Thursday, 11 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 11.07.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जुलै २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  गोवा विधानसभेतल्या काँग्रेसच्या पंधरापैकी १० आमदारांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश; आज मंत्रीमंडळाचा विस्तार
Ø  कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांचे राजीनामे तर विधानसभा अध्यक्ष जाणीवपूर्वक राजीनामा स्वीकारत नसल्याची बंडखोर आमदारांची सर्वोच्च न्यायालयात तक्रार
Ø  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या विस्ताराला केंद्र सरकारची मंजुरी
आणि
Ø  भारतीय धावपटू द्युती चंदला जागतिक आंतरविद्यापीठ शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक तर क्रिकेटमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत न्यूझीलंडकडून १८ धावांनी पराभूत
****

 गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पंधरापैकी १० आमदारांनी वेगळा गट स्थापन करीत काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत या आमदारांनी काल विधानसभा अध्यक्ष राजेश पाटनकर यांची भेट घेऊन आपला निर्णय कळवला. यामुळे सभागृहात भाजपाच्या सदस्यांची संख्या आता १७ वरुन २७ झाली आहे. राज्यात पक्ष अधिक मजबूत होण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितलं. मुख्यमंत्री सावंत यांच्या मंत्रीमंडळाची आज फेररचना होणार असून काँग्रेसमधून पक्षात आलेल्या आमदारांपैकी काही जणांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाण्याची तर सध्याच्या मंत्र्यांपैकी काही जणांना वगळलं जाण्याची शक्यता आहे.
****

 कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे. यामुळे मुख्यमंत्री डी. कुमारस्वामी यांच्या सरकारच्या संकटात आणखी वाढ झाली आहे.

 दरम्यान, कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष जाणीवपूर्वक आपला राजीनामा स्वीकारत नसल्याची तक्रार करत, कर्नाटकातल्या बंडखोर आमदारांनी काल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालय आज या तक्रारीवर सुनावणी घेण्याची शक्यता आहे. या बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी काल मुंबईत आलेले काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार, यांना मुंबई पोलिसांनी या आमदारांची भेट घेण्यापासून रोखलं. पोलिसांनी शिवकुमार यांना ह्या हॉटेलमध्ये प्रवेश करू न देता त्यांना परत बंगळूरला पाठवलं.
****

 प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा विस्तार करण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या संदर्भातली छोटी प्राधिकरणं समाप्त करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. आता अशा नऊ प्राधिकरणांऐवजी एकच प्राधिकरण अस्तित्वात असेल. तृतीयपंथी अधिकार संरक्षण विधेयक तसंच बाललैंगिक शोषण प्रतिबंधक पोस्को अधिनियम २०१२ मध्ये सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली.
****

 शिर्डी विमानतळाचा विस्तार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक काल मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. नवीन टर्मिनल इमारत बांधण्याचं काम पूर्ण होईपर्यंत जुन्या टर्मिनलचा विस्तार तातडीनं करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
****

 प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध गृहनिर्माण योजनांच्या कामांना अधिक गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले आहेत. या योजनेच्या कामांसदर्भात काल मुंबई इथं झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गृहनिर्माण विकास महामंडळानं कामगार, तसंच पोलीसांसाठी समर्पित गृहनिर्माण योजना राबवावी असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केलं.
****

 ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे पु.लं.च्या साहित्यावर आधारित स्टँड अप कॉमेडी ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. राज्यातल्या ३६ जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार असून इच्छुक स्पर्धकांनी ७५०६८४८०५५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर  आपलं सादरीकरण पाठवावं असं आवाहन शासनातर्फे करण्यात आलं आहे.
***

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 फलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ केली जाणार असल्याची माहिती, फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी काल पंढरपूर इथं दिली. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यापर्यंत फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांची माहिती पोहचवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचं उद्घाटन करतांना ते काल बोलत होते. फलोत्पादन क्षेत्र वाढावं यासाठी मागेल त्याला शेततळे या योजनेला आता ९५ हजार रुपये अनुदान दिलं जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आणखी अठ्ठावीस प्रकारच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री क्षीरसागर यांनी दिली.
****

