Monday, 8 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.07.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन कमी करण्यासंदर्भात नव्यानं दिशानिर्देश देण्याची आवश्यकता नसल्याचं, मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात दाखल याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत, मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग आणि न्यायमूर्ती एन एम जमादार यांच्या पीठानं, शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरात अनावश्यक ओझं असल्याचं, वाटत नाही, असं नमूद केलं. आमच्या वेळी पुस्तकं अधिक जाड होती, मात्र जड दप्तरामुळे आम्हाला कोणताही त्रास झाला नाही, आताची पुस्तकं तुलनेनं हलकी आहेत, असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन, शालेय अभ्यासक्रमाचा आढावा घ्यावा, आणि काही आक्षेप असल्यास, ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावेत, अशी सूचना न्यायालयानं केली आहे.
****
राज्यातल्या २९७ धरणांची तत्काळ दुरुस्ती आवश्यक असल्याचं, धरण सुरक्षा संदर्भातल्या अहवालात म्हटलं आहे. उर्वरित एक हजार पंचावन्न धरणांच्या बाबतीत किरकोळ देखभालीची गरज या अहवालातून वर्तवली आहे. राज्यातल्या एक हजार तीनशे अठ्ठावन्न धरणांची पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर अशी वर्षातून दोनदा तपासणी होत असल्याचं, या अहवालात म्हटलं आहे.
****
राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी, मतपत्रिकेवर घ्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे यांनी आज नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना हे निवेदन सादर केलं. आपण दिलेलं मत अपेक्षित उमेदवारांना मिळतं की नाही, या बाबत मतदारांमध्ये असलेली साशंकता, तसंच नोंदवलेल्या आणि प्रत्यक्षात मोजलेल्या मतांमध्ये तफावतीच्या तक्रारी, या पार्श्वभूमीवर जुन्या पद्धतीनं मतपत्रिकेवर मतदान घ्यावं, असं ठाकरे यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
****
अंगावर चिखल ओतण्याच्या कृतीमुळे अधिकाऱ्यांचं मनोबळ कमी होण्याची शक्यता टाळण्यासाठी यासंदर्भात कठोर कारवाई आवश्यक होती, असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आमदार नीतेश राणे यांनी नुकत्याच केलेल्या अशा कृत्याच्या अनुषंगाने ते आज बारामती इथं बोलत होते. नीतेश राणे यांना या प्रकरणातून सोडवण्याची विनंती खासदार नारायण राणे यांनी केल्याचं, पाटील यांनी सांगितलं, मात्र नीतेश यांची कृती योग्य होती का, असा प्रश्न आपण राणे यांना विचारल्याचं पाटील म्हणाले. यासंदर्भात सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या एका चित्रफितीच्या अनुषंगानं पाटील, पत्रकारांशी बोलत होते.
****
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी दरोडेखोरांच्या एका टोळीला जेरबंद केलं आहे. या टोळीनं नुकताच सिल्लोड तालुक्यात डोंगरगाव फाटा इथल्या तीन सुतगिरण्यांमध्ये दरोडा घातल्याचं कबूल केलं आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात चारचाकी वाहनं तसंच विदेशी मद्याची चोरी केल्याची कबुलीही या टोळीनं दिल्याचं, औरंगाबादच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात टिप्पर आणि दुचाकीच्या अपघातात तीन जण ठार झाले. मंठा-तळणी रस्त्यावर काल रात्री उशीरा ही दुर्घटना घडली.
****
चालू आर्थिक वर्षात देशात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १५ औष्णिक विद्युत केंद्रांच्या यादीत अकोला जिल्ह्यातल्या पारस औष्णिक विद्युत केंद्रानं पाचवा क्रमांक पटकाला आहे. सलग तीन महिन्यांपासून या केंद्राची कामगिरी देशात सरस ठरली आहे.
****
जालना जिल्ह्यात आजपर्यंत २९ हजार २८२ शेतकऱ्यांना १८५ कोटी ९६ लाख रुपये खरीप पीककर्जाचं वाटप झालं आहे. पीककर्ज वाटपाचं हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या फक्त बारा टक्केच असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना कर्ज वाटपाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
****
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव इथं महिलांनी आज नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं. पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची मुदत ३० जून रोजी संपल्यानं, टंचाईच्या स्थितीचा कोणताही आढावा न घेता थेट, टँकर बंद करण्यात आल्यानं, हे आंदोलन करण्यात आलं. मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी तातडीने टँकर सुरू करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेनं मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्याविरोधात अविश्वास ठराव आज मंजूर केला.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...