्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. यामुळे सुमारे दोन तास नाशिक पुणे मार्ग ठप्प झाला होता. केंद्र सरकारकडे या संदर्भात प्रस्ताव सादर करून पंधरा दिवसात निर्णय घेण्यात येईल, तसंच हा निर्णय होईपर्यंत किमान आठ दिवस नाशिकमध्ये परिवहन कार्यालयाकडे नोंदणी झालेल्या वाहन चालकांकडून टोल आकाराला जाणार नाही असं टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं.

****

सातारा जिल्ह्यात खंडाळा घाटात आज सकाळी झालेल्या टेम्पो अपघातातील मृतांची संख्या १८ वर पोहोचली आहे. अपघातात १९ जण जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

****

राज्यात आजही अनेक ठिकाणी पाऊस पडल्याचं वृत्त आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडला. जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही काही भागात पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाला. पुढचे दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 25 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...