Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 12 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जुलै
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
** वैद्यकीय
महाविद्यालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गांसाठीचं
आरक्षण लागू
** राज्यातल्या
दुष्काळग्रस्त भागात ठिबक सिंचन योजनेसाठी ८० टक्के अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची
घोषणा
** शेतकऱ्यांच्या
समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कृषी आयोग स्थापन करण्याची शिवसेनेची मागणी
** आषाढी
एकादशीनिमित्त भाविकांनी पंढरपूर नगरी दुमदुमली.
आणि
** विश्वचषक
क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत यजमान इंग्लंडचा अंतिम फेरीत प्रवेश
****
वैद्यकीय
महाविद्यालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग-
मराठा आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काल
मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. एमबीबीएस अभ्यासाक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या
काही विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती. यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय
अभ्यासक्रमांसाठी हे आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षण कायदा
३० नोव्हेंबर २०१८ पासून अमलात आला. मात्र, वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची
प्रवेश प्रक्रिया यापूर्वीच सुरु झाली होती.
त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून हे आरक्षण लागू करता येणार नाही, असा दावा
याचिकार्त्यांनी केला होता.
दरम्यान,
राज्य सरकारनं काल २०१४मध्ये शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरता आरक्षण
देण्याचा काढलेला आदेश रद्द करण्याया शासन निर्णय जारी केला, यामुळे तात्पुरत्या स्वरुपात
खुल्या प्रवर्गातून विविध पदांवर केलेल्या नियुक्त्या रद्द झाल्या आहेत.
****
राज्यातल्या
दुष्काळग्रस्त भागात ठिबक सिंचन योजनेसाठी ८०टक्के अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.आषाढी एकादशी
निमित्त पंढरपूर इथं आयोजित कृषी पंढरी कार्यक्रमात ते काल बोलत होते.
****
शेती
तसंच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कृषी आयोग स्थापन करावा, अशी मागणी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
सरकारं बदलली तरी, प्रशासकीय यंत्रणा तीच असल्यामुळे, अंमलबजावणीतले कच्चे दुवे कायम
राहतात, असे कच्चे दुवे दुरुस्त करण्याचा अधिकार या कृषी आयोगाला असावा, ठाकरे यांनी
म्हटलं आहे. पीक विमा दाव्यांची देयकं अदा न केल्याच्या निषेधार्थ येत्या बुधवारी,
मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर निषेध मोर्चा काढणार असल्याचं, ठाकरे यांनी सांगितलं.
त्यानंतरही विमा कंपन्या पीक विम्याच्या दाव्यांचा निपटारा करणार नसतील, तर शिवसेना
आपल्या भाषेत त्यांना समज देईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
****
प्रत्येक
विद्यापीठांनी विस्तारीकरणाबरोबरच गुणवत्ता विकासाकडेही लक्ष देण्याची गरज मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. काल सोलापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ
त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान,
श्रमिक पत्रकारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात २३८ सदनिकांच्या बांधकामाचं
भूमीपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
****
आषाढी
एकादशीनिमित्त आज पंढरपूरमध्ये १२ लाख भाविकांचा मेळा जमला आहे. राज्य आणि राज्याबाहेरून
अनेक दिंड्या आणि पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक तसंच
वैयक्तिक वाहनांनीदेखील मोठ्या प्रमाणावर भाविकांची मांदियाळी पंढरपूरात अवतरली आहे.
किर्तन, भजन, टाळ -मृदुगांच्या तसंच विठू नामाच्या गजरानं अवघं पंढरपूर दुमदुमनं गेलं
आहे. पहाटे दोन वाजून १५मिनिटांनी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्निक शासकीय महापूजा झाली.यावर्षी मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजेस बसण्याचा मान
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या सांगाची सुनेवाडी तांडा इथल्या विठ्ठल चव्हाण
आणि त्यांच्या पत्नी प्रयाग चव्हाण यांना मिळाला.
आषाढी
वारी सकारात्मक शक्तीचे दर्शन घडवते असं सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले….