 लातूर जिल्ह्यात पावसाअभावी बहुतांश ठिकाणी पेरण्या न झाल्यानं शेतकरी अडचणीत आला असून, शासनानं शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातल्या पाच टक्के शेतकऱ्यांनीच पेरणी केली आहे. पेरलेलं बियाणं उगवण्याची खात्री नाही, अशावेळी राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक असल्याचं संघट्नेचे लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे यांनी म्हटलं आहे.
****

 भारतीय धावपटू द्युती चंद हिनं इटलीमधे नापोली इथं झालेल्या जागतिक आंतरविद्यापीठ शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं आहे. हे पदक पटकावणारी ती पहिलीच भारतीय धावपटू ठरली आहे. चारशे मीटर ज्युनियर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमा दासनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकणारी द्युती ही दुसरी महिला धावपटू ठरली आहे.
****

 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल उपांत्य फेरीच्या पहिल्या रोमांचक सामन्यात भारताचा अठरा धावांनी पराभव करत, न्यूझीलंड संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन दिवस चाललेल्या या सामन्यात, न्यूझीलंडनं भारतासमोर विजयासाठी दोनशे चाळीस धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतीय संघ शेवटचे तीन चेंडू शिल्लक असताना, २२१ धावांतच सर्वबाद झाला. भारताच्या डावाची सुरुवातच काल अडखळत झाली. रोहित शर्मा, विराट कोहली आणि के एल राहुल हे आघाडीचे फलंदाज पहिल्या चार षटकांतच प्रत्येकी एक एक धाव करून बाद झाले. रवींद्र जडेजा ७७, महेंद्रसिंह धोनी ४९, तर हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत प्रत्येकी ३२ धावांवर बाद झाले.

दरम्यान, या स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात उपांत्य फेरीचा दुसरा सामना होणार आहे.
****

 पेट्रोल - डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांना कर्जमाफी - वीजबिल माफी, तसंच बेरोजगारीच्या मुद्यावरून काँग्रेस पक्षानं  काल औरंगाबादमध्ये सरकार विरोधात निदर्शनं केली. निवडणुका या मतपत्रिकेवरच व्हायला हव्यात अशी मागणी करत, काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
****

 परभणी जिल्ह्यात गेल्या वर्षी खरीप हंगामासाठी शासनानं मंजूर केलेल्या दुष्काळी अनुदानाचा दुसरा टप्पा परभणी जिल्ह्यातल्या चौदा गावांना अजूनही मिळाला नसल्यानं हे अनुदान त्वरीत देण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन काल पक्षाच्या वतीनं पाथरी तहसीलदारांना सादर करण्यात आलं.
****

 औरंगाबाद शहरासह, गंगापूर, पैठण आणि खुलताबाद तालुक्यात काल झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे. शहरात काल जवळपास ३३ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेत झाली आहे.

 रत्नागिरी जिल्ह्यात काल पावसानं जोरदार हजेरी लावली. खेडमध्ये जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्यामुळं रात्री जगबुडी पुलावरची मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती.
****

लातूर जिल्ह्यात मराठवाड्यातलं पहिलं विभागिय विज्ञान केंद्र स्थापन करण्यास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मान्यता दिली आहे. तारांगण, विज्ञान उद्यान, वैज्ञानीक प्रदर्शन भरवण्यासाठी गॅलरी, थ्रिडी थिएटर त्याचबरोबर संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळा या केंद्रात उभारली जाणार आहे.
****

 नांदेड-बीदर हा प्रलंबित  रेल्वे मार्ग अंब्रेला योजनेतून लोहा-अहमदपूर-चाकूर-लातूर रोड या मार्गे मंजूर करावा अशी  मागणी रेल्वे कृती समितीच्यावतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं प्रलंबित रेल्वे मार्ग पूर्ण करण्याच्या अनुषंगानं अंब्रेला योजना सुरु केली असून त्यात नांदेड-बीदर मार्गाचा समावेश करण्यात आला आहे.
****

 औरंगाबाद जिल्ह्यात लासूर स्टेशन इथं एका किराणा दुकानातला एक लाख अठरा हजार रुपये किंमतीचा गुटखा काल पोलिसांनी जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...