Sunday, 8 April 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 08.04.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 8 April 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ८ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

पंजाब नॅशनल बँकेत सुमारे साडे अकरा हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी या दोघांविरोधात नवी दिल्लीतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी या दोघांनी सहकार्य करण्यास वारंवार नकार दिल्यानं, केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या विनंतीवरुन न्यायालयानं आज वॉरंट जारी केलं. यामुळे आता या दोघांविरोधात इंटरपोलच्या माध्यमातून रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

****

अहमदनगर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचं, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे. शिवसेना पदाधिकारी हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते आज अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकरणाची गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी, अशी मागणी, उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार असल्याचं, कदम यांनी सांगितलं. सहाय्यक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे आणि पोलिस निरीक्षक अभय परमार यांना तत्काळ निलंबित करावं, तसंच या प्रकरणात सहभागी असलेल्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. अहमदनगर शहरात अशीच परिस्थिती कायम राहिली तर शिवसेना आपल्या पध्दतीनं याचा विरोध करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मृत शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची जबाबदारी पक्षानं स्वीकारली असल्याचंही कदम यांनी यावेळी सांगितलं.
महानगरपालिकेच्या केडगाव पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची काल अहमदनगर इथं हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह तीन जणांना १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

****

अहमदनगर इथं जुन्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या इमारतीत कौटुंबिक न्यायालयाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातले न्यायमूर्ती एस एस शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या न्यायालयामुळे न्याय व्यवस्थेवरील भार कमी होऊन जलदगतीनं न्याय मिळण्यास मदत होईल, असं मत न्यायमूर्ती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

राज्यभरात आजपासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाला सुरुवात झाली. बुलडाणा इथं जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते या सप्ताहाचं उद्घाटन झालं. या सप्ताहात विविध स्पर्धा आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्राचं वाटप करण्यासाठी जिल्हा पातळीवर विशेष शिबीरं घेतली जाणार असल्याची माहिती, सामाजिक न्याय राज्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे. आज ‘जागतिक स्वमग्न दिना’निमित्त नवी मुंबईतल्या वाशी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दिव्यांगासाठी असलेला तीन टक्के निधी ग्रामपंचायत पातळीपर्यंत पोहोचत आहे. हा राखीव निधी सहा टक्यांपर्यंत वाढवण्याचा शासन विचार करत असल्याचं ते म्हणाले.

****

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना जगण्याची उभारी देण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनानं ‘मिशन उभारी’ हा उपक्रम सुरु केला आहे. याअंतर्गत या कुटुंबाच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य ती मदत केली जात आहे. जिल्ह्यात ३८१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास भेट देऊन, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जात प्रवर्गनिहाय सर्वेक्षण करून, कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी सुक्ष्म स्तरावरील विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.

****

लिंगायत धर्माला सवैंधानिक मान्यता आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी आज औरंगाबाद इथं मराठवाडा विभागीय लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात आला. शहरातल्या क्रांती चौकापासून निघालेल्या या मोर्चात लिागंयत बांधव आणि महिला मोठ्या संख्येचं सहभागी झाल्या होते.

****

नांदेड इथं अजापासून पारपत्र सेवा केंद्र सुरु झालं. टपाल कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या या केंद्राचं उद्घाटन खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते झालं.

****

जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. जल स्वयंपूर्णतेचा निर्धार करत ७२ गावांनी स्पर्धेत सहभाग घेत श्रमदानाला सुरुवात केली आहे. ४५ दिवसांच्या या स्पर्धेत पाणलोट व्यवस्थापनाची विविध कामं केली जाणार असल्याचं तहसीलदार जे.डी.वळवी यांनी सांगितलं.

****

राज्यात आज तापमानात काही अंशी घट झाली आहे. आज सर्वात जास्त ४१ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. नांदेड आणि बीड इथं सरासरी ३९, तर औरंगाबाद इथं ३८ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...