पंढरी आणि माऊली सर्व सामान्यांचं आशास्थान
आहे या महाराष्ट्रामध्ये ही शेकडो वर्षाची परंपरा या परंपरेला महाराष्ट्र धर्म जिवंत
ठेवला आमची संस्कृती अबाधित ठेवली आणि खऱ्या अर्थानं लाखो लोकं यावे या ठिकाणी येतात
एक सकारात्मक शक्तीचा आविष्कार हा या वारीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण
महाराष्ट्राच्या आशा-आकांक्षा यांचे प्रतिनिधित्व करणारी अशा प्रकारची वारी आहे.
महाराष्ट्र
सुजलाम सुफलाम व्हावा, चांगला पाऊस येऊन बळी राजा सुखावला पाहिजे अशी मागणी आपण विठ्ठलाच्या
चरणी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठण आणि गंगापूर तालुक्यातल्या छोट्या पंढरपूरमध्येही आज सकाळपासूनच
भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. राज्यमंत्री अतुल सावे यांनी पंढरपूर इथं
मध्यरात्रीनंतर सपत्नीक महापुजा केली. या यात्रेमुळे आज औरंगाबाद- पुणे रस्त्यावरच्या
वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
अनुसूचित
जाती - जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा - अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्ह्यांचा
तत्परतेनं तपास करुन गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा होण्यासाठी, कायद्याची प्रभावी
अमंलबजावणी होणं गरजेचं आहे असं सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी म्हटलं
आहे. काल औरंगाबाद इथं त्यांनी या कायद्यासंदर्भात
मराठवाडा विभागाची आढावा बैठक घेतली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले...
अॅट्रॉसिटी अॅक्ट ज्यागोष्टीचा आम्हाला
अडसर वाढतो .विशेषता: शिक्षा होत नाही किंवा कोर्टामध्ये केसेसचा निकाल जास्त लागत
नाही या विषयावर ती आम्ही चर्चा केली त्याची कारणे शोधायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर
गावागावात वातावरण हे असता कामा नये तर वातावरण समभावाचा असावा अशा प्रकारची देखील
इंस्ट्रक्शनस त्यांना दिलेले आहेत
****
इंग्लंडमध्ये
सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल उपांत्यफेरीत यजमान इंग्लंडनं गतविजेत्या
ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियानं प्रथम
फलंदाजी करतांना इंग्लंडसमोर विजयासाठी २२३ धावांचं आव्हान ठेवलं. इंग्लडनं हे आव्हानं
३२व्या षटकात ८ गडी राखून पूर्ण केलं. स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी आता इंग्लड
आणि न्यूझीलंड या संघामध्ये होणार आहे. या
दोन्ही संघाना आतापर्यंत कधीच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद मिळालेलं नाही.
****
बीड जिल्ह्यात
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत संपादीत केलेल्या जमिनीच्या
मावेजासाठी ११ कोटी ६९ लाख रूपये मंजूर केल्याबद्दल
बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने काल राज्याचे
रोजगार हमी योजना तसंच फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणं १५ दिवसात मार्गी लावण्याचं
आश्वासन दिलं.
****
विद्यमान
सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या एकाही
आश्वासनाची पुर्तता केलेली नसून केवळ जनतेची
दिशाभूल केली असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव माजी राज्यमंत्री
आमदार अमित देशमुख यांनी केला आहे. लातूर शहर विधानसभा मतदार संघातल्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते. आगामी
विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी सर्वांनी जबाबदारी स्वीकारून कामाला लागावं असं
आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
परभणी
जिल्ह्यात काल दुपारी बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. खरीपाच्या पिकांसाठी हा पाऊस
पोषक असल्यानं, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यातही
काल जोरदार पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद शहर परिसरातही काल
पाऊस झाला.
****
परभणी
जिल्ह्यात जिंतूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार विजय भांबळे
यांच्यावर कारवाई करावी, तसंच संबंधित कर्मचाऱ्याविरोधात दाखल केलेला मागासवर्गीय अन्याय
अत्याचार प्रतिबंधक -ॲट्रासिटी कायद्यातर्गंत गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी संभाजी
सेनेच्यावतीने काल परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.
****
नाशिक
इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ
यांच्यात काल नाशिक इथं सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर आणि महाराष्ट्र विश्वकोश मंडळाचे सचिव
श्यामकांत उपस्थित होते. आरोग्य विद्यापीठाशी संबंधित असा विश्वकोष मंडलाचा हा पहिलाच
करार असल्याचं म्हैसेकर यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment