Monday, 20 May 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 20.05.2019 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 May 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० मे २०१९ सायंकाळी २०.००

****

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होताच, काल संध्याकाळपासून प्रसारमाध्यमांमधून निवडणूक निकालाचे कल जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. सर्वेक्षण करणाऱ्या बहुतांश संस्थांनी, भाजप आणि मित्रपक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तेलगूदेसम, तृणमूल काँग्रेस, तसंच आम आदमी पक्षानं हे अंदाज फेटाळून लावले आहेत. मतमोजणी येत्या गुरुवारी २३ तारखेला होणार आहे. आकाशवाणीचा वृत्त सेवा विभाग, लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अधिकृत कल तसंच निकालाचं सलग ४० तास प्रसारण करणार आहे. लोकसभा निवडणुकींच्या निकालांचं विश्लेषण करणारा ‘निवाडा जनतेचा’ हा कार्यक्रम २३ मे रोजी प्रसारित होणार आहे.

****

निवडणूक निकालांचे कल हे अंतिम निकाल नसले तरी, भाजपच्या विजयाचे संकेत असल्याचं, भाजप नेते नीतीन गडकरी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर आधारित चरित्रपटाच्या पोस्टरचं आज नागपूर इथं गडकरी यांच्याहस्ते प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. एनडीए सरकारनं केलेल्या विकासकामांच्या आधारे भाजप पुन्हा एकदा केंद्रात सत्ता स्थापन करेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातून भाजप गेल्यावेळी जिंकल्या तेवढ्याच, म्हणजे २३ जागा जिंकेल, असा अंदाजही गडकरी यांनी वर्तवला.

दरम्यान मोदींच्या जीवनावर आधारित हा चरित्रपट येत्या शुक्रवारी देशभरात प्रदर्शित होणार आहे. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे, हा चरित्रपट मतदान होईपर्यंत प्रदर्शित करण्यास, निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात मनाई केली होती.

****

लोकसभा निवडणूक निकाल येण्यापूर्वी, राजकीय नेत्यांच्या बैठकांना वेग आला आहे. तेलगूदेसम पक्षाचे प्रमुख आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज कोलकात्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज भेट घेतली. या बैठकीत केंद्रात बिगर भाजप सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं वृत्त आहे. नायडू यांनी गेल्या दोन दिवसांत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बैठका घेतल्या, या बैठकांसंदर्भातही ममता बॅनर्जी यांच्यासोबत नायडू यांची चर्चा झाल्याचं, या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

****

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी लखनऊ इथं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील माध्यमांना देण्यात आला नाही. बसपा, सपा आणि राष्ट्रीय लोकदलाने आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवली, विविध संस्थांनी जाहीर केलेल्या निकालांच्या अंदाजात या आघाडीला बऱ्यापैकी यश मिळेल, असे संकेत दिले आहेत.

****

भाजप आणि मित्रपक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची उद्या सायंकाळी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ही बैठक बोलावली आहे. निकालानंतरच्या सर्व शक्यतांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संयुक्त जनता दलाचे नेते बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, यांच्यासह मित्रपक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीपूर्वी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भाजप कार्यालयात बैठक होणार आहे.

****

भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधींनी आज नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेऊन काही ठिकाणी, प्रामुख्यानं पश्चिम बंगालमध्ये फेरमतदानाची मागणी केली. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर भाजप कार्यकर्ते आणि उमेदवारांना धमकी दिल्याचा आरोप भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीवेळी आणि त्यानंतर हिंसाचाराची शंका असल्यानं निवडणूक आयोगानं यात हस्तक्षेप करावा अशी मागणी भाजपनं यावेळी केल्याचं गोयल यांनी सांगितलं.

****

मध्यप्रदेशातलं कमलनाथ सरकार अल्पमतात असल्याचा दावा भाजपनं केला आहे. भाजपा नेते गोपाळ भार्गव यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना यासंदर्भात पत्र लिहून, विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसकडे बहुमत राहिलेलं नाही. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात यावर चर्चा झाली पाहिजे असंही भार्गव यांनी म्हटलं आहे. काँग्रेसनं मात्र भाजपचे हे दावे फेटाळून लावत, कमलनाथ सरकार स्थिर आणि बळकट असल्याचा दावा केला आहे.

****

महाराष्ट्र राज्य विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडीसाठी आज काँग्रेसचे महासचिव मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत बैठक झाली, राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानं, हे पद रिक्त झालं आहे. या पदासाठी बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांच्या नावाची या बैठकीत चर्चा झाल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

//**************//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...