Monday, 20 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.05.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२० मे  २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 सतराव्या लोकसभेसाठीची मतदान प्रक्रिया यशस्वी झाल्याचं तसचं २०१४ च्या तुलनेत यंदाच्या निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडल्याचं, निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. सात टप्प्यांमधे झालेल्या या निवडणुकीत सुमारे ७० टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाचे उपायुक्त उमेश सिन्हा यांनी काल नवी दिल्लीत  वार्ताहर परिषदेत सांगितलं. या निवडणुकीत महिला तसंच ज्येष्ठ नागरिकांनी मोठया संख्येनं मतदानाचा हक्क बजावल्याचं ते म्हणाले. काही अपवाद वगळता, मतदान प्रक्रिया शांततेत झाली. लोकसभेच्या ५४२ जागांसाठी आठ हजार ४९ उमेदवारांचं भावितव्य आता मतदान यंत्रात बंद झालं आहे. येत्या गुरुवारी २३ तारखेला मतमोजणी होणार असून ताजे निकाल उपलब्ध करुन देण्यासाठी आकाशवाणीनं जय्यत तयारी केली आहे. देशातलं सर्वात मोठं नभोवाणी जाळं असणाऱ्या आकाशवाणीवर पहिल्यांदाच सलग ४० तास निवडणूक निकालावर आधारित विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहेत.

****



 निवडणूक आयोगानं १० मार्च रोजी लोकसभा निवडणुका जाहीर केल्यापासून देशभरात बेहिशोबी रोकड, अवैध मद्य, अंमली पदार्थ, सोनं असा सुमारे तीन हजार ४५० कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. २०१४ सालच्या निवडणुकांपेक्षा हे प्रमाण जवळजवळ तिप्पट आहे. यात ८३९ कोटी रुपयांची रोकड आणि एक हजार २७० कोटी रुपये किमतीच्या अंमली पदार्थांचा समावेश असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

****



 लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अतिशय खालच्या पातळीवर जाऊन केलेले आरोप-प्रत्यारोप तसंच जनतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वैयक्तीक टीका झाल्याबद्दल उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोस्टारिका विद्यापीठानं अलिकडेच नायडू यांना मानद डॉक्टरेट बहाल केली. त्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. राजकीय पक्ष, जनता आणि माध्यमांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं. पंतप्रधान, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आणि अन्य लोकप्रतिनिधी पदांचा आदर करण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. दर पाच वर्षांनी लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचं लेखापरीक्षण केलं जावं, तसंच माध्यमांनीही आपली मतं आणि बातम्या यांची सरमिसळ करु नये, अशी सूचना उपराष्ट्रपतींनी यावेळी केली आहे. 

****



 छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात दोन नक्क्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यातील एकावर रोख रकमेचा पुरस्कार होता. सुरक्षादलांच्या संयुक्त दलानं गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर बसरूर ठाण्या अंतर्गत मांगनर गांवाजवळ सन्नू राम नेताम आणि सुधाकर नावाच्या दोन नक्षलवाद्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्यांकडून विस्फोटक, माओवादी फलक आणि या भागात येत्या शनिवारी बंद पुकारण्याचं आवाहन  करणारे फलक या नक्षलवाद्यांकडे सापडले आहेत. अटक करण्यात आलेल्या नेतामवर एका लाख रुपयांचं पारितोषिक होतं आणि तो माओवाद्यांचा प्रमुख गट दंडकारण्या आदिवासी किसान मजदूर संघटनेचा प्रमुख आहे

****



 नाशिक इथल्या सप्तशृंगी गडाहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला दिंडोरी तालुक्यातील वणी नजीक कृष्णगावाजवळ झालेल्या अपघातात चार भाविक मृत्यूमुखी पडले तर २० ते २५ जखमी झाले आहेत. काल मध्यरात्रीच्या सुमारास गाडीचे ब्रेक निकामी झाल्यानं हा अपघात झाल्याचं तसच या अपघातात ठार झालेल्या चौघांपैकी तीन युवक पंचवटीतील पेठरोड इथले असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. अपघातातील जखमींना वणी इथं ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.

****



 राज्य विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडीसाठी आज काँग्रेस पक्षाची बैठक होणार आहे. काँग्रेसचे महासचिव मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानं, हे पद रिक्त झालं आहे.

****



 दुसऱ्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुध्द स्पर्धेला आजपासून गुवाहाटी इथं सुरुवात होत आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...