Saturday, 7 April 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 07.04.2018 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date –  7  April 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ७ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारत नेपाळच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत दौऱ्यावर असलेले नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. भारत आणि काठमांडूदरम्यान रेल्वेरुळाचं काम सुरू करण्याबरोबरच दोन्ही देशांदरम्यान जलमार्ग आणि रेल्वेसेवेद्वारे संपर्क वाढवण्यावर भारताचा अधिक जोर असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. तसंच शेती क्षेत्रामध्ये दोन्ही देशांनी एकत्रितरित्या काम करण्यास सहमती दर्शवली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं अभिनेता सलमान खानला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. गुरुवारी याप्रकरणी सलामनला दोषी ठरवत पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर लगेचच सलमानच्या वकीलांनी जामीनासाठी अर्ज केला होता.

****

आयसीसीआयसीआय बँक आणि व्हीडीओकॉन समूहाच्या तीन हजार २५० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे नातेवाईक राजीव कोचर यांची केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केली. कर्जाच्या रक्कमेत वाढ करण्यामध्ये त्यांच्या कंपनीच्या भूमिकेबाबत चौकशी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या सरोगसी केंद्रांवर कडक निर्बंध घालण्याच्या शिफारशी बाल हक्क संरक्षण आयोगानं केल्या आहेत. देशभरात सरोगसी विषयक कायदा अस्तित्वात नसल्यामुळे अनियंत्रित चालणारी केंद्र आणि रुग्णालयांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आयोगाकडून केला जात आहे. पूर्ण राज्यामध्ये सरोगसी केंद्र आणि सरोगसी प्रकरणं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार चालतील, आणि यासंदर्भात नियंत्रण मंडळ स्थापन करण्याची शिफारस आयोगानं केली आहे.

****

औरंगाबाद जिल्हयात गंगापूर तालुक्यातल्या तुर्काबाद गणाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या सोनाली पवार या दोन हजार ९४ मतं मिळवून विजयी झाल्या आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या जमुनाबाई पवार यांचा पराभव केला.

तर अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगावमधील प्रभाग क्रमांक ३२ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमदेवार विशाल कोतकर साडेचारशे मतांनी विजयी झाले.

****

जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं. शासन सेवेतल्या २००५ नंतरच्या कर्मचार्यांना जुनी पेंशन योजना लागू व्हावी या प्रमुख मागणीचं निवेदन संघटनेच्या पदाधिकार्यांनी निवासी जिल्हाधिकारी राजेश जोशी यांना दिलं. या आंदोलनात शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.

    बीइथंही या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. शासनानं आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलक शिक्षकांनी यावेळी दिला.

****

मुस्लिम धर्मातल्या तिहेरी तलाकला बंदी घालणाऱ्या विधेयकाविरुद्ध बीड इथं आज मुस्लिम व्यक्तीगत कायदे मंडळाच्या वतीनं मुस्लिम महिलांचा मेळावा घेण्यात आला. सरकारनं व्यक्तीगत कायदे मंडळाच्या कामात दखल देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महिलांच्या आधिकार आणि हक्काच्या विरूध्द हे सरकार पावलं उचलत असून, आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मंडळाच्या पदाधिकारी शेख साबिया खान यांनी सांगितलं. यावेळी मुस्लिम महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा - २०१८ उद्या होणार आहे. परभणी जिल्ह्यात एकुण दोन हजार ६२७ उमेदवार या परीक्षेला बसले असून, नऊ उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. प्रत्येक केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलं असून, एक भरारी पथकही तैनात करण्यात आलं आहे.

****

ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं आज चौथं सुवर्ण पदक पटकावलं. भारोत्तोलन स्पर्धेत व्यंकट राहुलनं ८५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलं. याबरोबरच भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत चार सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकासह एकूण सहा पदकं मिळवली आहेत.

****

राज्यात काही ठिकाणी पाऊस पडल्यानं तापमानात किंचित घट झाली आहे. आज सर्वात जास्त ४१ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान वर्धा इथं नोंदवलं गेलं. नांदेड ४०, तर उस्मानाबाद आणि औरंगाबाद इथं सरासरी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून, पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा शहर आणि परिसरातही आज दुपारी पाऊस पडल्याचं वृत्त आहे. पुढचे दोन दिवसही राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

//*************//


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...