Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
मराठवाडा तसंच विदर्भातल्या
अल्पसंख्याक समाजातल्या महिलांसाठी स्वयंसहायता बचत गट योजना राबवण्याचा निर्णय राज्य
मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत घेतला आहे. अल्पसंख्याक समुदायातल्या महिलांच्या
आर्थिक सक्षमीकरणासाठी या बचतगटाच्या माध्यमातून त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि
रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
मराठवाड्यातल्या जालना, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, आणि बीडसह राज्यातल्या
१४ जिल्ह्यांत प्रत्येकी दोनशे याप्रमाणे दोन हजार आठशे बचतगट स्थापन केले जाणार आहेत.
या बचतगटांसह नांदेड, कारंजा, परभणी, औरंगाबाद, नागपूर या पाच शहरांमध्ये महिला आर्थिक
विकास महामंडळामार्फत स्थापन आणि कार्यरत असलेल्या अल्पसंख्याक महिला बचतगटांना कौशल्य
विकासाचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
राज्यात अवर्षणग्रस्त
तसंच नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जाणार
आहे. अवर्षण प्रवण घोषित १४९ तालुक्यांमध्ये औरंगाबाद तसंच अमरावती महसूल विभागातले
सर्व तालुके आणि नागपूर विभागातल्या वर्धा जिल्ह्यातल्या तालुक्यांचा समावेश आहे.
****
यंदाच्या शैक्षणिक
वर्षापासून इयत्ता नववी ते बारावीच्या विषयरचना आणि मूल्यमापन पध्दतीचा अभ्यास करण्यासाठी
शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक
शिक्षण मंडळ - सीबीएससी, भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र - आयसीएसई आणि राज्य मंडळाची
विषयरचना, मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करुन ही समिती दहा दिवसात अहवाल सादर करणार आहे.
हा अहवाल विचारात घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री आशिष शेलार
यांनी दिली आहे.
****
हज यात्रेकरुंच्या
सामानाच्या कमाल वजनाच्या मर्यादेत जमजम या पवित्र पाण्याचाही समावेश असेल, असं एअर
इंडियानं स्पष्ट केलं आहे. हज यात्रेवरून परत येणारे भाविक हे पवित्र पाणी आपल्यासोबत
घेऊन येतात. विमानांमध्ये झालेला बदल आणि जागेचा अभाव, यामुळे हा निर्णय घेत असल्याचं,
एअर इंडियानं म्हटलं आहे. या संदर्भात यात्रा कंपन्यांनाही माहिती देण्यात आली असल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
धुळे तालुक्यात सातरणे
गावातल्या एका खत कंपनीतून, बंदी घातलेल्या भेसळयुक्त खताची एक हजार दोनशे साठ पोती
जप्त करण्यात आली आहेत. निर्माण फर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव
असून, या प्रकरणी कंपनी मालकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कृषी विभागाच्या
पथकानं कारवाई करून, भेसळयुक्त खताचा सुमारे ४३ टन एवढा साठा जप्त केला, बाजारात या
खताची किंमत सुमारे नऊ लाख पंचावन्न हजार रुपये एवढी असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
अहमदनगर इथं आज पहाटे
एसटी बस आणि ट्रकच्या धडकेत अठ्ठावीस प्रवासी जखमी झाले, तर अपघातानंतर आग लागल्यानं,
बस खाक झाली. औरंगाबादहून राजगुरूनगरला जाणारी बस आज पहाटे अहमदनगर इथं पोहोचली असता,
शासकीय विश्रामगृहासमोर हा अपघात झाला. बसचे वाहक आणि चालकही या अपघातात जखमी झाले
असून, या दोघांसह सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
जखमींवर अहमदनगर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
हिंगोली बाजार समितीतल्या
पन्नास गावांचा, सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात
येणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. ज्या गावांचा
या समावेशा करता आक्षेप किंवा सूचना असेल, त्यांनी एका महिन्याच्या मुदतीत आपले आक्षेप
दाखल करायचे आहेत.
****
परभणी जिल्ह्याच्या
पालम तालुक्यात पेठशिवणी इथली जिल्हा परिषद माध्यमिक शाळेसाठी नवीन इमारत बांधण्याला
प्रशासनानं मंजुरी दिली आहे. ही इमारत निजामकालीन असुन मोडकळीस आली होती. भाजप सरचिटणीस
भगवान करंजे यांनी ही इमारत दुरुस्त करण्याऐवजी नवीन इमारत बांधण्याची मागणी केली होती.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या
नांदेड विभागात वडगाव - गंगाखेड रुळांचे स्लिपर्स बदलण्यासाठी दर आठवड्यात मंगळवार
आणि शुक्रवार असे दोन दिवस लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत
हा लाईन ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं, आदिलाबाद परळी प्रवासी गाडी परभणी स्थानकावर
८० मिनिटं थांबेर तर परळी अकोला प्रवासी गाडी सुमारे तासभर उशीरा सुटेल.
****
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज मँचेस्टर इथं भारत आणि न्यूझीलंड
यांच्यात उपांत्य फेरीतला पहिला सामना सुरू आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम
फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या ४१ व्या षटकांत
चार बाद एकशे त्रेसष्ट धावा झाल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment