Sunday, 7 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.07.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुरू झालेलं राजीनामासत्र अजून थांबलेलं नाही. कॉँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे आणि  मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीदेखील आज आपल्या पदांचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल मान्य आहे. त्याची जबाबदारी स्वीकारत पक्षाला मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कार्यरत राहणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.
तसंच, भाजप - शिवसेनेबरोबरच महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव रोखणं पक्षासमोरचं मोठं आव्हान आहे, असं देवरा यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे. मुंबई कॉँग्रेसची धुरा तीन सदस्यीय गटावर सोपवण्याची शिफारसही त्यांनी केली आहे. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.
****
गडचिरोली जिल्ह्यात, मे महिन्यात धानोरा तालुक्यातील दराची जंगलात ठार झालेल्या एका नक्षलवाद्याचं कुटुंबीयांनी तेरावं घातल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मृतदेहाचे अवशेष जप्त केले. यामुळे दराचीच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याच्या घटनेला पुष्टी मिळाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. २७ मे ला इथल्या जंगलात सी-६० पथकाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती.
****
नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार अजूनही सुरू आहे. गोदावरीची उपनदी असलेल्या वालदेवी नदीलाही पूर आला आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पिंपळगाव बहुला इथला पुल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आली असून, जुन्या नाशिक शहरात एक वाडा कोसळल्याचंही वृत्त आहे. यात सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यात आतापर्यंत १६० मिलिमिटर, तर पेठ तालुक्यात १०१ मिलिमिटर पावसाची नोंद झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातून मुळा नदी तुडुंब भरून वाहत आहे. अहमदनगर शहरासह अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या मुळा धरणाच्या दिशेनं नवीन पाण्याची आवक होत आहे. भंडारदरा परिसरातही जोरदार पाऊस होत असून मुळा नदीवरील पिंपळगाव खांड प्रकल्प भरल्यानंतर पाणी मुळा धरणाकडे येत आहे. कोथळे लघु पाटबंधारे तलाव आज सकाळी पू्र्ण क्षमतेनं भरला. तसचं मुळा खोऱ्यातील कुरकुंडी नदीवरील शिरपुंजे लघु पाटबंधारे तलावही पू्र्ण क्षमतेनं भरला आहे. आता या पाण्याचा विसर्ग बलठण लघु पाटबंधारे तलावाच्या दिशेनं होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी आणि वाशिष्ठी नद्यांना आलेला पूर आता ओसरला आहे. त्यामुळे खेड आणि चिपळूण शहरांमधलं पाणी कमी झालं आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं काल रात्रीपासून बंद करण्यात आलेली येथील दोन्ही पुलांवरील मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आज सकाळपासून धीम्या गतीनं सुरू झाली आहे.
****
चिपळूण तालुक्यातलं तिवरे धरण फुटल्यानंतर बेपत्ता झालेल्या दीड वर्षाच्या बालिकेचा मृतदेह आज पाचव्या दिवशी आपत्ती व्यवस्थापन पथकाला धरणाच्या परिसरातच सापडला. धरण दुर्घटनेतले तीन मृतदेह अजूनही बेपत्ता आहेत. तसंच धरण फुटल्यामुळे आता सात गावांमध्ये पूर आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून आज चंदगड, गगनबावडा, शाहूवाडी, तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा आणि भोगावती नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातले २० बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात अतिपावसामुळे शेतजमीनी खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. यामध्ये पाच हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाचा जवळपास ७० गावांना फटका बसल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या, खामगाव तालुक्यातल्या, पोरज शिवारात शेतात काम करणाऱ्या दोघांवर बिबट्यानं हल्ला केला.  
****



No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...