Monday, 20 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.05.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 May  2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० मे २०१९ दुपारी १.०० वा.

****



 लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होताच, काल संध्याकाळ  पासून प्रसार माध्यमांमधून निवडणूक निकालाचे कल जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. सर्वेक्षण करणाऱ्या बहुतांश संस्थांनी, भाजप आणि मित्रपक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. मतमोजणी येत्या गुरुवारी २३ तारखेला होणार आहे. आकाशवाणीचा वृत्त सेवा विभाग, लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अधिकृत कल तसंच निकालाचं सलग ४० तास प्रसारण करणार आहे. लोकसभा निवडणुकींच्या निकालांचं विश्लेषण करणारा निवाडा जनतेचा हा कार्यक्रम 23 मे रोजी प्रसारित होणार आहे.

****



 लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अतिशय खालच्या पातळीवर जाऊन झालेले आरोप-प्रत्यारोप तसंच जनतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वैयक्तीक टीका झाल्याबद्दल उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोस्टारिका विद्यापीठानं अलिकडेच नायडू यांना मानद डॉक्टरेट बहाल केली त्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. राजकीय पक्ष, जनता आणि माध्यमांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं. पंतप्रधान, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आणि अन्य लोकप्रतिनिधी पदांचा आदर करण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. दर पाच वर्षांनी लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचं लेखापरीक्षण केलं जावं, तसंच माध्यमांनीही आपली मतं आणि बातम्या यांची सरमिसळ करु नये, अशी सूचना उपराष्ट्रपतींनी यावेळी केली आहे. 

****



 छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात दोन नक्क्षलवाद्यांना अटक करण्यात आली आलं आहे. यातील एकावर रोख रकमेचा पुरस्कार होता. सुरक्षादलांच्या संयुक्त दलानं गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर बसरूर ठाण्या अंतर्गत मांगनर गांवाजवळ सन्नू राम नेताम आणि सुधाकर नावाच्या  या  दोन नक्षलवाद्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्यांकडून विस्फोटक, माओवादी फलक आणि या भागात येत्या शनिवारी बंद पुकारण्याचं आवाहन  करणारे फलक या नक्षलवाद्यांकडे सापडले आहेत. अटक करण्यात आलेल्या नेतामवर एका लाख रुपयांचं पारितोषिक होतं आणि तो माओवाद्यांचा प्रमुख गट दंडकारण्या आदिवासी किसान मजदूर संघटनेचा प्रमुख आहे.

****



 रायगड जिल्ह्यात खालापूर हद्दीत माडप नजीक खासगी प्रवासी बस आणि भरधाव मोटारीच्या अपघातात दोघं मृत्यूमुखी पडले आहेत. आज सकाळी साडे सात वाजता हा अपघात झाला. मोटारीचा चालक आणि त्यातील आणखी एका प्रवाशाचा यात मृत्यू झाला. या मोटारीतून वसईहून महाबळेश्वर सहलीसाठी १९ जण निघाले होते. अपघातातल्या जखमींना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****



 नाशिक इथल्या सप्तशृंगी गडाहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला दिंडोरी तालुक्यातील वणी नजीक कृष्णगावाजवळ झालेल्या अपघातात चार भाविक मृत्यूमुखी पडले तर २० ते २५ जखमी झाले आहेत. काल मध्यरात्रीच्या सुमारास गाडीचे ब्रेक निकामी झाल्यानं हा अपघात झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या चौघांपैकी तीन युवक पंचवटीतील पेठरोड इथले असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. अपघातातील जखमींना वणी इथं ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.

****



 कोयना धरणातला जलसाठा कमी झाल्यामुळं महाराष्ट्राला वीज कमतरतेचा सामना करावा लागत आहे. शासकीय निवेदनाद्वारे याची माहिती देण्यात आली आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातून एक हजार मेगावॅट विजेचं उत्पादन होतं. १०५ दशलक्ष घनफूट एकूण क्षमता असलेल्या धरणावरील सध्याचा साठा केवळ २८ दशलक्ष घनफूट आहे. या साठ्यासह, जलविद्युत प्रकल्पाच्या या चौथ्या टप्प्यात फक्त नऊ दशलक्ष घनफूट साठा उपलब्ध असेल, जे केवळ काही दिवसांसाठी पुरेसं असेल, असंही या निवेदनात नमुद आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...