Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 20 May 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० मे २०१९ सायंकाळी ६.००
****
भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधींनी आज नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेऊन
काही ठिकाणी, प्रामुख्यानं पश्चिम बंगालमध्ये फेरमतदानाची मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या
प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर भाजप कार्यकर्ते आणि उमेदवारांना धमकी दिल्याचा आरोप
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पश्चिम
बंगालमध्ये मतमोजणीवेळी आणि त्यानंतर हिंसाचाराची शंका असल्यानं निवडणूक आयोगानं यात
हस्तक्षेप करावा अशी मागणी भाजपनं यावेळी केल्याचं गोयल यांनी सांगितलं.
****
येत्या २३ मे रोजी परभणी लोकसभा मतदार संघातील मतमोजणी वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठातील कृषी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार असून यासाठी प्रशासकीय
यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मतमोजणीची प्रक्रिया सर्वसामान्यांना कळावी यासाठी वोटर हेल्पलाईन ॲप तयार करण्यात
आल्याचं तसंच मतमोजणी प्रक्रीया पूर्ण होण्यासाठी संध्याकाळ होऊ शकेल, असं त्यांनी
यावेळी नमुद केलं.
यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाच्या
वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील दारव्हा मार्गावरील शासकीय गोदाम परिसरात
मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.
****
बुलडाणा जिल्हयातल्या मलकापूर नजीक आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात किमान सहा
जण मृत्युमूखी पडले आहेत. मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या एका कारखान्यासमोर
ट्रक आणि एका मोटारीमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये मोटारीतील सहा जणांचा
जागीच मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मोटारीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक बारा प्रवासी बसवण्यात
आले होते. दूर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी म्हटलं
आहे.
****
धुळे जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता विशेष मदत देऊन नवे सिंचनाचे
प्रकल्प हाती घ्यावेत आणि अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करावेत, अशी मागणी शिवसेनेनं
जिल्ह्याचे पालक सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे केली आहे. पालक सचिव रविवारी
धुळे दौऱ्यावर आले होते त्यावेळी हे निवेदन त्यांना सांदर करण्यात आलं. या पार्श्र्वभूमीवर
धुळे जिल्ह्यात चारा छावण्या सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलनाचा
इशारा शिवसेनेनं दिला आहे.
****
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज जनावरांचा
मोर्चा काढला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. कर्नाटकात
दावणीला चारा दिला जातोय, मात्र महाराष्ट्रात ना चारा ना चारा छावण्या अशी स्थिती आहे,
भाजप सरकार हे दुष्काळाकडे पक्षीय दृष्टिकोनातून बघत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी
यावेळी केला.
****
बुलढाणा जिल्ह्यातल्या अंबा - बरवा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला झालेल्या वन्य
प्राण्यांच्या गणनेत चार वाघ, सहा बिबट्यांसह लहान - मोठ्या वन्य प्राण्यांची नोंद
झाली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी २५ पाणवठ्यांवर २५ मचानांची सोय हौशी
पर्यटकांसाठी केली होती. चार वाघ, सहा बिबटे, १९ अस्वलं यासह सांबर,
रानकोंबडी, रानडुक्करे, मोर, लांडोर असे ५४० लहान मोठे वन्य जीव या गणनेमध्ये आढळुन
आले असून ही संख्या गेल्या गणनेपेक्षा अधिक असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यवतमाळच्या पांढरकवडा वन क्षेत्रात पुन्हा वाघांची दहशत निर्माण झाली असून पांढरकवडा,
मारेगाव, झरी तालुक्यात वाघांचा संचार आहे. वाघांचे हल्ले वाढल्यानं संघर्ष टाळण्यासाठी
वनविभागाकडून जनजागृती सभांचं आयोजन करण्यात येत आहे. मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमझान
विराणी यात मार्गदर्शन करत आहेत.
****
बुलडाणा इथं उष्माघातामुळं एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नांदुरा तालुक्यातल्या
निमगावमध्ये घडली. निमगाव येथील पुनम भोपळे ही तरुणी आपल्या नातेवाईकांच्या लग्नाकरिता
मलकापूर येथे गेली होती, परत आल्यावर तिला अस्वस्थ वाटू लागल्यानं तिला रुग्णालयात
दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
//************//
No comments:
Post a Comment