Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 11
July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जुलै
२०१९ दुपारी १.०० वा.
****
अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद विवाद प्रकरणी
सुरू असलेल्या मध्यस्थी प्रक्रियेसंदर्भातला ताजा अहवाल, येत्या आठवडाभरात सादर करण्याचे
निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील
पाच सदस्यीय घटनापीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी झाली, त्यावेळी हे निर्देश देण्यात
आले. या प्रकरणी न्यायालयानं निवृत्त न्यायाधीश एफ एम आय खलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली
तीन सदस्यीय मध्यस्थ समिती नेमली असून, पुढच्या गुरूवारी, १८ तारखेला या समितीला अहवाल
सादर करण्यास सांगितलं आहे. यासंदर्भात न्यायालय अठरा तारखेलाच पुढचे निर्देश देईल.
मात्र ही समिती कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचण्याबाबतची साशंकता अहवालातून ध्वनित
झाल्यास, येत्या २५ जुलैपासून न्यायालय दररोज या प्रकरणी सुनावणी घेईल, असं या घटनापीठानं
सांगितलं.
****
कर्नाटकातील १० बंडखोर आमदारांच्या याचिकेवर
आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व आमदारांना आज संध्याकाळी सहा वाजता कर्नाटक विधानसभा अध्यक्षांसमोर हजर राहुन आपला राजीनाम्याचा
निर्णय सादर करण्यास सांगितलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी आपला निर्णय उद्या सकाळी सर्वोच्च न्यायालयाला कळवावा, अशा सूचनाही न्यायालयानं दिल्या आहेत. हे आमदार मुंबईहून बंगळुरूला पोहोचल्यानंतर
त्यांना पूर्ण सुरक्षा देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं कर्नाटकच्या पोलिस महासंचालकांना दिले आहेत.
****
कर्नाटक तसंच गोव्यात झालेल्या राजकीय घडामोडींच्या
पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. काँग्रेसच्या
ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, आनंद शर्मा यांच्यासह अनेक नेत्यांनी महात्मा
गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनं करत, लोकशाही बचाओच्या घोषणा दिल्या.
****
लोकसभेत शून्य प्रहरात काँग्रेस नेते राहुल गांधी
यांनी देशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट असल्याचं सांगत, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या
अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी केली. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यासंदर्भात उत्तर
देताना, शेतकऱ्यांच्या या अवस्थेला, गेली अनेक दशकं सत्तेवर राहिलेले लोक जबाबदार असल्याचं
नमूद केलं, यावरून काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, सभात्याग केला. दरम्यान,
लोकसभेत सध्या रेल्वेसंबंधी अनुदानाच्या मागण्यांवर तर राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा
सुरू आहे.
****
सांगली जिल्ह्यात म्हैसाळ इथं, कृष्णा नदीच्या काठावरील
मातीचं प्रमाणबाह्य खोदकाम केल्याच्या प्रकरणी सांगली जिल्ह्यातले दोन
मंडल अधिकारी आणि एका तलाठ्यास जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी
निलंबित केलं आहे. मिरज तहसील कार्यालयातले मंडल अधिकारी राजू कदम, बेडग मंडल अधिकारी राजू जाधव आणि म्हैसाळच्या तलाठी वैशाली वाले अशी निलंबीत
केलेल्या अधिकाऱ्यांची नावं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यात आजही पावसाची
संततधार कायम आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५० मिलिमीटर पाऊस झाला. पंचगंगा नदी सह सर्व प्रमुख
नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यात साठ बंधारे पाण्याखाली गेले असून, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज या दुर्गम आणि डोंगरी तालुक्यातल्या वीस गावांना जमीन खचण्याचा धोका निर्माण
झाला आहे. या वीस गावातल्या एक हजाराहून
अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याची सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात, मुळा खोऱ्यातला कुरकुंडी नदीवरचा
बलठण लघु पाटबंधारे तलाव आज सकाळपासून ओसंडून वाहत आहे. सुमारे २०२ दशलक्ष घनफूट पाणी,
मुळा नदी प्रवाहात प्रवाहित होत आहे.
****
पालघर जिल्ह्यात मोखाडा - नाशिक मार्गावरचा एका ओढ्यावरचा
पूल पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेल्यानं मोखाडा - नाशिक मार्ग बंद झाला आहे. या
घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. सुरक्षेच्या दृष्टीनं इथं
पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर
करण्यास सांगण्यात येत आहे.
****
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बर्मिंगहॅम
इथं आज ऑस्ट्रेलियाचा सामना यजमान इंग्लंडशी
होणार आहे. उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता
सुरु होईल. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला १८ धावांनी पराभूत करुन अंतिम फेरीत स्थान
मिळवलं आहे. हा अंतिम सामना येत्या रविवारी लंडन इथं होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment