Tuesday, 9 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 09.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****

 कर्नाटकात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचे पडसाद आज संसदेत उमटले. राज्यसभेत काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी या मुद्यावरून सभापतींच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केल्यानं, उपसभापतींनी कामकाज प्रथम बारा वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.

 लोकसभेत शून्यकाळात काँग्रेसच्या सदस्यांनी कर्नाटकच्या मुद्यावरून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गदारोळातच शून्यकाळाचं कामकाज सुरू ठेवलं. काँग्रेसचे लोकसभेतले नेते अधीर रंजन चौधरी यांनी, फोडाफोडीचं राजकारण नींदनीय असल्याचं सांगत, या बद्दल तीव्र निषेध व्यक्त केला. बंडखोर आमदारांना सत्ताधारी पक्षाकडून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

 त्यापूर्वी प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज लोकसभेत शांततेत पार पडलं.

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत, शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे, असा प्रश्न विचारला. कृषीराज्य मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी, यासंदर्भात सरकार राबवत असलेल्या मृदा आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकरी आवश्यक तीच खतं आणि रसायनं वापरून खर्चात बचत करू शकत असल्याचं सांगितलं. ठिबक सिंचनाला प्रोत्साहन, सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन आदी योजनांमुळे शेतीच्या उत्पादन खर्चात अधिक बचत होईल, असं रुपाला यांनी सांगितलं.

 हिना गावीत यांनी, शीतगृहांची संख्या वाढवण्यासाठी निधीची उपलब्धता करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. शीतगृहांच्या अभावी शेतकऱ्यांना भाजीपाला आणि फळांसारखी नाशवंत पिकं मातीमोल भावानं विकावी लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

 शासकीय गोदामांमधून मालवाहतुक करताना जीपीएस यंत्रणा लागू केली जाणार असल्याचं, अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं. आमदार गिरीश बापट यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता.
****

 दरम्यान, काँग्रेस खासदारांची आज संसद भवनात कर्नाटकच्या मुद्यावर एक बैठक झाली. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, यासंदर्भात पक्षाच्या धोरणावर चर्चा झाल्याचं वृत्त आहे.

 कर्नाटकात काँग्रेसच्या तेरा आमदारांनी दिलेला राजीनामा तसंच दोन अपक्ष आमदारांनी समर्थन काढून घेतल्यामुळे कुमारस्वामी सरकार अस्थिर झालं आहे. या सर्व आमदारांचं सदस्यत्व रद्द करावं, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
****

 केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं आज देशभरात एकशे दहा ठिकाणी धाडी घालून तपास मोहीम सुरू केली आहे. भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि शस्त्रास्त्रांची तस्करी अशा तीस प्रकरणांसंदर्भात देशभरातल्या १९ राज्यांमध्ये सीबीआयनं हे धाडसत्र सुरू केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 महात्मा गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारतीय जनता पक्षाच्या सर्व खासदारांना, आपापल्या मतदार संघात दीडशे किलोमीटर अंतराची पदयात्रा करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीदिनी ही पदयात्रा सुरू करून, ३१ ऑक्टोबरला सरदार पटेल जयंती दिनापर्यंत ही पदयात्रा पूर्ण करणं अपेक्षित आहे. स्वयंपूर्णतेतून खेड्यांचं पुनरुत्थान, वृक्षारोपण, झीरो बजेट शेती, आदी मुद्यांबाबत या पदयात्रेतून जनजागृती होणं अपेक्षित आहे.
****

 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता हा महागाई भत्ता ९ टक्क्यांहून १२ टक्के इतका झाला आहे. या बाबतचा शासननिर्णय वित्त विभागानं काल जारी केला. १ जानेवारी २०१९ पासून सातव्या वेतन आयोगानुसार हा महागाई भत्ता देय आहे. ही वाढ चालू महिन्यापासून रोखीनं देण्यात येईल तर एक जानेवारी ते ३० जून २०१९ या कालावधीतल्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश दिले जाणार आहेत.
****

 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजेपासून या सामन्याला सुरुवात होईल. उपांत्य फेरीचा दुसरा सामना परवा गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात होणार आहे.
****

 विम्बल्डन टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविच, रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि केई निशिकोरी यांनी पुरुष एकेरीच्या उप-उपांत्य फेरीत धडक मारली आहे. महिला एकेरीत सात वेळा विजेती ठरलेली सेरेना विल्यम्सनं एकतर्फी खेळाचं उल्लेखनीय प्रदर्शन करत स्पेनच्या कार्ला सुआरेझ नवारो हिला हरवत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. युक्रेनच्या एलिना स्वितीलोनानं क्रोएशियाच्या पेट्रा मार्टीक हिला नमवत अंतिम आठमधे प्रवेश केला आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 23 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...