आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१२ जुलै २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठीच्या तरतुदींवर काल लोकसभेत
झालेल्या चर्चेला रेल्वेमंत्री पियुष गोयल आज उत्तर देतील. या विषयावर काल रात्री बारा
वाजेपर्यंत लोकसभेत चर्चा सुरू होती. काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी, तृणमूल काँग्रेसचे
सुदीप बंडोपाध्याय, द्रमुकच्या कनिमोळी, यांच्यासह अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभागी
होत आपापली मतं मांडली.
दरम्यान, लोकसभेचं कामकाज रात्री बारा वाजेपर्यंत चालण्याची
नजिकच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ असल्याचं, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी
सांगितलं.
****
आषाढी एकादशीचा उत्सव आज सर्वत्र भक्तिभावानं साजरा होत
आहे.
एकादशीनिमित्त आज पंढरपूरमध्ये १२ लाख भाविकांचा मेळा
जमला आहे. राज्य आणि राज्याबाहेरून अनेक दिंड्या आणि पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झाल्या
आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक तसंच वैयक्तिक वाहनांनीदेखील मोठ्या प्रमाणावर भाविकांची
मांदियाळी पंढरपूरात अवतरली आहे. किर्तन, भजन, टाळ -मृदुगांच्या तसंच विठू नामाच्या
गजरानं अवघं पंढरपूर दुमदुमनं गेलं आहे.
औरंगाबादसह अनेक शहरातल्या विठ्ठल रुख्मिणी मंदिरात भाविकांनी
पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
औरंगबादनजिक प्रतिपंढरपूरकडे जाणारे रस्ते वारकरी आणि
दिंड्यांनी फुलून गेले आहेत. अनेक सेवाभावी संस्था आणि संघटनांनी, वारकऱ्यांसाठी रस्त्यांच्या
दुतर्फा मोफत चहा फराळाची व्यवस्था केली आहे.
****
विद्यमान सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या एकाही
आश्वासनाची पुर्तता केलेली नसून केवळ जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप अखिल भारतीय
काँग्रेस समितीचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केला आहे. ते काल
लातूर इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी
कामाला लागावं अशी सूचना त्यांनी केली.
****
बीड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार
योजने अंतर्गत संपादीत केलेल्या जमिनीच्या मावेजासाठी ११ कोटी ६९ लाख रूपये मंजूर केल्याबद्दल
बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने काल राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर
यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणं
१५ दिवसात मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं.
****
No comments:
Post a Comment