Tuesday, 21 May 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 21.05.2019 11.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ मे २०१९ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह आज केंद्रीय मंत्री तसंच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या प्रमुखांसोबत नवी दिल्लीत वेगवेगळ्या दोन बैठका घेणार आहेत. या बैठकांतून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांचीही चंद्रबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत एक बैठक होणार असून, त्यात काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेससह डावे पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल सहभागी होणार आहेत.

****

विरोधी पक्षांचे नेते आज नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबरोबर मतदान पुष्टीची पावती ताडून बघण्याच्या मुद्द्यावर हे नेते आयोगाशी चर्चा करणार आहेत. एखाद्या ठिकाणी यंत्र आणि पावतीतल्या मतात तफावत आढळली तर त्या पूर्ण विधानसभा मतदारसंघातल्या यंत्रांवरची मतं पावत्यांशी ताडून पहाण्यात यावीत, अशी मागणी हे पक्ष आयोगाकडे करणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या पाच मतदान केंद्रांवरचे मतांचे आकडे पावत्यांशी ताडून पहावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. या पद्धतीनं मतगणना होणार असल्यामुळं निकाल जाहीर होण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. १९९१ मध्ये आजच्याच दिवशी तामीळनाडूच्या श्रीपेरुंबुदुर इथे आत्मघाती बाँबस्फोटात राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. हा दिवस दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळला जात आहे.

****

महाराष्ट्र विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याची निवड लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर केली जाईल, असं काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं आहे. खरगे यांनी काल मुंबईत राज्यातल्या काँग्रेस खासदार आणि आमदारांची यासंदर्भात बैठक घेतली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं आहे.

****

राज्य विधानपरिषदेच्या एका रिक्त जागेसाठी येत्या सात जून रोजी निवडणूक होणार आहे. या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान आणि संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होणार आहे. परिषदेचे सदस्य शिवाजीराव देशमुख यांचं गेल्या १४ जानेवारीला निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे.

****

राज्यातल्या २० जिल्ह्यांमधल्या १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधल्या सहा हजार ७१९ रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पुढच्या महिन्यात २३ जून रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २४ जून रोजी होईल. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी ही माहिती दिली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या चार, नांदेड नऊ, उस्मानाबाद तीन, लातूर दोन, तर परभणी जिल्ह्यातल्या एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.

****

राज्यभरात तापमानाचा पारा चढलेलाच असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट येत्या २५ तारखेपर्यंत कायम राहिल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. राज्यात काल सर्वाधिक पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्शियस, इतकं तापमान चंद्रपूर इथे नोंदलं गेलं. मराठवाड्यात सर्वाधिक तापमान परभणीत चव्वेचाळीस अंश इतकं नोंदलं गेलं. औरंगाबाद इथे काल चाळीस पूर्णांक आठ अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाली.

****

नाशिक जिल्ह्यात पाण्याचं संकट वाढतच असून जिल्ह्यातील धरणात सरासरी दहा टक्के इतकाच साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळं पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर वाढले आहेत. जिल्ह्यातल्या २१० गावं आणि ८५९ वाड्या अशा एक हजार ६९ गावांना ३२५ टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात पारा वाढतच असून मध्यंतरी कमी झालेले तापमान ४० अंशां पर्यंत पोहोचलं आहे. नाशिक शहराला मुबलक पाणी पुरवठा सुरू असला तरी पाणी कपात करण्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यलयानं महापालिकेला केली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

//*************//




























No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...