Monday, 8 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****

 मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळानं मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गांतर्गत सोळा टक्के आरक्षणाचा कायदा संमत केला होता, मुंबई उच्च न्यायालयानं, या कायद्यावर शिक्कामोर्तब करत, मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के तर नोकरीत १३ टक्के आरक्षण असावं, असं सांगितलं होतं. राज्य विधिमंडळानं, त्यानुसार कायद्यात बदलही केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएटही दाखल आहे.
****

 लोकसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या शुक्रवारी या सरकारच्या कार्यकाळातला पहिला अर्थसंकल्प सादर केला. मानवी हक्क संरक्षण सुधारणा विधेयक तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणा सुधारणा विधेयक २०१९ आज लोकसभेत मांडण्यात आलं. गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी ही विधेयकं लोकसभेत मांडली. यासंदर्भात सध्या सदनात चर्चा सुरू आहे. राज्यसभेत आज दंतवैद्यक सुधारणा विधेयक तसंच आधार आणि इतर कायदे सुधारणा विधेयकावर चर्चा होणं अपेक्षित आहे.
****

 जम्मु काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यातल्या नवसारी भागात आज सकाळी पाकिस्ताननं सीमेपलिकडून शस्त्रसंधीचं उल्ल्घंन केलं, त्यात एक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. सुरक्षा दलाच्या सूत्रांनुसार पाकिस्ताननं सकाळी सहा वाजेच्या सुमारास, भारतीय सेनेच्या मुख्य चौक्यांवर गोळीबार चालू केला, भारतानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 मुंबई आणि परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाला, या पावसामुळे मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचल्यानं, सुमारे वीस मिनिटांसाठी धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती. या काळात मुंबई विमानतळावर उतरणारी तीन विमानं जवळच्या विमानतळांकडे वळवण्यात आली. मात्र कोणतंही विमान रद्द करण्यात आलं नसल्याचं, विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
****

 नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसातल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातल्या इतर जलाशयांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

 अहमदनगर जिल्ह्यातही आठवडाभरातल्या पावसामुळे भंडारदरा तसंच मुळा धरण क्षेत्रातले लहानमोठे जलप्रकल्प ओसंडून वाहत आहेत.
****

 राज्यात २०१६ ते २०१९ या कालावधीत ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा शासनानं संकल्प असुन या मोहिमेअंतर्गत, पालघर जिल्ह्यात यंदा ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्या निमित्यानं पालघर मधल्या वेवूर, डुंगीपाडा इथल्या वन उद्यानाचं लोकार्पण खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आलं. पालघर जिल्ह्यात चालू वर्षासाठी वन विभाग, इतर शासकीय विभाग आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी मिळून एकूण एकोणऐंशी लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट देण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 ठाणे इथं काँग्रेस पक्षाच्या एका कार्यालयात घुसखोरी आणि चोरीप्रकरणी पंचवीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपींनी संबंधित पदाधिकाऱ्याला कार्यालयात येण्यास मज्जाव केला, आणि फर्निचरसह इतर साहित्य चोरल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. आरोपींमध्ये काही महिलांचाही समावेश आहे.
****

 शासनाच्या विविध प्रकारच्या योजना, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनुगामी लोकराज्य महाअभियान‘ म्हणजेच अनुलोम’ नं सुरू केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल जळगाव इथं अनुलोम’च्या समारोहात ते बोलत होते. ‘अनुलोम’ला विकासाची संकल्पना वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक गतीनं काम करावं लागेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
****

कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या परुपल्ली कश्यपला पुरुष एकेरी सामन्यात उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. अंतिम फेरीत चीनच्या ली शिफेंगनं त्याला २०-२२, २०-१४,२१-१७ असं हरवत अजिंक्यपद पटकावलं.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...